पुलवामामध्ये सीआरपीएफच्या पोलिसांवर आतंकवादी आक्रमण होण्यामागे सुरक्षेमधील त्रुटीही कारणीभूत ! – माजी ‘रॉ’ प्रमुख विक्रम सूद

यासाठी उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

भाग्यनगर – पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी आक्रमण घडवून आणणे हे कोणा एकट्याचे काम नाही. यामागे अनेकांचा हात असणार. इतकेच नव्हे, तर सुरक्षेमधील त्रुटीही याला कारणीभूत आहे; कारण सीआरपीएफची वाहने तेथून जाणार असल्याची आतंकवाद्यांना आधीच माहिती होती. त्यामुळे ते या कारवाईत यशस्वी झाले, असे प्रतिपादन ‘रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसिस विंग’ (रॉ) या भारतीय गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी काढले. सूद येथे ‘बाह्य गुप्तवार्ता आणि देशाची सुरक्षा’ या विषयावर आयोजित एका कार्यशाळेत बोलत होते. सूद यांना गुप्तचर विभागात काम करण्याचा ३१ वर्षांचा अनुभव आहे.

१. ‘या आक्रमणाचे प्रत्युत्तर भारताने द्यायला हवे का ?’ या प्रश्‍नावर श्री. सूद म्हणाले की, हा काही मुष्टीयुद्धाचा सामना नाही. ‘ठोशाच्या बदल्यास ठोसा’ असे चालत नाही. पंतप्रधानांनी याआधीच सांगितले आहे की, वेळ आणि ठिकाण यांची निवड सुरक्षादल करतील. त्याप्रमाणेच याविरोधात कारवाई होईल.

२. जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्यात चीनची आडकाठी आहे. यावर श्री. सूद म्हणाले की, पाकिस्तानच्या म्हणण्यावर चीन हा विरोध करत आहे. चीनने अझहरला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित करण्याच्या सूत्राला पाठिंबा दिला, तर चीनच्या शिनजियांग प्रांतातील इस्लामी संघटना पाकमधील आतंकवाद्यांशी हातमिळवणी करतील आणि चीनची डोकेदुखी वाढेल, याची त्याला भीती आहे. चीनची ही भूमिका म्हणजे एकमेकांना लाभ करून देण्यासारखे आहे.

३. पाकिस्तानच्या रक्तात भारताविषयीचा तीव्र द्वेष ठासून भरला आहे. तो कितीही प्रयत्न केले, तरी दूर होणार नाही. कितीही शांततेच्या वाटाघाटी केल्या, पाकिस्तानला कितीही सवलती दिल्या आणि लहान भावासारखी वागणूक दिली, तरी त्याचा काहीच लाभ होणार नाही; कारण पाकिस्तानला या सर्व गोष्टींत काहीच स्वारस्य नाही आणि त्याला ते काहीच नको आहे. त्याला केवळ भारताचे दिवाळे काढून भिकारी (भारताला अधिकाधिक संरक्षणावर खर्च करायला लावणे) करायचे आहे. हे सर्व लक्षात घेऊन भारताला पाकिस्तानविषयी परराष्ट्र धोरण राबवावे लागणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF