परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पादुका धारण अन् प्रतिष्ठापना सोहळा, म्हणजे ‘पाणावले नेत्र, सुखावले मन’ अशी संमिश्र अवस्था अनुभवायला देणारा ऐतिहासिक सुवर्णक्षण !

१. ‘परात्पर श्रीगुरूंचे आणखी पुढच्या टप्प्याचे कार्य आरंभ होऊन ते अधिकाधिक काळ निर्गुणावस्थेत रहाणार आहेत’, हे ऐकतांना आणि हा सोहळा पाहतांना मनात संमिश्र भाव दाटून येणे

श्रीमती मेघना वाघमारे

‘वसंतपंचमीच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ‘पादुका धारणविधी’ आणि रथसप्तमीच्या दिवशी ‘पादुका प्रतिष्ठापना सोहळा’ पार पडला. ‘आपल्या परात्पर श्रीगुरूंची कीर्ती दिगंतापर्यंत टिकून राहील आणि युगानुयुगे त्यातून श्रीगुरुमाऊलीचे चैतन्य प्रक्षेपित होत राहील’, असे सांगणारा हा ऐतिहासिक सुवर्णक्षण ! या वेळी या पादुकांच्या माध्यमातून परात्पर श्रीगुरुदेवांनी सनातन संस्थेच्या सर्व साधकांना आणि सर्व आश्रमांना चैतन्य अन् शक्ती प्रदान केली. ‘यापुढे परात्पर श्रीगुरूंचे आणखी पुढच्या टप्प्याचे कार्य आरंभ होणार आहे. त्यामुळे ते अखिल ब्रह्मांडाचे कार्य करण्यास अधिकाधिक काळ निर्गुणावस्थेत रहाणार आहेत,’ असे सांगण्यात आले. हे ऐकतांना आणि हा सोहळा पहातांना मनात संमिश्र भाव दाटून आले.

२. एकीकडे ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षी असल्याचे भाग्य मिळणे, तर दुसरीकडे परात्पर श्रीगुरूंचा स्थुलातील सहवास हळूहळू दुर्मिळ होणार असल्याची दुखरी संवेदना जाणवणे

आम्ही साधक या ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे साक्षी आहोत, यापरते भाग्य ते कोणते ! ‘आता धर्मसंस्थापनेच्या, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याची गती अधिक वाढणार आहे. लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. ‘परात्पर श्रीगुरूंची अमोघ शक्ती काय असते आणि ईश्‍वराचे सूक्ष्मातील कार्य कसे असते’, हे शिकायला अन् अनुभवायला मिळणार आहे. ‘सहस्रो जीव मोक्षप्राप्तीच्या वाटेवर मार्गस्थ होतील’, याचा आनंद वाटत होता. त्याच वेळी ‘ज्या परात्पर श्रीगुरूंच्या समवेत सनातन संस्थेच्या इतिहासातील कितीतरी अमूल्य क्षण अनुभवले आणि ज्यांना जवळजवळ वीस वर्षे या ना त्या निमित्ताने स्थुलातून सतत अनुभवले, त्या परात्पर श्रीगुरूंचे स्थुलातून दर्शन दुर्मिळ होईल अन् त्यांना आता स्थुलातून अनुभवता येणार नाही’, या जाणीवेने मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी क्षणभर एक काहीशी दुखरी संवेदना जाणवली. अवती भोवती बसलेल्या साधकांना पहातांना ‘अनेकांच्या मनातही असेच काहीसे चालू असावेे’, असे वाटले आणि सर्वांच्या मनीचे भाव शब्दबद्ध झाले. ते पुढे देत आहे.’

– श्रीमती मेघना वाघमारे

पाणावले नेत्र, परि सुखावले मन ।

सोहळा असे पादुका धारण अन् प्रतिष्ठापन ।
त्यायोगे निर्गुण अवस्थेत श्रीगुरूंचे गमन ॥
कीर्ती तयांची राहील दिगंती, सांगे हा क्षण ।
परि पाणावले नेत्र, सुखावले मन ॥ १ ॥

गुंतले तयांच्या चरणी साधकांचे मन ।
भावभक्तीने अनुभवती सोहळा सारे जन ॥
होईल आता तयांचे स्वल्प स्वल्प स्थूलदर्शन ।
कल्पने या पाणावले नेत्र, परि सुखावले मन ॥ २ ॥

राष्ट्र अन् धर्म रक्षिण्याचे कारण ।
साधिली तयांनी अवस्था निर्गुण ।
साधकांस्तव केली चैतन्यशक्ती प्रदान ।
पाणावले नेत्र, परि सुखावले मन ॥ ३ ॥

संमिश्र हे भाव, विलक्षण हा क्षण ।
अडको नये त्यांच्यातही (टीप १) हे मन ।
श्रीगुरूंनीच दिधली ही शिकवण ।
परि पाणावले नेत्र, सुखावले मन ॥ ४ ॥

बोलती ‘ध्येय तुझे ईश्‍वरप्राप्ती जाण’ ।
अध्यात्मतत्त्वे सांगूनी केले आम्हा सुजाण ।
आदर्श ठेविला स्वतः (टीप २) करूनी आचरण ।
परि पाणावले नेत्र, सुखावले मन ॥ ५ ॥

देखता अपूर्व सोहळा ‘पादुका धारण’ ।
जाहले भावविभोर अन् कृतज्ञ हे मन ।
अर्पितसे तव चरणी हे शब्दसुमन ।
पाणावले नेत्र, सुखावले मन ॥
पाणावले नेत्र, सुखावले मन ॥ ६ ॥

टीप १ : परात्पर श्रीगुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये

टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी

– श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now