(म्हणे) ‘भारताने युद्ध छेडल्यास प्रत्युत्तर देणार !’

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची धमकी

  • ‘पाक प्रत्युत्तर देणार’ हा प्रश्‍न नाही, तर ‘भारत युद्ध कधी छेडणार?’ हा आहे !
  • भारताने युद्ध छेडल्यास पाक प्रत्युत्तर देण्यास शिल्लक तरी रहाणार आहे का ?

इस्लामाबाद – पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर ‘पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे’, ‘पाकवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला पाहिजे’, अशा चर्चा चालू आहेत. चालू वर्षात भारतात निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाकवर आक्रमण केल्यास सत्ताधार्‍यांना राजकीय लाभ होऊ शकतो. भारताने आक्रमण केले, तर पाक शांत बसेल, अशा भ्रमात राहू नका. आक्रमण केले, तर पाकही त्याला प्रत्युत्तर देईल आणि एकदा युद्ध चालू झाले की, ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल, अशी धमकी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिली. पुलवामा आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पाकच्या नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही धमकी दिली. पत्रकार परिषदेच्या प्रारंभीच इम्रान खान यांनी ‘मी भारत सरकारसाठी उत्तर देत आहे’. तसेच पुलवामा आक्रमणात पाकच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना आरोप होत आहेत’, असेही सांगितलेे. (आतापर्यंत पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी भारतावर केलेल्या आक्रमणाचे पुरावे दिल्यानंतर पाकने ते किती स्वीकारले? त्यावर किती कारवाई केली आणि किती जणांना कठोर शिक्षा केली ? हे इम्रान खान यांनी सांगायला हवे ! – संपादक)

इम्रान खान पुढे म्हणाले की,

१. काश्मीरमधील तरुण मरण्यासाठी का सिद्ध होत आहेत ? आत्मघाती आक्रमणकर्ते  का बनत आहेत ? याचा विचार भारताने केला पाहिजे. कुठलाही प्रश्‍न चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतो. अफगाणिस्तानमध्ये १७ वर्षांच्या लढाईनंतर चर्चेस प्रारंभ झाला आहे. (पाकला चर्चेची भाषा समजत असती, तर ती करता आली असती; मात्र तसे नसल्याने युद्धाची भाषाच योग्य आहे ! – संपादक)

२. पुलवामा आक्रमणाचा पाकला काय लाभ होणार आहे ? पाकिस्तान स्थिरतेकडे जात असतांना अशा गोष्टी पाक करण्याचा विचार करणार नाही. हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे. (‘पाक स्थिरतेकडे जात आहे’, इम्रान खान यांनी केलेला या शतकातील सर्वांत मोठा विनोद आहे. पाक स्थिरतेकडे नाही, तर त्याचे ६ तुकडे होण्याकडे वाटचाल करत आहे, हेच त्याचे भविष्य आहे. – संपादक)

३. कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही सिद्ध आहोत. जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत. आम्ही कारवाई करू.

४. भारताशी कधीही चर्चा करायची म्हटले की, आधी आतंकवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही आतंकवादावर चर्चा करण्यास सिद्ध आहोत. (आता चर्चा करण्याची वेळ संपली आहे ! – संपादक)

५. आतंकवाद संपुष्टात यावा, अशी आमचीही इच्छा आहे. ७० सहस्र पाकिस्तानी नागरिक आतंकवादामुळे मारले गेले आहेत. (मारले गेले, ते आतंकवादी होते, हे जगाला माहिती आहे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now