पंढरपूरचे ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर’ आणि शिर्डीचे ‘श्री साईबाबा संस्थान’ यांमध्ये चालू असलेल्या अयोग्य कारभाराच्या विरोधात महाराष्ट्रभरात राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात विविध राष्ट्रप्रेमी नि हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सामान्य हिंदु नागरिक ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून, तसेच निवेदने सादर करून आपला आवाज शासनदरबारी यशस्वीरित्या पोचवत आहेत.

या दृष्टीने सरकारच्या कह्यात असणार्‍या पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर’ आणि शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थान’ यांच्यामध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चालू असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने ‘संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येऊन मुळातच मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपुर्द करावे’, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमातून महाराष्ट्रभरात करण्यात येत आहे. सरकारकडे द्यावयाचे संबंधित निवेदन येथे देत आहोत.

दिनांक :        .२.२०१९

प्रति,

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय : पंढरपूर येथील ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा’त बेशिस्त बांधकाम करून मंदिराच्या पुरातन वास्तूला धोका निर्माण करणारे आणि शिर्डी येथील ‘श्री साईबाबा संस्थान’चा प्रसाद बनवण्यासाठी बनावट आस्थापनाला कंत्राट देणारे, यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयी…

महोदय,

महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत ज्या ज्या मंदिरांचे सरकारीकरण केले, त्या सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितताच समोर आली आहे. यांतील अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या असून त्याविषयी सुनावण्या चालू आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता यांची नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. सरकारीकरण केलेल्या मंदिर व्यवस्थापनाच्या गलथान आणि अनागोंदी कारभाराचे आणखी एक उदाहरण म्हणजे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ! पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वास्तूला बेशिस्त बांधकामामुळे धोका निर्माण झाल्याचे आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने प्रसादाचा लाडू बनवण्याचे कंत्राट एका बनावट संस्थेला दिल्याची वृत्ते नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. या संदर्भात काही सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.

१. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

अ. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मूळ वास्तूला अलीकडच्या काळात झालेल्या बेशिस्त बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे. अयोग्य बांधकाम हटवून गाभार्‍यातही पालट केल्यास मंदिर आणि श्री विठ्ठल मूर्ती यांचे आयुष्य वाढणार असल्याचे राज्य पुरातत्व विभागाचे संभाजीनगर येथील साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी म्हटले आहे.

आ. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छतावर घालण्यात आलेला ‘स्लॅब’ आणि अनेक ठिकाणी केलेली अस्ताव्यस्त बांधकामे यांमुळे छतावरील वाढलेला अवास्तव भार मूळ मंदिरावर येत असून मंदिराच्या वास्तूस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण मंदिराचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचे काम पुरातत्व विभाग हाती घेणार आहे. यानंतर नेमके कोणते पालट करावे लागतील, याचा अहवाल पुरातत्व विभाग मंदिर समितीपुढे ठेवणार आहे.

इ. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची मूळ वास्तू ११ व्या शतकातील असल्याचे मानले जात असले, तरी अनेक अभ्यासकांच्या मते ही वास्तू त्याहून पूर्वीची आहे. वास्तविक मंदिर ११ व्या शतकातील असले, तरी या नंतरच्या काळात मंदिराच्या शिखराचे काम झाले असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाला वाटतो. या नंतरच्या काळात मात्र मूळ मंदिराच्या छतावर ‘स्लॅब’ घालण्यात आल्याने मूळ मंदिरावरील भार वाढला आहे.

ई. या व्यतिरिक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या ३१ वर्षांत देवस्थानच्या संपत्तीत प्रचंड घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.

२. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान

अ. श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी प्रसाद म्हणून लाडू बनवण्याचा ठेका ‘दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था’ या संस्थेला दिला होता. ही संस्था बनावट असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

आ. वरील संस्थेच्या संचालक मंडळावर ज्या संचालिका आहेत, त्यांना त्यांचे नाव ‘संचालक’ म्हणून घेतल्याचेही ठाऊक नाही. तसेच अनेक संचालकांचे पत्तेही खोटे आहेत.

इ. ही संस्था वर्ष २०११ पासून कार्यरत असल्याचे सांगितले जाते; मात्र या संस्थेचे कार्यालय शोधण्याचा प्रयत्न केल्यावर तेथे बंद गाळे आढळून आले.

ई. संस्थानाकडून हा ठेका वर्ष २०१६ मध्ये देण्यात आला आहे, अशी माहिती ‘माहिती अधिकारा’तंर्गत उघडकीस आली आहे. याचा अर्थ गेली २ वर्षे या ठेक्याचे पैसे नेमके कोणाला मिळत होते, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

उ. या संदर्भात श्री साईबाबा संस्थानने ‘हा ठेका निविदा प्रक्रियेनुसार देण्यात आला आहे. या संस्थेने आम्हाला जी कागदपत्रे सादर केली, त्यानुसार आम्ही ठेका दिला. वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधी वृत्त आल्यावर आम्हाला सर्व कळले. त्यामुळे संस्थेचे काम सध्या थांबवण्यात आले आहे’, असे उत्तर देण्यात आले. अशी थातूरमातूर कारणे सांगून विश्‍वस्त मंडळ या गंभीर प्रकारातून पळवाट काढू शकत नाही. सरकारी कामे जशी चालतात, तशीच बनावट माहितीच्या आधारे मंदिर समित्यांमध्येही कामे चालतात का, याचे अन्वेषण होणे आवश्यक आहे.

ऊ. प्रत्येक वर्षी लक्षावधी साईभक्त मंदिराला भेट देऊन श्री साईंचे दर्शन घेतात आणि जातांना ते प्रसाद घेऊन जातात. त्या लक्षावधी साईभक्तांची ही फसवणूक आहे.

‘श्री साईबाबा संस्थान’मधील अनागोंदी कारभार एवढ्यावरच न थांबता संस्थानने वर्ष २०१५ च्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांच्या मागणीनुसार सुरक्षा साहित्य खरेदी केले. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार नगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या अंदाजित दरांपेक्षा प्रचंड चढ्या दराने हे साहित्य खरेदी केल्याचे स्पष्ट होत आहे. या खरेदी व्यवहारात चढ्या दरापोटी दिलेेले ६६ लाख ५५ सहस्र ९९७ रुपये, त्यातील भ्रष्टाचार स्पष्ट करतात. या भ्रष्टाचारातील अशी अनेक सूत्रे माहिती अधिकारात मिळालेली आहेत.

तरी शासनाकडे आम्ही पुढील मागण्या करत आहोत की,

१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात छतावर घालण्यात आलेला ‘स्लॅब’ आणि अनेक ठिकाणी करण्यात आलेली अयोग्य बांधकामे यांसाठी कोण उत्तरदायी आहेत, त्यांची चौकशी करावी. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

२. मंदिराच्या वास्तूला धोका पोचणार नाही, या दृष्टीने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना शीघ्रतेने कराव्यात.

३. ‘श्री साईचरणी भक्तांनी अर्पण केलेला देवनिधी बनावट संस्थेला देणे’, हे महापाप आहे. त्यामुळे अशा प्रकारे खोट्या संस्थांना ठेका देणारे विश्‍वस्त आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी करून प्रसादासाठी देण्यात आलेली सहस्रो रुपयांची रक्कम नेमकी कोणाला देण्यात आली, याचे अन्वेषण करावे. या समवेतच ज्यांनी ही रक्कम हडप केली आहे, त्यांच्याकडून ती सव्याज वसूल करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

४. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री साईबाबा संस्थान यांच्यासह राज्यातील सरकारीकरण केलेली सर्व मंदिरे सरकारीकरणमुक्त करून त्यांचे व्यवस्थापन भक्तांकडे सुपुर्द करावे.

आपला विश्‍वासू,

व्यक्ती अथवा संघटना यांचे नाव

(संपर्क :           )

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनाची प्रत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदु त्यांच्या शहरातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. या निवेदनाची प्रत हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan या मार्गिकेवर सदर निवेदन मराठी भाषेत उपलब्ध आहे. सदर निवेदन शासनदरबारी दिल्यावर त्याची माहिती दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला पाठवल्यास त्यास प्रसिद्धीही दिली जाईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now