वयाच्या ८३ व्या वर्षीही तळमळीने सेवा करणार्‍या आणि प्रेमाने सर्वांना आपलेसे करणार्‍या देवद आश्रमातील पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी !

पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

एक दिवस आजींना अंघोळ घालण्याचे नियोजन करायचे होते. काही अडचणींमुळे ते लवकर झाले नाही. त्या वेळी आजी म्हणाल्या, ‘‘ते (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत ना ! ते नियोजन करतील. अपेक्षा करायला नको.’’

१. ‘कुठलीही गोष्ट पू. आजींच्या लक्षात रहाते. त्यांची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे.

२. सेवेची तळमळ

अ. पूर्वी ठाणे येथे असतांना पू. दळवीआजी आणि मी एकत्र सेवा करायला जायचो. तेव्हा त्या ३ – ३ मजले चढून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करायच्या, तसेच लोकांना साधनेचे महत्त्व सांगायच्या.

आ. त्यांच्याकडे साप्ताहिक सनातन प्रभातचा अहवाल सिद्ध करण्याची सेवा होती. त्याचा हिशोब आणि अहवाल त्या वेळेतच द्यायच्या.

३. त्यांची नातवंडे लहान असतांनाच त्या त्यांना सेवेला आणि सत्संगाला घेऊन यायच्या.

४. सर्व साधक त्यांचे कौतुक करायचे. तेव्हा ‘देवच सर्व करवून घेतो’, असा त्यांचा भाव असायचा.

५. त्यांनी न घाबरता मोठमोठ्या संकटांवर मात केली. गुरूंवरील अपार श्रद्धेमुळेच त्या संकटांवर मात करू शकल्या.’

– श्रीमती रत्नप्रभा कदम, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.७.२०१८)

६. भाव

६ अ. ‘दैनिक सनातन प्रभात’प्रती : पू. आजींना दैनिक सनातन प्रभात दिल्यावर त्या प्रतिदिन सर्वप्रथम भावपूर्ण प्रार्थना करून मगच ते वाचतात, तसेच ते एकाग्रतेने वाचतात. त्या मला त्यातील महत्त्वाची सूत्रे सांगतात, तसेच ‘हा लेख वाच’, असेही सांगतात.

६ आ. साधकांप्रती : एक दिवस पू. आजींना पुष्कळ त्रास होत होता. तेव्हा त्यांनी आपल्या त्रासाविषयी पू. (सौ.) अश्‍विनीताई पवार यांना दूरभाष करून सांगितले. आजींना थोड्या वेळातच बरे वाटले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘ताईशी बोलल्यावर माझा त्रास दूर झाला.’’

६ इ. संतांप्रती : कधी कधी संत आजींना भेटायला येतात. त्या वेळी ‘देव मला भेटायला आला. आता मला पुष्कळ उत्साह जाणवत आहे’, असे त्या सांगतात.

६ इ १. आजींचा पाय कधी जड होतो, तर कधी दुखत असतो. त्या वेळी आजी सूक्ष्मातून प.पू. पांडे महाराजांना सांगतात. ते पाहून मला वाटते, ‘जणूकाही प.पू. महाराज त्यांच्या समोर आहेत.’

६ इ २. आजींना होत असलेल्या अनेक त्रासांवर प.पू. पांडे महाराजांनी मंत्र दिले आहेत. आजी ते सर्व मंत्र प्रतिदिन नियमितपणे ऐकतात. ‘त्यांची प.पू. महाराजांनी सांगितलेल्या मंत्रांवर पुष्कळ श्रद्धा आहे’, असे लक्षात आले.

६ ई. ‘आजी सतत भावावस्थेत असतात’, असे जाणवते.’

७. सकारात्मक वृत्ती

आजी नेहमी सकारात्मक असतात.

८. जिज्ञासू वृत्ती

‘श्रीमती दळवीआजी ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’ हा ग्रंथ वाचून ‘कुठल्या त्रासावर कुठला जप आणि कुठली मुद्रा करायची ?’, हे अचूक सांगतात. त्या स्वतःही त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. या वयातही आजींचे वाचन चांगले आहे.

– कु. वैशाली बांदिवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेने काही मास मला पू. दळवीआजींची सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहे.

१. मांडीचा अस्थिभंग झालेला असतांनाही स्थिर आणि शांत असणे

दीड वर्षापूर्वी पू. दळवीआजी पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या मांडीचा अस्थिभंग झाला. तेव्हा ३ मास त्यांच्या पायात सळी घातलेली होती. त्यांचा पाय हलणार नाही, अशा स्थितीत तो दोरीने बांधून ठेवला होता. त्याही स्थितीत पू. आजी स्थिर आणि शांत होत्या. ३ – ४ मासांनी त्यांना पलंगावर बसता येऊ लागले. तेव्हा उठतांना त्यांना पुष्कळ संघर्ष करावा लागत असे; पण त्या एकदाही कण्हल्या नाहीत  किंवा त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही.

२. सतत सेवारत असणे

पू. आजींना पलंगावर बसता यायला लागल्यावर त्यांनी जपमाळा बनवण्याची सेवा मागून घेतली. त्या रुग्णाईत असूनही वयाच्या ८३ व्या वर्षीही सेवारत असायच्या.

३. परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा

पू. आजींच्या खोलीत त्यांच्या पलंगासमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठे छायाचित्र लावले आहे. एकदा मी पू. आजींना विचारले, ‘‘आजी, उठायला जमेल ना ?’’ त्या वेळी पू. आजी परात्पर गुरु डॉक्टरांच्या त्या छायाचित्राकडे बोट दाखवून म्हणायच्या, ‘‘मी नाही उठणार. तेच मला उठवणार !’’ पू. आजी दिवसभरातील अशा अनेक कृती त्या छायाचित्राकडे बघूनच बोलून करायच्या. परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच पू. आजींनी अत्यंत कठीण परिस्थितीत संतपद गाठले.’

– श्रीमती शशिकला भगत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF