भारतियांचे जनमत !

संपादकीय

अभिनेत्यानंतर आता राजनेता झालेले तमिळनाडूतील ‘मक्कल निधी मैय्यम’ या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी राजनेत्यांचा सर्वांत मोठा असलेला ‘सर्वज्ञान’ हा अवगुण दर्शवणारे विधान १७ फेब्रुवारीच्या एका कार्यक्रमात केले. काश्मीरमधील नागरिकांना पाकसमवेत जायचे आहे किंवा नाही, या विषयावर जनमत घेण्याची त्यांनी मागणी केली. ‘यासाठी भारत सरकार का घाबरते ?’ असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. इतकेच नव्हे, तर त्यांनी काश्मीरचा ‘स्वतंत्र काश्मीर’ असा उल्लेख केला. कालपर्यंत चित्रपटांत संवाद लेखकांचे ‘डायलॉग्स’ वाचून अभिनय करणार्‍यांनी ‘स्वतःला कळते’ या अहंमधून अशी काही तरी विधाने केल्यावर राष्ट्रभक्तांचा संताप तळपायातून मस्तकात न गेल्यास आश्‍चर्य वाटू नये ! तमिळनाडूमध्ये काही दशकांपूर्वी भारतापासून स्वतंत्र होऊन ‘स्वतंत्र तमिळ इलम्’ची मागणी करण्याचा प्रयत्न झाला होता. अशांपैकीच कोणाचा तरी वारसा कलम हसन चालवत आहेत, असेच आता वाटू लागले आहे. तमिळनाडूमध्ये जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या राजकीय नेतृत्वामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न कमल हसन करत आहेत. अशा वेळी त्यांच्या या विधानांतून त्यांची विचारसरणी कशी आहे, हे समोर आले, ते योग्यच झाले. यातून तमिळनाडूतील राष्ट्रभक्तांना त्यांची ही विचारसरणी लक्षात आली. अन्यथा तमिळी जनता अभिनेत्यांना राजनेता झाल्यावर डोक्यावर बसवते, हे आतापर्यंत घडले आहे. आता कमल हसन यांच्या राष्ट्रघातकी विधानामुळे तसे होणार नाही, अशी अपेक्षा ! कमल हसन यांनी केलेली मागणी पाक अनेक वर्षांपासून करत आहे, तसेच कमल हसन यांच्यासारखे अनेक राष्ट्रघातकीही ती करत आले आहेत. हे पाकचे ‘हस्तक’ आहेत, असेच त्यांना म्हणावे लागेल. काही महाभागांनी तर ‘काश्मीर पाकला परत देऊन टाकावा म्हणजे ही समस्या कायमची मिटेल’, असेही म्हटले होते, हेही लक्षात घ्यायला हवे. या सर्वांना काश्मीरच्या समस्येचा अभ्यास नाही, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांना ‘ही समस्या काय आहे?’, ‘त्यामुळे भारताची बाजू किती योग्य आहे’, ‘काश्मीर भारताचा अविभाज्य भाग कसा आहे’, आदी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, तरी ते समजून घेणार नाहीत. झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, हेच यांच्याविषयी म्हणता येईल. त्यामुळे कमल हसन यांच्या या विधानामागील कारण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हसन म्हणतात, ‘काश्मीरची समस्या पाक आणि भारत यांच्या नेत्यांमुळे निर्माण झालेली आहे.’ त्यांनी येथे हे स्पष्ट केलेले नाही की, भारतातील कोणत्या नेत्यांमुळे ही समस्या निर्माण झालेली आहे ? ती केली असती, तर ते लक्षात आले असते. ही समस्या नेहरूंमुळे निर्माण झालेली आहे, हा इतिहास आहे आणि ती सोडवण्याचा प्रयत्न नंतरच्या आणि आताच्याही एकाही राज्यकर्त्यांनी केलेला नाही. असो. ‘असे राष्ट्रघातकी नेते देणारी निरर्थक लोकशाही आता नको’, असे सांगण्याची हीच वेळ आहे, हे मात्र खरे !

सिद्धू आणि कमल हसन यांना रोखा !

कमल हसन यांचे विधान येण्याच्या आधी पंजाब राज्य सरकारमधील काँग्रेसचे मंत्री आणि पूर्वी भाजपमध्ये असलेले क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांनी ‘काश्मीरप्रश्‍न चर्चेतून सोडवला पाहिजे’, असे विधान केले होते. काश्मीर काँग्रेसने निर्माण केलेली समस्या आहे. त्यामुळे सिद्धू त्या पक्षात गेल्यावर त्यांच्या विचारांत पालट होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या या विधानाचा देशभरातून विरोध होत आहे. पंजाबच्या विधानसभेतही शिरोमणी अकाली दलाने त्यांचा विरोध करत त्यांना सभागृहातून बाहेर काढण्याची मागणी केली; मात्र सिद्धू अद्यापही त्यांच्या विधानावर अडून आहेत. उलट त्यांनी अशी मागणी केली आहे की, जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याला कंधहार विमान अपहरणाच्या वेळी ज्यांनी सोडले होते, त्यांनी त्याला पकडून भर चौकात गोळ्या घालाव्यात. भाजपच्या वाजपेयी सरकारने मसूदला सोडले होते. आताही भाजपचेच सरकार आहे. ‘सिद्धू यांची ही मागणी योग्य आहे’, असे म्हटले, तरी सिद्धू यांना त्यांचे क्रिकेटपटू मित्र आणि आताचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरून पाकप्रेमाचे भरते आले आहे. ते दूर करणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणात सिद्धू यांच्या विधानाचा विरोध होत आहे, त्या प्रमाणात कमल हसन यांचा विरोध केला जात नाही, हे लक्षात घ्यायला हवे. हसन यांच्या विधानाचे गांभीर्य सिद्धू यांच्या विधानाहून अधिक मोठे आहे. हसन थेट काश्मीर पाकला देण्याचेच समर्थन करत आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्तरावर आणि प्रसारमाध्यमांतील मूल्य अत्यंत नगण्य असल्याने त्यांच्या या विधानाकडे कोणी विशेष लक्ष दिलेले नाही, असे म्हणता येईल; मात्र त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कमल हसन यांना काश्मीरमध्ये जनतम घेण्याची अपेक्षा आहे. अशा वेळी त्यांना सांगायला हवे की, केवळ अशी मागणी नाही करता येणार, तर संपूर्ण देशात ‘काश्मीर भारतात रहायला हवे कि नको’, असे जनमत घ्यायला हवे; कारण काश्मीरसाठी संपूर्ण भारतियांनी रक्त सांडले आहे. काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले आहे, तर सहस्रावधी हिंदूंना ठार मारण्यात आले, अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यांची घरेदारे लुटण्यात आली. काश्मीरच्या विकासासाठी भारताने आतापर्यंत अब्जावधी रुपये खर्च केले आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंचे पवित्र अमरनाथ तीर्थक्षेत्र आहे. या सर्वांची उत्तरे हसन यांनी दिली पाहिजेत. हसन यांच्यासारखी देशद्रोही मागणी अन्य कोणीही परत करू नये; म्हणून सरकारने यासाठी कायदाच करायला हवा. अशी कोणी मागणी करील, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला आतंकवादी ठरवण्यात यावे आणि आजन्म कारागृहात टाकण्यात यावे. असे करण्याचे धाडस तरी आताचे राज्यकर्ते दाखवतील का ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now