‘व्हॅलेंटाईन डे’चे भूत उतरेल का ?

नोंद

पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण किंवा त्याचा पगडा, हा गेल्या अनेक दशकांपासून भारतियांवर विशेषतः तरुणाईला भुरळ घालत आहे. त्यामुळे आजची तरुणाई धर्माचरणापेक्षा मौज-मस्ती करण्यातच अधिक वेळ वाया घालवतांना निदर्शनास येते. हिंदु धर्मात ‘व्हॅलेंटाईन डे’ला कधीच तसूभरही स्थान नव्हते; परंतु आजची भरकटलेली, दिशाहीन तरुण पिढी ज्या उत्साहात हा दिवस साजरा करतांना दिसते, त्या तुलनेत ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करणारे फारच थोडे किंवा बोटावर मोजणारे लोक असतील.

कालपर्यंत तरुणाई १४ फेब्रुवारी हा दिवस  ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करून पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानत होती; मात्र त्याच दिवशी एकदा आतंकवाद्यांनी एक नापाक आणि भ्याड दुष्कृत्य करून माणुसकीला काळीमा फासला.

आक्रमणानंतर देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून निषेध, निंदा व्यक्त करण्यात येत आहे. पण ते किती दिवस, किती महिने टिकेल ? आजपर्यंत आतंकवाद्यांनी अनेक आक्रमणे, कारवाया केल्या. अनेक निरपराध नागरिक ठार झाले, तर सहस्रो सैनिक हुतात्मा झाले. त्यावर विविध माध्यमांतून चीड, संताप, निषेध व्यक्त करण्यात आले. काही दिवसांनी लोक ते विसरूनही गेले. काही महिने, वर्षे सरतात न सरतात तोच पुन्हा आक्रमण, निषेध यांचे सत्र चालू होते. गेली अनेक वर्षे आपण हेच पहात आलो आहोत.

मात्र १४ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या आत्मघाती आक्रमणात ४२ सैनिक मृत्यूमुखी पडलेे. यामुळे हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून जगासमोर आला. सामाजिक माध्यमांतून निषेध आणि श्रद्धांजली यांसारखे संदेश नि ‘स्टेटस’ फिरू लागले. त्यातच एक संदेश पहावयास मिळाला. तो म्हणजे ‘आजपासून १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून नाही, तर ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा केला जाईल.’ यावरून असा विचार आला की, आतातरी तरुणाईच्या डोक्यातून ‘व्हॅलेंटाईन डे’चे भूत उतरेल का ?

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ओंगळवाणे प्रेमाचे प्रदर्शन होते. या निमित्ताने भेटवस्तू विकणारी आस्थापने स्वत:चा गल्ला भरून घेतात. अनेक अपप्रकारांना उधाण येते आणि प्रेमाला बाजारू स्वरूप येते. इतरांवर त्याचा वेगळाच परिणाम होतो. त्यामुळेच हिंदु धर्मात आणि भारतीय संस्कृतीत असे दिखाऊ ‘डे’ साजरे करण्याची परंपरा नाही. आई-वडील, कुटुंबीय, समाजबांधव, राष्ट्र आणि धर्म यांची कायमच काळजी घेण्याची, त्यांचे ऋण फेडण्याची संधी विविध माध्यमांद्वारे हिंदु धर्म उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे हिंदूंना प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगळे दिवस धुंडाळत बसण्याची आवश्यकता नसते. अशुभ घटना झालेल्या दिवशी तर हिंदू चांगला दिवस साजरे करण्याचेच टाळतात. परिणामी आता आतंकवादी आक्रमणाच्या दु:खद घटनेमुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ला हद्दपार करणेच चांगले !

–  श्री. सुधांशू जोशी, डोंबिवली (जि. ठाणे)


Multi Language |Offline reading | PDF