प्रयागराज येथील कुंभपर्वाच्या काळात वाहतुकीची अनुभवलेली दैन्यावस्था !

– श्री. अरविंद पानसरे, कुंभमेळा विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात

‘उत्तरप्रदेशमध्ये कुंभपर्वासाठी गेल्यावर मला वाहतुकीविषयी पुष्कळ विदारक अनुभव आले. सर्वांनाच ही परिस्थिती लक्षात यावी, यासाठी ते अनुभव पुढे देत आहे.

श्री. अरविंद पानसरे

१. वाहतुकीचे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्याचा प्रकार !

प्रयागराज येथील अनेक नागरिक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत. उलट नियम-कायदे धाब्यावर बसवून अतिशय वेगाने वाहन चालवणे, बलपूर्वक विरुद्ध दिशेने वाहने चालवून रहदारी थांबवणे, जोरजोरात ‘हॉर्न’ वाजवून प्रचंड ध्वनीप्रदूषण करणे, वाहन कडेला उभे न करता रस्त्याच्या मधोमध उभे करणे, समोरून गाडी येत असतांना त्याच्या समोरून वाहन घेऊन जाणे, अन्य वाहनांना ‘ओव्हरटेक’ करणे, दुसर्‍या वाहनाला खेटून वाहन चालवणे, वाहनाच्या मधे येणे, मोठे वाहन येत असतांना मधेच सायकलस्वाराने वाहन घालून अडथळा निर्माण करणे, ‘मोठ्या वाहनांना प्रथम जायला संधी दिली पाहिजे’, अशी मानसिकता नसणे, असे प्रकार सर्रास घडत असतात. खेदाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रकारांकडे पोलीसही दुर्लक्ष करतात.

२. सिग्नल व्यवस्था अस्तित्वात नसल्याने वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी !

येथे कुठेही सिग्नल व्यवस्था अस्तित्वात असल्याचे मला जाणवले नाही. मुंबई वा अन्य गर्दीच्या मोठ्या शहरांच्या तुलनेत येथे वाहनांची संख्या अतिशय अल्प असतांनाही प्रयागराज येथे वाहतुकीची कोंडी सतत होत असते. त्यामुळे येथे वाहने चालवणे म्हणजे स्वतःला संकटात घालण्याचा आणि आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेण्याचा प्रकार आहे.

३. पुढील वाहनाने अचानक ‘रिव्हर्स गिअर’ टाकल्याने भोगावे लागलेले परिणाम !

एका कार्यक्रमावरून परततांना आमच्या पुढे असणार्‍या उत्तरप्रदेशमधील एक चारचाकी वाहनचालकाने कोणतीही सूचना अथवा ‘सिग्नल’ न देता अचानक ‘रिव्हर्स गिअर’ टाकून वाहन मागे घेतल्याने ते वाहन आमच्या गाडीवर येऊन आदळले. नंतर हे प्रकरण पोलिसांत नेऊन त्यांच्याकडून पूर्ण हानीभरपाई वसूल करावी लागली. यात धर्मप्रसार कार्यातील एक ते दीड दिवसांचा अमूल्य वेळा वाया गेला.

४. पुष्कळ गर्दी आणि वाहतुकीतील बेशिस्तपणा यांमुळे वेळेवर होणारा गंभीर परिणाम !

४ अ. १५ मिनिटांच्या अंतरावरील रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी अडीच ते साडेतीन घंटे आधीच निघावे लागणे आणि गर्दीत अडकून पडणे : कुंभपर्वात धर्मप्रसाराच्या सेवेत देशभरातून आलेल्या साधकांना रेल्वेस्थानकावरून आणणे आणि सोडणे या सेवेसाठी वाहन विभागातील साधकांना पुष्कळ वेळ द्यावा लागत होता. वाहनाने १५ मिनिटांच्या अंतरावरील रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी अडीच ते साडेतीन घंटे आधीच निघावे लागायचे. कधी-कधी चार घंटे गर्दीत अडकून पडावे लागायचे. एखाद्या वेळेस गर्दीत अडकल्यावर ‘आता रेल्वे चुकणार’, अशीच धास्ती वाटू लागायची. मग गल्लीबोळातील वा लांबचे मार्ग शोधून तारेवरची कसरत करत रेल्वे स्थानक गाठावे लागायचे.

४ आ. साधकांना सोडण्या-आणण्यात एक दिवस जाणे आणि वाहन विभागातील साधकांना प्रसाद अन् महाप्रसाद घेण्यास ४ घंटे विलंब होणे : येथे पाच-दहा मिनिटांच्या अंतरासाठी २ ते ३ घंटे वेळ द्यावkा लागतो. साधकांना सोडण्याच्या दोन फेर्‍या करण्यासाठी वाहन विभागातील साधकांचा एक दिवस जात होता. त्यात प्रयागराज येथे वाहन चालवण्याची सेवा करणारे सनातनचे एक-दोन साधक सोडले, तर बाकी सर्व जण अन्य राज्यांतून आलेले होते; मात्र तरीही ते त्यांचे कौशल्य पणाला लावून ने-आण करण्याची सेवा चिकाटीने करायचे. प्रसाद आणि महाप्रसाद घेण्यास त्यांना ४ घंटे विलंब व्हायचा. येथे प्रवास करणार्‍या अन्य लोकांनाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल, हे यावरून लक्षात येते.

५. निष्क्रीय उत्तरप्रदेश सरकार आणि ढिम्म पोलीस प्रशासन !

उत्तरप्रदेश सरकारकडून वाहतूक समस्येवर कोणतीही उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. एकाने यावर सांगितले की, सरकार जाणीवपूर्वक यावर उपाय काढत नाही; कारण सरकारला इतरांना दाखवायचे आहे की, येथे मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत. पोलीस प्रशासनही एकदम ढिम्म आहे. केवळ अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ते तत्परतेने कार्य करतांना दिसते. त्यामुळे प्रशासनाला सर्वसामान्य जनतेशी काही देणेघेणे नसते.

६. साधूसंत, आखाडे यांच्या वाहनचालकांकडून अतिशय वेगाने वाहने चालवली जाणे

यात कहर म्हणजे अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी सतत वाहतूककोंडी केली जात असल्याने अन्य लोकही मनाला येईल, तसे वाहन चालवतात. आखाडे, संप्रदाय, खालसे आदींचे संत, महंत आणि साधू यांच्या गाड्यांचे चालक तर स्वतःला अतीमहत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे म्हणजेच ‘व्हीव्हीआयपी’ असल्याप्रमाणे भरधाव अन् जोरजोरात हॉर्न वाजवून गाड्या चालवतात. ते पोलीस वा प्रशासन यांपैकी कोणालाच जुमानत नाहीत. ते पाहून एकवेळ सामान्य जनता परवडली, असे म्हणण्याची वेळ येते. प्रशासन आणि पोलीस त्यांच्यासमोर हतबल असल्यासारखेच वागतात.

७. रस्त्यावरून चालणारी बेडर जनता !

वाहनचालकांप्रमाणे रस्त्यावरून चालणारी जनताही तितकीच बेडरपणे वागते. रस्त्याच्या मधोमध चालणे, कितीही जोरात ‘हॉर्न’ वाजवला, तरी बाजूला न सरकणे असे प्रकार होतात. अगदी गाडी त्यांना खेटली की, ते बाजूला सरकतात. एकूणच लोकांची मानसिकता आणि त्यांचे वागणे यांत संवेदनशीलता अन् इतरांचा विचार जराही दिसत नाही, याचा ठायी ठायी अनुभव आला.’

(श्री. अरविंद पानसरे हे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्तेही आहेत.)

कुंभक्षेत्राचे पावित्र्य नष्ट करून समाजाला अध्यात्मापेक्षा मायेकडे प्रवृत्त करणारे उत्तरप्रदेश सरकार !

१. कुंभक्षेत्रात गुटखा, पानमसाला, तंबाखू यांच्या दुकानांना अनुमती देऊन कुंभक्षेत्राचे पावित्र्य नष्ट करणारे उत्तरप्रदेश सरकार !

‘कुंभपर्व हे आध्यात्मिक स्थान असून तेथे तीर्थक्षेत्राप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात, तसेच त्या दृष्टीने नियोजन केलेले असते. अशा वेळी कुंभक्षेत्रात उत्तरप्रदेश सरकारकडून सर्रासपणे गुटखा, पानमसाला, तंबाखू, सिगारेट आदी मादक पदार्थांच्या विक्रीची अनुमतीही दिली जाते. हे एकप्रकारे कुंभमेळ्याचे पावित्र्य नष्ट करण्यासारखे आहे. एकीकडे मुसलमान आक्रमकांनी दिलेली नावे पालटायची, तसेच देवता-ऋषिमुनी यांची चित्रे काढून संपूर्ण कुंभमेळ्याला आध्यात्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे मादक पदार्थांची विक्री करायची, हे म्हणजेे मूळ उद्देशाला हरताळ फासण्यासारखेच आहे.

२. लोकांना ईश्‍वरापासून दूर करून मायेत अडकवण्याचा प्रयत्न करणारे उत्तरप्रदेश सरकार !

उत्तरप्रदेश सरकारने नफा मिळवण्यासाठी कुंभक्षेत्रात सहस्रो दुकानांना अनुमती दिलेली आहे. त्यात लहान मुलांची खेळणी, चटपटीत खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्यप्रसाधने, घरगुती साहित्य, मनोरंजनाचे साहित्य आदी अनेक दुकांनाचा समावेश होता. हे पाहिल्यावर असे वाटले की, मायेपासून दूर जाता यावे; म्हणून संतदर्शन आणि गंगास्नान करण्यासाठी लोक कुंभमेळ्यात येतात. ते ईश्‍वरचिंतनासाठी वेळ देतात; मात्र उत्तरप्रदेश सरकार या सर्व प्रकारांद्वारे जनतेला ईश्‍वरापासून दूर करून मायेत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. खरंच ‘या कुंभमेळ्याचा जनतेला आध्यात्मिक स्तरावर किती लाभ होत असेल’, असा प्रश्‍न पडतो.’

– श्री. अरविंद पानसरे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now