पाकचा पालनकर्ता !

संपादकीय

कर्जात बुडालेल्या पाकला सौदी अरब २० बिलियन डॉलरचे आर्थिक साहाय्य करणार आहे. यामुळे ‘पाकला लॉटरी लागली आहे’, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सौदी अरबचे राजकुमार महंमद बिन सलमान यांच्या पाक दौर्‍याच्या वेळी ही घोषणा करण्यात आली. त्यांचा नियोजित पाक दौरा १६ फेब्रुवारी या दिवशी चालू होणार होता; मात्र पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर हा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. त्या वेळी ‘सौदीचे राजकुमार खरोखर पाकचा दौरा करणार का ?’, ‘सौदी अरब पाकची कानउघाडणी करणार का ?’ यांसारखे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यात सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाची निंदा केली. या सर्व घटना पहाता ‘सौदी अरब पाकपासून लांब राहील’, असे वाटले होते; मात्र तसे काही झाले नाही. उलट राजकुमार सलमान हे १७ फेब्रुवारीला पाकमध्ये गेले आणि त्यांनी पाकला घसघशीत आर्थिक साहाय्य करण्याचे मान्यही केले. पाकनेही त्यांचे आदरातिथ्य करण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही. पाक सौदी अरबशी असलेल्या मैत्रीचे महत्त्व जाणतो. पाक आणि सौदी अरब यांची मैत्री तशी जुनीच. वर्ष १९६० च्या दशकापासून सौदी अरब पाकला साहाय्य करत आहे. वर्ष १९८० आणि १९९० या २ दशकांत सौदी अरबने पाकमध्ये पैसा अक्षरशः ओतला. हा पैसा पाकमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अथवा विकासकामे वाढवण्यासाठी नव्हता. तो पाकमध्ये आतंकवाद पोसण्यासाठी, जहालमतवादी प्रशिक्षण देण्यासाठी, मदरसे उभारण्यासाठी उपयोगात आणला गेला. आजही इस्लामी राष्ट्रांमध्ये सौदी अरबला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सौदी अरबचा हात ज्या इस्लामी राष्ट्राच्या डोक्यावर असतो, त्याला या राष्ट्राकडून विशेष अभय मिळते. येथे प्रश्‍न भारताचा आहे. राजकुमार सलमान हे १९ फेब्रुवारीला भारताच्या दौर्‍यावर येणार आहेत. उभयता देशांमध्ये आतंकवाद, सुरक्षा आदी सूत्रांवर चर्चा होऊन काही करारही होतील; मात्र त्याचा खरंच काही लाभ होणार आहे का ?

फलनिष्पत्ती महत्त्वाची !

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही इस्लामी राष्ट्रांचाही दौरा केला होता. पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्याच्या अनुषंगाने आणि इस्लामी राष्ट्रांत पाकच्या विरोधात वातावरण निर्माण करणे, हा त्यामागील हेतू होता; मात्र त्याचा लाभ झाला का ? इतर वेळी ही इस्लामी राष्ट्रे एकमेकांच्या नावाने बोटे मोडतील; मात्र जेव्हा ‘इस्लाम खतरे में’ अथवा ‘जिहाद’चे सूत्र उपस्थित होते, तेव्हा ही राष्ट्रे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ म्हणत एकत्र येतात. आताही पुलवामा येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर सर्वत्र ‘आतंकवादाचा समूळ नायनाट’, हे सूत्र पुन्हा चर्चेला आले आहे. सर्वत्र पाकला लक्ष्य केले जात आहे; मात्र अशा वेळी सौदी अरब त्याच्या साहाय्यासाठी धावून आला, यातच सर्व काही आले.

जगभरातील आतंकवादाचा पूर्ण नायनाट करायचा असेल, तर केवळ पाकचा नायनाट करणे पुरेसे आहे का ? आतंकवादाचा खरा आश्रयदाता हा सौदी अरबच आहे. जिहादी आतंकवादाला लागणारे ‘वैचारिक’ खतपाणी, शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सौदी अरब पुरवतो. आज आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकची भूमी वापरली जात आहे. उद्या पाकला नष्ट केले, तर दुसर्‍या एखाद्या इस्लामी राष्ट्रात आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येईल; मात्र त्याचा वैचारिक आणि आर्थिक स्रोत पुरवणार्‍या सौदी अरबला संपवल्याविना आतंकवाद संपुष्टात येणार नाही. आज जगात पाकच्या विरोधात वातावरण आहे. एवढेच कशाला, त्याच्या शेजारी असलेले इराण आणि अफगाणिस्तान यांच्याशीही हल्ली आतंकवादाच्या सूत्रावरून त्यांचे खटके उडत आहेत; मात्र तरीही पाक निर्धास्त आहे. पाकला हे ठाऊक आहे की, धर्माच्या नावाने त्याने एक हाक दिली, तर सारे इस्लामी जगत त्याच्या मागे उभे राहील. आतंकवादाच्या विरोधात बोलणार्‍यांनाही याची कल्पना आहे; मात्र याविषयी कृती मात्र काही होत नाही !

सौदीला दणका द्या !

सौदी अरब हा तेलसंपन्न देश. या तेलसंपन्नतेवर तो बड्या बड्या राष्ट्रांनाही झुकवतो. जागतिक राजकारणात स्वतःला असलेले मूल्य तो ओळखून आहे. तेलसंपन्नतेमुळे सौदी अरबच्या हाता पैसा खळखळतो. हा पैसा मानवतावादी कार्यासाठी नव्हे, तर जिहादसाठी वापरला जातो, हेही तितकेच खरे. अल् कायदाचे आणि सौदीचे संबंध लपलेले नाहीत, एवढेच कशाला ‘इसिस का फोफावला ?’, ‘त्याला आर्थिक साहाय्य कोणी केले ?’, हे पडताळले, तर सौदीचेच नाव पुढे येईल. आज जागतिक राजकारणात सौदी अरब अमेरिकेशी जवळीक साधतांना दिसत आहे. एकीकडे ‘आम्ही आतंकवादाच्या विरोधात आहोत’, असे सांगायचे; मात्र दुसर्‍या बाजूने ‘आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांना जवळ करायचे’, ही अमेरिकेची रीतच आहे. स्वतःला जोपर्यंत एखाद्या देशापासून त्रास होत नाही, तोपर्यंत अमेरिका त्याचा वापर करून घेते. हे देश नंतर तिच्यावर उलटले, तर ती त्यांना जागा दाखवते. पाक आणि अन्य इस्लामी राष्ट्रे यांविषयी अमेरिकेने हीच नीती वापरली. त्यामुळे सौदी अरबला तूर्तास कोणाकडूनही भय नाही. प्राथमिक स्तरावर पाकचा नायनाट करणे, हे भारताचे ध्येय असले, तरी पुढे जाऊन सौदी अरबलाही दणका देणे अपरिहार्य आहे.

पाक भारताकडे म्हणजे हिंदूंकडे ‘काफिर’ म्हणून पहातो. त्यामुळे त्याच्याशी असलेले वैर हे केवळ काश्मीरपुरसा मर्यादित नाही. काश्मीरच्या आडून भारताच्या विरोधात जिहाद पुकारला गेला आहे. हे सूत्र समोर ठेवून भारताने पावले उचलली, स्वतःच्या परराष्ट्रनीतीत पालट केला, तरच हे धर्मयुद्ध जिंकले जाईल. इस्लामी राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करतांना भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची नीती वापरणे आवश्यक आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now