हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली तिरुकोष्टीयुर (तमिळनाडू) येथील सौम्य नारायण मंदिरात पूजा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

तमिळनाडू – ७.१.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तमिळनाडूतील तिरुकोष्टीयुर येथील सौम्य नारायण मंदिरात जाऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विशेष पूजा केली. महर्षि मयन यांनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून ५.१.२०१९ या दिवशी सांगितले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, सनातनच्या साधकांचे शारीरिक त्रास अल्प होण्यासाठी आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला भूमी मिळण्यातील अडथळे दूर होण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तिरुकोष्टीयुर येथील सौम्य नारायण मंदिरात जाऊन पूजार्चना करावी.’’ महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या मंदिरात जाऊन पूजा केली.

क्षणचित्रे

१. या वेळी गाभार्‍यात दर्शन घेत असतांना तमिळनाडू राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देवाच्या दर्शनाला आले होते. (याविषयी महर्षींना सांगितल्यावर ते म्हणाले की, आता सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या अध्यात्मातील विशेष व्यक्ती झालेल्या असल्याचे सूचक आहेत. त्या आता ज्या ज्या मंदिरात जातील, त्या त्या मंदिरात असा शकून घडेल. – संकलक)

२. विशिष्ठ अद्वैत ज्यांनी जगाला दिले, त्या रामानुजाचार्य यांनी १००० वर्षांपूर्वी पूजा केलेल्या मूर्तींचे दर्शन मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नंबीजी यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना घडवले आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आशीर्वाद दिला.

तिरुकोष्टीयुर येथील सौम्य नारायण मंदिर

हिरण्यकश्यपूच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांनी ज्या ठिकाणी एकत्र येऊन चर्चा केली, ते स्थान म्हणजे आताचे तिरुकोष्टीयुर होय. या ठिकाणी श्रीविष्णूने उभे राहून, बसून, तसचे शयन रूपात भक्तांना दर्शन दिलेले आहे. येथील श्रीविष्णूच्या अनंतशयन मूर्तीला ‘सौम्य नारायण’ असे म्हटले जाते आणि याच ठिकाणी विशिष्ट अद्वैत सिद्धांताचे प्रतिपादक रामानुजाचार्य यांना त्यांच्या गुरूंनी ‘ॐ नमो नारायणाय’ या अष्टाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. या वेळी गुरूंनी सांगितले, ‘‘या मंत्राने मोक्षप्राप्ती होणार आहे.’’ तेव्हा रामानुजाचार्य या मंदिराच्या एका गोपुरावर उभे राहून जोरजोराने लोकांना सांगू लागले, ‘‘ॐ नमो नारायणाय’ या मंत्राचा अधिकाधिक नामजप करावा.’’ पुढे अनेक वर्षे रामानुजाचार्यांनी येथे गुरूंची सेवा केली आणि शिष्यांना धर्माचे ज्ञान दिले. ॐ


Multi Language |Offline reading | PDF