रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात चैतन्यदायी वातावरणात पार पडला पू. भगवंतकुमार मेनराय यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी !

पू. भगवंतकुमार मेनरायआजोबा आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्या विवाहाच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृताज्ञातापुर्वक नमस्कार !

रामनाथी (गोवा) – सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, यासाठी माघ शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच १४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सहस्रचंद्रदर्शन विधी चैतन्यदायी वातावरणात पार पडला. वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाढत्या वयामुळे उत्पन्न होणार्‍या व्याधींचा प्रभाव न्यून व्हावा, यासाठी सहस्रचंद्रदर्शन विधी केला जातो.

डावीकडून पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी, कु. संगीता मेनराय, पू. (सौ.) सूरजकांता मेनराय, पूर्णाहुती देतांना पू. भगवंतकुमार मेनराय आणि पुरोहित श्री. अमर जोशी

या विधीच्या वेळी पू. भगवंतकुमार मेनराय यांच्या पत्नी पू. (सौ.) सूरजकांता मेनराय आणि कन्या कु. संगीता मेनराय उपस्थित होत्या. ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी या विधीचे पौरोहित्य केले. या वेळी पानवळ-बांदा, सिंधुदुर्ग येथील संत प.पू. दास महाराज, सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातनच्या पुणे येथील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यासह आश्रमातील अन्य संत अन् साधक उपस्थित होते. सोहळ्याच्या मंगलक्षणाच्या निमित्ताने पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी पू. मेनरायआजोबा यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. प.पू. दास महाराज यांनीही पू. मेनरायआजोबा यांना भेटवस्तू दिली. आश्रमातील साधिका सौ. श्‍वेता क्लार्क आणि सौ. सौम्या कुदरवळ्ळी यांनी पू. मेनरायआजोबा यांचे औक्षण केले.

पू. मेनरायआजोबा आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनरायआजी यांनी विधीचा संकल्प अन् आचार्यवरण केले. त्यानंतर गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, देवतांचे आवाहन, पूजन, हवन हे विधी पुरोहितांनी केले. त्यानंतर पू. मेनरायआजोबा आणि पू. (सौ.) मेनरायआजी यांनी पूर्णाहुती दिली.

क्षणचित्रे

१. पू. मेनरायआजोबा यांचा सहस्रचंद्रदर्शन विधी चालू असतांना एखादा यज्ञ चालू असल्याप्रमाणे पुष्कळ मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवत असल्याचे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.

२. या विधीनंतर पू. मेनरायआजोबा यांची ‘यूटीएस्’ (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. विधीपूर्वी त्यांची प्रभावळ २८.१३ मीटर इतकी होती, विधीनंतर ती वाढून ४२.७४ मीटर इतकी झाल्याची नोंद करण्यात आली. यावरून हिंदु धर्माने सांगितलेल्या धार्मिक विधींना किती महत्त्व असते, हे लक्षात येते.


Multi Language |Offline reading | PDF