माहिती, ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञानाच्या मर्यादा !

नोंद

मुले शाळेत जातात. पुढे पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना ‘आपण ज्ञान मिळवले’, असे वाटते; परंतु खरेच शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षणाला ज्ञान म्हणता येईल का ? ‘गूगल’ आणि ‘याहू’ या मायाजालातील माहितीलाही ज्ञान म्हटले जाते. तेव्हा आश्‍चर्य वाटते. ज्याच्यापाशी माहिती असते, त्याला त्या माहितीतील समस्या सोडवता येतातच, असे नाही.त्यामुळे ज्याला माहिती चांगली आहे, त्याला ज्ञानी म्हणण्याची चूक होते. माहिती वाचलेली किंवा ऐकीव असते, ती सहज उपलब्ध होते. आजचे आपले शिक्षणसुद्धा ज्ञान घेण्याचे साधन नसून केवळ माहिती मिळवण्याचे साधन आहे. आपण आपल्या मेंदूत माहिती साठवत आहोत. ज्या माहितीचा उपयोग आपण पुढचे ‘करिअर’ घडवण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी करतो.

अर्धवट माहितीच्या आधारे आपण स्वतःला ज्ञानी आदी समजतो; पण खरेतर हा आपला भ्रम असतो. खर्‍या ज्ञानाचा आणि आपला काही संबंधच नसतो. आपण आपल्याला पाहिजे असलेली आणि पाहिजे तेवढीच माहिती मिळवतो, तीही शक्य तेवढ्या लवकर अन् शक्य तेवढ्या सोप्या पद्धतीने. आपली कष्ट करण्याची सिद्धता नसते. आपण तेवढा विचार करत नाही. आपल्यात तेवढा संयमही नसतो. काही लोक उद्योग, व्यवसाय अशा व्यावहारिक जगतात यश मिळवतात. त्यांचे कर्तृत्व पुष्कळ मोठे असते. त्यांनाही ज्ञानी म्हटले जाते. खरेतर त्यांच्या चातुर्याला खरे ज्ञान न म्हणता व्यावहारिक ज्ञान म्हणता येईल. चतुरता, धूर्तपणा, कल्पकता अशा गुणांमुळे व्यक्तीची हुशारी दिसून आली की, त्याला ज्ञानी म्हटले जाते. तो या जगतापासून कधीही फसवला जात नाही. व्यावहारिक ज्ञान हे एखाद्या विषयाची केवळ माहिती आणि समज असणे यापेक्षा वेगळे आहे. व्यावहारिक ज्ञानाने यश मिळाल्याने व्यक्तीला कर्तृत्वाचा अहंकार चढतो. हाती पैसा आल्याने मद, गर्व, अभिमान, काम (कामना) असे सगळेच विकार बळावू लागतात. तो परमेश्‍वरी सत्तेपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो. कोणाला जुमानत नाही, इतरांना तुच्छ लेखतो. कर्तृत्वाची यशोशिखरे गाठत असला, तर तो मनुष्यजन्माचे ध्येय विसरून जातो. अंगी नम्रता आणि लीनता रहात नाही. स्थूल जगतात त्याला व्यावहारिक ज्ञानाचा लाभ झाला, तरी स्वत:मधील स्वभावदोष आणि अहं याचे निर्मूलन कसे करावे, याचे त्याला ज्ञान न झाल्याने शेवटी तो अधोगतीकडे जातो. यासाठी केवळ माहितीला ज्ञान न समजता किंवा व्यावहारिक हुशारीला ज्ञान न समजता खरे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. यासाठी योग्य साधना करणे अपरिहार्य आहे, हे येथे अधोरेखित करावयाचे सूत्र !

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF