भृगु महर्षींच्या आज्ञेने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ घोषित !

सनातनच्या गुरुपरंपरेतील सुवर्णदिन !

माघ पौर्णिमेच्या शुभदिनी बहरली अनमोल सनातन गुरुपरंपरा ।
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ चालविती पुढे गुरुवारसा ॥

दीप हातांत घेतलेले परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या उजवीकडे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि त्यांच्या डावीकडे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

रामनाथी (गोवा) – गुरुपरंपरा ही भारताने विश्‍वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगाची निर्मिती करून साधकांना जलद आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्गच उपलब्ध करून दिला. या मार्गावरील साधकांच्या साधनेला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विश्‍वव्यापी अध्यात्मप्रसाराचे कार्य पुढे नेण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातन संस्थेच्या अखिल भारतीय धर्मप्रसारक सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्यात आले.

चेन्नई येथील भृगु जीवनाडीवाचक श्री. सेल्वम्गुरुजी यांच्या माध्यमातून भृगु महर्षि यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून घोषित करण्याचा हा शुभदिवस आहे; म्हणून पितृपूजा झाल्यानंतर रामनाथी आश्रमात ‘सहस्र दीप’ लावायचे आहेत. तीनही गुरूंनी एकत्र येऊन दीपप्रज्वलन करावे. त्यानंतर साधकांनी संपूर्ण आश्रमात ‘सहस्र दीप’ लावावेत.’’

या सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सद्गुरुद्वयींना ‘श्रीं’ बीजमंत्राचे पदक प्रदान केले. सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात सहस्र दीपदर्शन सोहळा साजरा करण्यात आला.


Multi Language |Offline reading | PDF