रॅफेलची पुरुषार्थहीन लाचारी !

श्री. चेतन राजहंस

‘मुंबईचा २७ वर्षीय युवक रॅफेल सॅम्युएलच्या मते, ‘या जगात आनंदापेक्षाही दुःखच अधिक आहे. जन्माला येऊन वेदना सहन करण्यापेक्षा जन्माला न येणे श्रेयस्कर आहे. त्यामुळे मुलांना जन्मालाच घालू नका.’’

रॅफेलचा हा विचार पराकोटीच्या नकारात्मक आणि निसर्गविरोधी ‘अँटी नॅटॅलिझम’ (जन्मविरोधी) चळवळीचा पाया आहे. मुळात ‘मनुष्यजन्म का होतो’, याचे शिक्षण सनातन हिंदु धर्मात आहे; पण ते देण्याची व्यवस्था शाळा-महाविद्यालयांमध्ये नाही. रॅफेलने हिंदु धर्माचे शिक्षण घेण्याचा प्रश्‍नच नसल्याने किंवा बायबलमध्ये मानवी जीवनाची कारणे दिलेली नसल्याने त्याला घोर अज्ञान असणे स्वाभाविक आहे. असे असले, तरी त्याचे अंधसमर्थन करणारे जे हिंदु धर्मात जन्मले आहेेत, त्यांचाही हा नादानपणा केवळ ‘धर्मशिक्षणा’च्या अभावी आहे.

‘जन्म, विवाह आणि मृत्यू या गोष्टी प्रारब्धानुसार होतात’, असे हिंदु धर्म सांगतो. तो जन्माला घातले म्हणून आई-वडिलांकडे जाब मागत नाही, तर जन्मतःच ‘मातृऋण-पितृऋण’ असल्याचे मानतो. वास्तविक कोणी-कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे ठरवता येत नाही. एखादी व्यक्ती जन्मतःच विकलांग झाली, तर तो आई-वडिलांचा दोष नसतो, तर व्यक्तीच्या पूर्वकर्माची ती फळे असतात. जीवनातील ८० टक्के घटना प्रारब्धवश होतात. केवळ साधनेद्वारे प्रारब्धावर मात करता येऊ शकते. सनातन धर्माचे हे सिद्धांत खरेतर शाळांमधून शिकवले गेले पाहिजेत. त्यातून जीवन जगण्याची आनंदी दृष्टी विद्यार्थ्याला मिळेल. एवढेच नाही, तर मनुष्यजन्माच्या उद्धाराचा मार्गही सापडेल !

रॅफेलची पराकोटीची पुरुषार्थहीनता !

‘आई-वडिलांनी त्यांच्या मनोरंजनासाठी मुलाला जन्माला घातले आहे. त्यामुळे आई-वडिलांनी मुलाला त्याच्या जगण्यासाठी पैसे दिले पाहिजेत. जर तुमचे मुलांवर खरेच प्रेम असेल, तर त्यांना जन्माला घालू नका’, असे रॅफेल याचे म्हणणे आहे. या वक्तव्याचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर हेच लक्षात येईल की, ‘परिश्रमपूर्वक अर्थार्जन न करता माता-पित्यांना दोष लावून पैशांची मागणी करणे’, हा निवळ पुरुषार्थहीन लाचारपणा आहे. यात कुठेही तत्त्वज्ञान नाही !! अशा विधानाला जेव्हा तत्त्वज्ञानाची उपमा दिली जाते, तेव्हा तर मोठे आश्‍चर्य वाटू लागते.

सनातन धर्माचे सर्वश्रेष्ठत्व !

निराशावादी दृष्टीकोन बाळगणार्‍या जन्मविरोधी लोकांच्या बुद्धीची कीव करावी, तेवढी थोडीच आहे. ‘कर्मफलन्याय’ आणि ‘पुनर्जन्माचा सिद्धांत’, या हिंदु धर्माच्या शिकवणीमध्ये जन्मविरोधी चळवळीला पडणार्‍या प्रश्‍नांची उत्तरे आहेत; पण ती जाणून घेण्यासाठी जिज्ञासूवृत्ती हवी. मनुष्य जीवनामध्ये असणारे सुख-दुःखाचे प्रमाण, दुःखाची कारणे, ती दूर करण्याचे मार्ग, सुख-दुःखाच्या पलीकडे असणारा आनंद, संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी करावयाचे प्रयत्न म्हणजेच साधना आदींचे विवेचन सनातन धर्मग्रंथांमध्ये आहे. या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते की, कुठे अस्तित्वशून्यतेकडे नकारात्मक दृष्टीने पहाणारी पाश्‍चात्त्य विचारांची जन्मविरोधी चळवळ, तर कुठे मनुष्यजन्माचे कारण, ध्येय, ध्येयप्राप्तीचे मार्ग यांविषयी विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ सनातन हिंदु धर्म !’

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्र्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

काय आहे ‘अँटी नॅटॅलिझम्’ विचारधारा ?

‘अँटी नॅटॅलिझम्’ ही एक अशी वैचारिक भूमिका आहे, जी ‘मनुष्यजन्माला नकारात्मक दृष्टीने पहाते.’ ‘मनुष्याने अपत्याला जन्माला घालून त्याला दु:ख आणि क्लेशदायक अशा या जगात सोडू नये’, असे मत या विचारधारेचे समर्थन करणार्‍यांचे आहे. थोडक्यात सांगायचे, तर संपूर्ण मानववंश नष्ट करण्याकडे या विचारधारेचा कल असतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now