महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सादर केलेल्या सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

१३.१.२०१९ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सांगली येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन सादर केले. कार्यक्रमाच्या आरंभी श्री. सहस्रबुद्धे यांनी सतारीवर सकाळच्या प्रहराचा भक्तीमय राग ‘अहीरभैरव’ सादर केला. त्यानंतर ‘भिन्न ललीत’ हा राग सादर केला. या रागानंतर त्यांनी ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..’ हे कन्नड भाषेतील भक्तीगीत सतारीवर सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता भैरवीने केली. या कार्यक्रमाला प.पू. देवबाबा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

(पूर्वार्ध)

प.पू. देवबाबा

१. कार्यक्रमापूर्वी साधक प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. श्री. मनोज सहस्रबुद्धे प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना आलेल्या अनुभूती

१ अ १. ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे भावावस्थेत आहेत’, असे जाणवणे, त्यांच्यासारखी भावावस्था अनुभवता येण्यासाठी श्रीकृष्णाला प्रार्थना होणे आणि स्वतःच्या अनाहत अन् आज्ञा या चक्रांच्या ठिकाणी गतीमान स्पंदने जाणवू लागणे : ‘सतारवादनाच्या आधी श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी प.पू. देवबाबांना नमस्कार करण्यासाठी त्यांच्या चरणांजवळ भूमीवर डोके टेकवले होते. त्या स्थितीत ते बराच वेळ होते. त्या वेळी ‘ते भावावस्थेत आहेत’, असे मला जाणवले. ते अनुभवत असतांना माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी ‘त्यांच्यासारखी भावावस्था मलाही अनुभवता येऊ दे’, अशी प्रार्थना झाली. तेव्हा माझ्या अनाहत आणि आज्ञा चक्रांच्या ठिकाणी पुष्कळ गतीमान स्पंदने जाणवू लागली.

१ अ २. श्रीकृष्ण, प.पू. देवबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आर्ततेने प्रार्थना होऊन भावजागृती होणे अन् ‘ही आळवणी प.पू. देवबाबांपर्यंत पोहोचत आहे’, असे जाणवणे : त्यानंतर मी श्रीकृष्ण, प.पू. देवबाबा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागत भावाने आळवू लागले. तेव्हा माझ्याकडून पुढील प्रार्थना आर्ततेने होत होती, ‘माझ्यात भक्तीभाव नाही. मी असमर्थ आहे. तुम्हीच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट करून तुमच्या पावन चरणांजवळ घ्या.’ त्या वेळी ‘गुरुदेवांनी माझ्यावर कृपेचा केवढा वर्षाव केला आहे !’, याची जाणीव होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा ‘माझी ही आळवणी प.पू. देवबाबांपर्यंत पोहोचत आहे’, असे मला जाणवत होते.’

– सौ. सीमंतिनी बोर्डे, संभाजीनगर

१ अ ३. श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना पाहून आतून रडू येणे आणि त्यांचाही भाव जागृत झाल्याचे जाणवणे : ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे कार्यक्रमाच्या आरंभी भूमीवर डोके टेकवून प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना ते तशाच स्थितीत बराच वेळ राहिले. थोड्या वेळाने ते गुडघ्यावर बसून नमस्काराच्या मुद्रेत बराच वेळ राहिले. तेव्हा मला आतून रडू येत होते. तेव्हा मी काकांकडे पाहिल्यावर त्यांचाही भाव जागृत होऊन त्यांनाही रडू येत असल्याचे दिसले.

१ आ. कु. तेजल पात्रीकर प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना आलेली अनुभूती

१ आ १. आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवणे, डोळे आपोआप बंद होऊन ध्यान लागणे आणि मन निर्विचार होणे : कु. तेजल पात्रीकर भूमीवर डोके टेकवून प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना ती तशाच स्थितीत बराच वेळ राहिली. ती नमस्कार करत असतांना माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. त्यानंतर डोळे आपोआप बंद होऊन माझे ध्यान लागले आणि मन निर्विचार झाले. थोड्या वेळाने मी डोळे उघडून पाहिले. तेव्हा तेजलताईही गुडघ्यावर बसून प.पू. देवबाबांना नमस्कार करत असल्याचे दिसले.’

– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२. श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सादर केलेल्या सतारवादनाच्या वेळी उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती

सतारवादन करतांना श्री. मनोज सहस्रबुद्धे

२ अ. सतारवादन : सतारीवर रागाचे वादन करतांना ते ‘आलाप’, ‘जोड’, ‘झाला’ आणि ‘गत’ या चार टप्प्यांत केले जाते. ‘आलाप’ विलंबित लयीत चालू होतो. हळूहळू वादनाची लय वाढत जाते. आलाप, जोड आणि झाला हे तबल्याविना, तर ‘गत’ तबल्याच्या समवेत वाजवली जाते. ‘गत’ तबल्याच्या समवेत विलंबितमध्ये चालू होऊन तिचा शेवट द्रुत लयीत होतो.

२ आ. ‘अहीरभैरव’ रागाच्या वादनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ आ १. साधिकेचे डोळे आपोआप बंद होऊन अंतर्मनातून आपोआपच पुष्कळ प्रार्थना होऊ लागणे : ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी संथ गतीने ‘अहीरभैरव’ हा राग वाजवायला आरंभ केल्यावर माझे डोळे आपोआप बंद झाले. मी नमस्काराच्या मुद्रेत बसून होते. माझे मन एकाग्र झाले. एरव्ही मला प्रार्थना करायला कधीच सुचत नाहीत; पण त्या वेळी अंतर्मनातून आपोआपच पुष्कळ प्रार्थना होऊ लागल्या. आतूनच आपोआप देवाप्रती शरणागती जाणवू लागली.

२ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांच्या चरणांवर सूक्ष्मातून डोके टेकवून नमस्कार करणे : द्रुत गतीने ‘अहीरभैरव’ राग वाजवल्यावर मन पूर्णपणे निर्विचार झाले आणि प्रार्थना आपोआप बंद झाल्या. तेव्हा मी आपोआप संपूर्ण शरणागतीने मधूनच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर, तर मधूनच प.पू. देवबाबांच्या चरणांवर सूक्ष्मातून डोके टेकवून नमस्कार करत होते. कोणाच्या चरणांवर डोके टेकवत आहे, यावरही माझे नियंत्रण नव्हते. मधूनच मी सूक्ष्मातून प.पू. देवबाबांशी सूक्ष्मातून संवाद साधत होते.’

– कु. तृप्ती कुलकर्णी

२ आ ३. रागाच्या आरंभी मन एकाग्र होऊन अंतर्मुखता वाढणे आणि ‘नृत्य करावे’, असे वाटणे : ‘अहीरभैरव’ या रागाच्या आरंभी श्री. मनोजकाका आलाप वाजवत असतांना माझ्या मनाला पुष्कळ आनंद जाणवत होता. रागाला आरंभ झाल्यावर मन एकाग्र होऊन माझी अंतर्मुखता वाढली. काही वेळा मला ‘नृत्य करावे’, असे वाटत होते.

२ आ ४. राग द्रुत लयीत वाजवत असतांना माझे आपोआप ध्यान लागले.

२ आ ५. भगवान शिवाचे अस्तित्व जाणवणे आणि त्यानंतर शांतता अन् स्थिरता जाणवणे : या रागात मला भगवान शिवाचे अस्तित्व जाणवले. राग चालू असतांना थोड्या वेळाने ‘भगवान शिव येथे आला आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर मला पुष्कळ शांतता आणि स्थिरता जाणवत होती.

२ आ ६. ‘सतारीचा नाद चालूच रहावा, थांबूच नये’, असे मला वाटत होते.

२ आ ७. ‘मी कोणत्यातरी वेगळ्या ठिकाणी आले आहे’, असे मला जाणवले.’

– कु. म्रिणालिनी देवघरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ आ ८. गाढ ध्यानावस्था अनुभवणे आणि त्यानंतर एका अवर्णनीय आनंदसागरात डुंबत असल्याची अनुभूती येणे : ‘अहीरभैरव’ राग संपेपर्यंत मला गाढ ध्यानावस्था अनुभवता आली. माझ्या मानेवरील नियंत्रण सुटून ती वजनरहित झाल्यामुळे डोलत होती. त्या वेळी मला एका अवर्णनीय आनंदसागरात डुंबत असल्याची अनुभूती आली.’ – सौ. सीमंतिनी बोर्डे

२ आ ९. ‘अहीरभैरव’ रागातून निर्माण होणारी गतीमान स्पंदने रेखाटावीत’, असे वाटणे : ‘अहीरभैरव’ रागाचा ‘आलाप’ चालू असतांना ‘आकृती ‘अ’ मध्ये दाखवलेला आकार हळूवारपणे रेखाटत रहावे’, असे मला वाटले. त्यानंतर याच रागाचा ‘झाला’ ऐकतांना ‘आकृती ‘आ’मध्ये दाखवल्याप्रमाणे दक्षिण भारतात काढल्या जाणार्‍या रांगोळ्यांसारखी कलाकृती काढावी’, असे मला वाटले.

२ आ ९ अ. प.पू. देवबाबांनी ‘अहीरभैरव’ रागाच्या स्पंदनांविषयी सांगितलेले शास्त्र : प.पू. देवबाबांना आकृती ‘आ’ दाखवल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘हे चित्र योग्य काढले आहे. ‘अहीरभैरव’ रागाची स्पंदने सप्तचक्रांतून प्रवास करतांना अशाच प्रकारे उभी (vertical) जातात. ती गोलाकार (Circular) जात नाहीत.’’ ‘स्पंदनशास्त्रानुसार ही कलाकृती गतीमानता आणि शक्ती दर्शवते’, असे मला नंतर समजले.

२ आ १०. ‘या रागाच्या वादनाचा परिणाम माझे आज्ञाचक्र आणि सहस्रार यांच्यावर अधिक प्रमाणात झाला’, असे माझ्या लक्षात आले.

२ आ १० अ. या अनुभूतीविषयी प.पू. देवबाबांनी सांगितलेले शास्त्र : याविषयी प.पू. देवबाबांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘हे योग्य आहे. ‘अहीरभैरव’ हा सकाळचा राग आहे आणि त्या रागाचे सतारीवर वादन सकाळच्या वेळेत केल्यामुळे असे झाले.’’

२ इ. ‘भिन्न ललीत’ रागाच्या वादनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

२ इ १. ‘श्री. मनोजकाका ‘भिन्न ललीत’ हा राग वाजवत असतांना माझ्या मनाची एकाग्रता वाढली आणि माझे ध्यान लागले.

२ इ २. ‘हेे वादन वेगळ्या लोकात चालू असून तबल्याच्या बोलांवर कुणीतरी नृत्य करत आहे’, असे मला वाटले. तेथे सगळीकडे पांढरा प्रकाश दिसत होता.

२ इ ३. ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे त्या रागाशी अंतरंगातून जोडले गेले असून प.पू. देवबाबा वादनासाठी त्यांना शक्ती देत आहेत’, असे जाणवणे : श्री. मनोजकाका पुष्कळ मनापासून वादन करत होते. त्या वेळी ‘काका त्या रागाशी अंतरंगातून जोडले गेले आहेत आणि प.पू. देवबाबा वादनासाठी श्री. मनोजकाकांना शक्ती देत आहेत’, असे जाणवले.

२ इ ४. वादन पृथ्वीपासून पुष्कळ उंचावर चालू असून तेथे पुष्कळ नर्तक नृत्य करतांना दिसणे आणि तेथे देवता उपस्थित असून त्यांनी श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना आशीर्वाद देणे : हा राग चालू असतांना काही वेळानंतर मला पुढील दृश्य दिसले, ‘श्री. मनोजकाकांचा सतारवादनाचा कार्यक्रम पृथ्वीपासून पुष्कळ उंचावर चालू होता. त्या ठिकाणी पुष्कळ नर्तक नृत्य करत होते, तसेच ते काकांना वादनात साहाय्यही करत होते. तेथे वेगवेगळे नादही ऐकू येत होते. तेथे काही देवताही उपस्थित होत्या आणि काकांना आशीर्वाद देत होत्या.’

– कु. म्रिणालीनी देवघरे

२ इ ५. साधिकेला ती भूमीपासून उंच उंच जात असल्याचे जाणवणे : ‘हा राग वाजवल्यावर आरंभी माझे मन अस्वस्थ झाले. डोळे बंद करून एकाग्रतेने ऐकण्याचा प्रयत्न केल्यावर मी भूमीपासून उंच उंच जात असल्याचे जाणवले. तेव्हा मी उंचावरून भूमीकडे पहात असल्याचे जाणवले.’ – कु. तृप्ती कुलकर्णी

२ इ ६. या रागाच्या आरंभी दाब जाणवणे, ध्वनीक्षेपक बंद पडणे, त्याच वेळी पोटात कळ येणे आणि श्री. मनोज यांच्यातील भावामुळे वातावरणातील दाब न्यून होणे, ध्वनीक्षेपकही पूर्ववत चालू होणे अन् पोटदुखी थांबणे : ‘या रागाच्या आरंभी मला दाब जाणवत होता. ‘कार्यक्रमात अडथळे येण्यासाठी मांत्रिक (बलाढ्य वाईट शक्ती) प्रयत्न करत आहेत’, असे मला जाणवले. माझ्या पोटात जोरात कळ आली आणि त्याच वेळी ध्वनीक्षेपकही बंद पडले. त्यानंतर श्री. मनोजकाकांच्या ईश्‍वराप्रतीच्या भावामुळे वातावरणातील दाब न्यून झाला. ध्वनीक्षेपक पूर्ववत चालू झाले आणि माझ्या पोटातील दुखणेही थांबले.

२ इ ७. या रागाच्या वेळी ‘कार्यक्रमस्थळी श्री लक्ष्मीदेवी हत्तीवर बसून आली आहे’, असे मला जाणवले.

२ इ ८. श्री. मनोजकाका बसलेल्या ठिकाणी मला शिवपिंडी दिसली. तिच्यावर बेल आणि पांढरी फुले (त्रिदल कमळे) वाहिली होती. श्री. राम होनप यांनाही तसेच दिसल्याचे त्यांनी नंतर सांगितले.’

– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

२ इ ९. ‘हा राग ऐकत असतांना ‘मी एका पोकळीत जात असून श्री. मनोजदादांकडून पांढर्‍या प्रकाशाचा एक झोत माझ्याकडे येत आहे आणि तो सहस्रारातून माझ्या शरिरात जात आहे’, असे मला जाणवले.’ – सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ इ १०. प्रभु श्रीरामाचे मंदिर दिसणे, एक आकार दिसून तो देवीतत्त्वाशी संबंधित असल्याचे नंतर समजणे आणि रामराज्याची अनुभूती येणे : ‘या रागाच्या वेळी मला प्रभु श्रीरामाचे एक मंदिर दिसले. त्या मंदिरात छत्रधारी सिंहासनारूढ श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचे दर्शन झाले. त्या वेळी तेथे मला एक आकार दिसला. (आकृती क्र. १ पहा) ‘हा आकार देवीतत्त्वाशी संबंधित आहे’, असे मला नंतर समजले. या वेळी सगळीकडे रामराज्य आले असून रामराज्यातील शांतता जाणवत होती. त्या वेळी माझे मन शांत झाले होते.

२ इ १० अ. वरील अनुभूतीविषयी प.पू. देवबाबांनी सांगितलेले शास्त्र : प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘हा सतारीचा, तसेच वाजवणार्‍या कलाकाराच्या आतील शांत प्रवृत्तीचा परिणाम आहे. श्री. सहस्रबुद्धे यांनी समाधी अवस्थेत (आनंदात) वादन केल्यामुळे ती स्पंदने तुमच्या सर्वांपर्यंत पोचली.’’

– वैद्या (कु.) आरती तिवारी

२ ई. ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा…’ या कन्नड भाषेतील भजनाच्या वादनाच्या वेळी आलेली अनुभूती

२ ई १. कमळामध्ये उभी असलेली श्री लक्ष्मीदेवी कार्यक्रमस्थळी आलेली दिसणे आणि श्री लक्ष्मीदेवीशी संबंधित भजन वाजवल्याचे नंतर समजणे : ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा…’ या कन्नड भाषेतील भजनाचे वादन करण्यास आरंभ केल्यावर तेथे ‘ललीत’ रागाच्या वादनाच्या वेळी आलेली श्री लक्ष्मीदेवी काका बसलेल्या आसनाच्या ठिकाणी आलेली दिसली. देवी कमळामध्ये उभी असून तिच्या दोन्ही बाजूंना दोन हत्ती उभे होते. थोड्या वेळाने ‘श्री लक्ष्मीदेवी श्रीविष्णूचे चरण दाबत आहे’, असे मला दिसत होते.

‘श्री. मनोजकाका सतारीवर कोणते भजन वाजवत आहेत ?’, हे मला ठाऊक नव्हते. कार्यक्रम झाल्यावर मी काकांना विचारले, ‘‘तुम्ही लक्ष्मी किंवा श्रीविष्णु यांच्या संबंधित एखादे भजन सादर केले का ?’’ तेव्हा त्यांनी मला ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा…’ हे भजन वाजवल्याचे सांगितले. त्या वेळी ‘मला तेथे श्री लक्ष्मीदेवी का दिसत होती ?’, यामागील कारण समजले. ‘श्री. मनोजकाकांच्या ईश्‍वराप्रतीच्या भावामुळे ‘देवीही आधीपासूनच त्या क्षणाची वाट पहात होती’, असे त्या वेळी मला जाणवले. ‘देव भक्तासाठी किती करत असतो !’, याची अनुभूती देवाने या वेळी दिली.’ – कु. मयुरी डगवार

२ उ. ‘भैरवी’वादन

२ उ १. ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी वाजवत असतांना पांढरे वस्त्र परिधान केलेली एक देवी कार्यक्रमस्थळी आल्याचे मला जाणवले.’ – सौ. अनघा जोशी

२ उ २. प.पू. देवबाबा एका पोकळीत घेऊन जात असल्याचे जाणवणे, तेथे पांढरा प्रकाश दिसणे आणि त्यानंतर मन निर्विचार होणे : ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादनाला आरंभ केल्यावर मी डोळे बंद करून ते ऐकत होते. त्या वेळी ‘प.पू. देवबाबा मला एका पोकळीत घेऊन जात आहेत’, असे जाणवले. तेथे मला पुष्कळ पांढरा प्रकाश दिसत होता. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले होते. माझ्या डोळ्यांतून गार पाणी येत होते आणि मला देवाची पुष्कळ आठवण येत होती.’

– कु. मयुरी डगवार

२ उ ३. ‘श्री. मनोजदादा सतार वाजवत असतांना मला श्री सरस्वतीदेवीचे अस्तित्व जाणवत होते.

२ उ ४. ‘हा कार्यक्रम वेगळ्याच लोकात होत आहे’, असे मला वाटत होते.

२ उ ५. ते सतारीवर लयकारी वाजवत असतांना ‘एकेक मिंड त्यांच्या अंतरंगातून येत असून सतार त्यांच्या रोमारोमात भिनलेली आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. अनघा जोशी

(मिंड : मिंड म्हणजे एका स्वरावरून दुसर्‍या स्वरावर जातांना त्या दोन स्वरांमधील सर्व श्रुतींना स्पर्श करत जाणेे. मिंडमुळे स्वर एकमेकांना सलगतेने जोडले जाऊन त्यांतील गोडवा वाढतो.)

२ ऊ. अन्य अनुभूती

२ ऊ १. आज्ञाचक्रापासून कपाळावरील केसांच्या भांगापर्यंतच्या भागात जणू एखादी झडप उघडल्यासारखे जाणवून वाद्यांचे सूर आज्ञाचक्रातून माझ्या शरिरात पसरत असल्याचे जाणवणे : ‘श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्यासह श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबला वाजवायला आरंभ केल्यावर माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी आज्ञाचक्र ते माझ्या कपाळावरील केसांच्या भांगापर्यंतच्या भागात जणू एखादी झडप उघडावी तसे जाणवले. ते दोघे वाजवत असलेल्या वाद्यांचे सूर आज्ञाचक्रातून माझ्या शरिरात पसरत असल्याचे जाणवत होते.’ – कु. तृप्ती कुलकर्णी

२ ऊ २. सतारवादनाचा परिणाम बाह्य वातावरणापेक्षा ऐकणार्‍याचे अंतर्मन आणि सूक्ष्म देह यांवर अधिक होत असल्याचे जाणवणे अन् त्यामुळे ऐकणारे सर्वच जण गाढ ध्यानात जाणे : ‘सतारवादनाचा परिणाम बाह्य वातावरणापेक्षा ऐकणार्‍याचे अंतर्मन आणि सूक्ष्म देह यांवर अधिक होतो’, असे मला जाणवले. त्यामुळे ‘निसर्ग (सभोवतालची झाडे, वेली, गायी, प्राणी आणि अन्य जीव), तसेच सभागृहातील सर्वच जण लगेच गाढ ध्यानात गेले’, असे माझ्या लक्षात आले.

२ ऊ ३. सतारवादन करत असतांना श्री. मनोज सहस्रबुद्धे ध्यानावस्थेत असल्याचे मला जाणवले.’

– वैद्या (कु.) आरती तिवारी (२७.१.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now