हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेप्रमाणेच ‘स्वराज्य आणि सुराज्य यांचे एक विशेष अंग म्हणून सागरी सत्तेची स्थापना’ करणारे दूरदृष्टी असलेले शिवछत्रपती !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज असलेल्या जयंती (दिनांकानुसार) निमित्त…

‘२६.११.२००८ च्या मुंबईवरील अतिरेकी आक्रमणामुळे भारताचे संरक्षणदल आपल्या सागरी सीमांची काय काळजी घेते, हे सार्‍या देशाच्या लक्षात आले !  त्यानंतर २ जानेवारी २०१५ या दिवशी गुजरातच्या सागरी सीमेजवळ स्फोटकांनी भरलेली एक बोट उद्ध्वस्त झाली. शत्रू भूसीमेवरूनच नव्हे, तर सागरी मार्गानेही येऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘वर्ष १९९२-९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी वापरलेली हत्यारे आणि बॉम्ब कोकणच्या सागरी किनार्‍यावर उतरवले गेले होते’, हे लक्षात येऊनही सागरी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पावले उचलली गेली नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे. ४४५ वर्षांपूर्वी सागरी सुरक्षेचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची स्थापना केली होती.

पाकिस्तानसारखे विश्‍वासघातकी राष्ट्र ‘संरक्षणदलात असलेली एखादी कमकुवत फट लक्षात येताच तेथून आक्रमण करण्यास मागेपुढे पहाणार नाही’, हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

१. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धनेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी

१ अ. नौदलाचे सामर्थ्य लक्षात घेऊन सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्याची उभारणी आणि सागरी सत्तेची स्थापना ! :

४४५ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्याची उभारणी करून देशात पहिल्यांदा सागरी सीमेची काळजी घेणारे मराठा नौदल (आरमार) उभे केले. शिवकाळातील प्रसिद्ध मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी त्यांच्या आज्ञापत्रात म्हटले आहे, ‘नौदल म्हणजे स्वतंत्र राज्यांगच आहे. जसे राज्यास अश्‍वबळ, तशी त्याची वृद्धीप्रथा, तद्वत्च ज्याच्याजवळ नौदल, त्याचा समुद्र !’

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आजही आश्‍चर्यचकित करणारी आहे. त्यांचे युद्धनेतृत्व आणि कौशल्य आजही युद्धाविषयीचा अभ्यास करणार्‍या तज्ञांना आव्हानात्मक वाटते. यातच शिवछत्रपतींचा गौरव आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेप्रमाणेच स्वराज्य आणि सुराज्य यांचे एक विशेष अंग म्हणून शिवरायांनी मराठ्यांच्या नौदलाची निर्मिती करून सागरी सत्तेची स्थापना केली.

१ आ. कुशल कारागिरांकडून नौका बांधून स्वतःचे नौदल उभे करणे : इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी परकियांच्या सागरी सामर्थ्याला तोंड देण्यासाठी महाराजांनी कुशल कारागिरांकडून नौका बांधून स्वतःचे नौदल (आरमार) उभे केले, तसेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा, खांदेरी आदी काही सागरी किल्ले बांधून आणि काही हस्तगत करून ती सागरी सत्तेच्या संरक्षणाची अभेद्य केंद्रे बनवली.

२. शिवाजी महाराजांच्या नौदलातील जलयानांच्या (जहाजांच्या) संख्येविषयी उपलब्ध माहिती

अ. सभासदांच्या लिखाणावरून महाराजांच्या नौदलात २०० जलयानांचे (जहाजांचे) एक असे दोन प्रांत (सुभे) होते आणि एकूण जलयानांची संख्या ७०० होती.

आ. चिटणीसांच्या नोंदीप्रमाणे ही संख्या अदमासेे ४०० ते ५०० च्या आसपास असावी. बखरीत मात्र महाराजांच्या नौदलातील जलयानांची नोंद मोठी गुराबा (नौका) ३०, लहान गुराबा (नौका) ५०, जलयान (गलबते) १००, तारवे ६०, पाल (लढाऊ जलयानाचा एक प्रकार) २५, मचवे (होडी) ५०, महागिर्‍या (सामुग्री असलेले तारू) १५०, जग १५ अशी एकूण ६४० आढळून येते.

इ. होडी, महागिर्‍या, जग आदी लहान जलयाने (जहाजे) सोडली, तर शिवरायांच्या नौदलात अनुमाने ३०० जलयाने होती, असे म्हणता येईल.

ई. चिटणीसांच्या लिखाणावरून या नौदलावर पाच ते दहा लक्ष रुपयांचा व्यय झाल्याचे समजून येते.

३. रामचंद्रपंत अमात्य यांचे नौदलाविषयीचे अभ्यासू विवेचन

३ अ. नौदलाच्या प्रांताच्या (आरमारी सुभ्याच्या) रचनेविषयी रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्राद्वारे दिलेल्या सूचना ! : नौदलाच्या प्रांताच्या रचनेविषयी रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात, ‘चालीच्या गुराबा (नौका) बहुत थोर ना बहुत लहान ऐशिया मध्य रितीने सजाव्या, तशीच जलयाने (गलबते) करावीत. भांडी, जंबुरे (लहान तोफ), बंदुका, दारूगोळा, होके (तोफेचे गोळे) इत्यादी नौदलास आवश्यक लागणारी सामुग्री भरपूर ठेवावी. नौदलावर तगडी माणसे ठेवावी. नौदलाचे प्रांत करावे. पाच गुराबा (नौका) आणि पंधरा जलयान (गलबते) म्हणजे एक प्रांत (सुभा) अशा रितीने केलेल्या प्रांतावर (सुभ्यावर) एक प्रांताधिकारी (सरसुभा) नेमावा आणि सर्वांनी त्याच्या आज्ञेत वागावे.’

३ आ. नौदलाचा व्यय आणि सागरी प्रदेशावरून होणारा व्यापार यांचा मेळ कसा घालावा, याचे विवेचन : नौदलाचा व्यय आणि सागरी प्रदेशावरून होणारा व्यापार यांचा मेळ कसा घालावा, याचा विचारसुद्धा त्या काळी केला जात असे. ‘राज्याच्या उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने व्यापारी सामुग्रीवर बसवलेल्या सीमाशुल्काच्या (जकातीच्या) उत्पन्नातून नौदलासाठी होणारा व्यय भागवावा कि राज्याच्या उत्पन्नातून तो करावा’, याविषयी विवेचन करतांना रामचंद्रपंत अमात्य लिहितात, ‘नौदलाचा (आरमाराचा) व्यय बंदरातून ये-जा करणार्‍या सामुग्रीवरील सीमाशुल्काच्या उत्पन्नातून न करता राज्याच्या उत्पन्नातूनच करणे योग्य आहे. हा व्यय सीमाशुल्काच्या (जकातीच्या) उत्पन्नातून भागवायचे ठरवल्यास तो भागवण्याकरता सामुग्रीवरील सीमाशुल्काचे भाव (दर) वाढवले जातील. भाव वाढवल्यामुळे व्यापारी सामुग्रीची ने-आण घटत जाऊन बंदरे ओस पडतील आणि व्यापार बुडून व्यापारीवर्ग नाराज होईल.’

नौदलासारख्या अत्यंत महत्त्वाच्या संरक्षक विभागाच्या विनियोगाचा विचार करतांनासुद्धा देशाचा व्यापार आणि आर्थिक संबंध यांची जपणूक कशी जागरूकतेने केली जात होती, हे वरील विवेचनावरून लक्षात येईल.

४. शिवाजी महाराजांचे सागरी कर्तृत्व !

४ अ. जलदुर्ग बांधणे : इंग्रज आणि सिद्दी यांचे नौसेनेचे बळ म्हणजे हिंदवी स्वराज्यास मोठा धोका आहे, हे जाणून त्यांच्या बंदोबस्ताच्या योजना महाराजांनी हाती घेतल्या. त्यासाठी महाराजांनी कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग बांधले. या जलदुर्गार्ंमुळे सिद्दी आणि इंग्रज यांच्या नाविक हालचालींवर मराठ्यांची करडी नजर रहाण्याची सोय झाली. यावरून ‘सागरी संरक्षणामागे छत्रपती शिवाजी महाराज किती सावध होते’, याचे प्रत्यंतर मिळते.

४ आ. इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यासारख्या युरोपीय प्रतिस्पर्ध्यांना दरारा वाटेल, इतके नाविक सामर्थ्य उभारणे : इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी युरोपीय  राष्ट्रांच्या भारतातील नौदलातील जलयानांच्या (जहाजांच्या) संख्येपेक्षा शिवाजी महाराजांच्या जलयानांची संख्या न्यून नव्हती, तर ती काहीशी अधिकच भरली असती. तोफा, नौकानयन यांचा विचार करता मराठ्यांचे नौदल सुसज्ज नव्हते; पण त्यांचा प्रयत्न अधिक महत्त्वाचा होता. मोगल बादशहा, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आदी बलवान शत्रूंशी लढत असतांना केवळ ३० वर्षांच्या अवधीत जलयान बांधण्यास आरंभ करून इंग्रज अन् पोर्तुगीज यांच्यासारख्या युरोपीय प्रतिस्पर्ध्यांना दरारा वाटेल, इतके नाविक सामर्थ्य उभारले, यातच शिवाजी महाराजांचे ‘असामान्य सागरी कर्तृत्व’ दिसून येते.

४ इ. शिवराय जन्माने नाविक असते, तर समुद्रावरही त्यांनी आपला अधिकार गाजवला असता ! – जेम्स डग्लस : शिवाजी महाराजांचे हे सागरी कर्तृत्व इंग्रजांनी ओळखले होते. जेम्स डग्लसचे महाराजांविषयीचे उद्गार याविषयी सूचक आहेत, ‘शिवराय हे जन्माने नाविक (खलाशी) नव्हते, ही ईश्‍वराची मोठी कृपाच होय. ते जर नाविक असते, तर जशी त्यांनी भूमी पादाक्रांत केली, त्याप्रमाणेच समुद्रावरही आपला अधिकार गाजवला असता. तेे नाविक नसतांनाही त्यांनी आपले वर्चस्व स्थापन केलेच !’

४ ई. मराठ्यांच्या सागरी सामर्थ्यामुळे इंग्रजांना सत्तास्थापन करण्यास विलंब लागणे : शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या सागरी सत्तेचा पुढील काळात अधिक दूरवर परिणाम झाला. सतराव्या आणि अठराव्या शतकांतील मिळून जवळजवळ शंभर वर्षांच्या कालखंडात इंग्रज, पोर्तुगीज आदी परकीय सत्तांपासून भारताच्या पश्‍चिम किनार्‍याचे संरक्षण मराठ्यांनी स्वतःच्या नौदलीय सामर्थ्यावर केले. ‘बंगाल, मद्रास यांच्या तुलनेने पश्‍चिम किनार्‍यावर आपली सत्ता स्थापन करण्यास इंग्रजांना विलंब का लागला ?’, या प्रश्‍नाचे उत्तर शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या सागरी सामर्थ्यामध्येच मिळते.

४ उ. मराठी नौदलाचे जनकत्व शिवाजी महाराजांकडेच जाणे : ‘युद्ध आणि युद्धभूमी’ या पुस्तकात मराठी नौसेनेविषयी लिहिले आहे की, ‘शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना त्यांच्या पूर्वजांकडून मोठ्या सैनिकी परंपरेचा लाभ झाला होता; परंतु समुद्र हा त्यांना नवा होता. भारताच्या पश्‍चिम किनार्‍यावर नाविक (दर्यावर्दी) लोकांच्या जमाती पुरातन काळापासून वसलेल्या आढळतात; पण सागरावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळत नाही. यादवांचे राज्य थेट सागराला भिडले असूनही लाटांवर स्वार होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी बाळगल्याचे आढळत नाही. याचसाठी शिवाजी महाराजांकडेच मराठी नौदलाचे जनकत्व जाते.’

– श्री. विजय धामणेकर (संदर्भ : मासिक ‘राष्ट्रवीर’, शिवजयंती खास अंक २००९)


Multi Language |Offline reading | PDF