जाधव निर्दोष असून पाकने अडकवले ! – भारताचा युक्तीवाद

आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी चालू

कुलभूषण जाधव प्रकरण

निर्दोष असलेले कुलभूषण जाधव पाकमधील कारागृहात खितपत पडले आहेत. भारताने असले आंतरराष्ट्रीय स्तरावर खटले लढवत बसण्यापेक्षा एव्हाना पाकमध्ये घुसून त्यांना भारतात परत आणणे अपेक्षित होते !

हेग (नेदरलॅण्ड) – आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकने अटक करून फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याची सुनावणी १८ फेब्रुवारीपासून पुन्हा चालू झाली. ती २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. भारताच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता हरिश साळवे बाजू मांडत आहेत. ‘जाधव निर्दोष आहेत आणि पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवत आहे’, असा युक्तीवाद अधिवक्ता साळवे यांनी केला आहे.

अधिवक्ता साळवे यांनी केलेला युक्तीवाद

१. भारताकडे जाधव यांच्या अपहरणाचे पुरावे आहेत. पाकने जाधव यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. पाकने जाधव यांना दूतावासाशी संपर्क करण्यास दिलेला नाही. त्यांना त्यांची बाजू मांडण्यास न देता दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली. भारत आणि पाक यांच्यात व्हिएन्ना परिषदेत सहमती करार झाला होता. या करारानुसार पाकमध्ये भारतीय नागरिकाला अटक केल्यास त्याला दूतावासाशी संपर्क करू देण्यास पाक बांधील आहे.

जाधव यांना अटक करतांना असे करू दिले नाही. या संदर्भात भारताने पाठवलेल्या १३ स्मरणपत्रांचे उत्तर पाकने दिलेले नाही.

२. पाकिस्तान भारताच्या एका निर्दोष नागरिकाचा जीव घ्यायचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान जाधव यांच्यावर ठेवण्यात आलेल्या कोणत्याही आरोपांची माहिती देत नाही. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगण्यात येत आहेत. ते कोणते आरोप आहेत, याची माहिती मिळाली पाहिजे. त्यांना कोणत्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, हे जगाला समजले पाहिजे.

३. पाकिस्तानने सार्क कराराचेही उल्लंघन केले आहे. ही गंभीर गोष्ट आहे. तेथील सैन्य न्यायालयाच्या आदेशाची प्रतही पाकने भारताला दिलेली नाही. त्यामुळे हे गंभीर प्रकरण गुलदस्त्यात ठेवण्याचे कारण काय ? पाकने दडपशाही करत जाधव यांना गुन्हा स्वीकारण्यास भाग पाडले. पाकने ३ वर्षे जाधव यांच्यावर अत्याचार केले.

कुलभूषण जाधव सध्या पाकच्या कारागृहात आहेत. पाकमध्ये घातपाती कृत्ये आणि आतंकवादी कारवाया केल्याचा कथित आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या शिक्षेला भारताने हेग न्यायालयात आव्हान दिले. यानंतर या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू’, असे पाकच्या एका अधिकार्‍याने सांगितले आहे.


Multi Language |Offline reading | PDF