हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आंदोलन उभारणारे सनातन प्रभात हे एकमेव दैनिक ! – राकेश नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

दैनिक सनातन प्रभातच्या ‘वर्धापनदिन विशेषांका’चे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. राकेश नलावडे, सद्गुरु सत्यवान कदम आणि डॉ. हेमंत चाळके

रत्नागिरी, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – आज आपल्या हिंदु धर्मावरील आघातांना सामोरे जाण्यास आपणच न्यून पडतो; कारण आपल्याला धर्मशिक्षण नाही. आज सनातन प्रभात हे एकमेव दैनिक आहे, जे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे मी या व्यासपिठावरून सर्वांना सांगू इच्छितो की, हे वर्तमानपत्र जगभरात पोहोचवण्यासाठी साहाय्य करूया, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. राकेश नलावडे यांनी केले. शहरातील टी.आर्.पी. येथील अंबर सभागृहात दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीचा १९ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम, सनातनचे संत पू. जनार्दन वागळे, पू. (श्रीमती) मंगला खेर, पू. चंद्रसेन मयेकर, सावर्डे येथील प.पू. वनगे महाराज यांचे उत्तराधिकारी पू. संतोष महाराज वनगे यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी शंखनाद केला. वर्धापनदिनाच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दैनिक सनातन प्रभातच्या ‘वर्धापनदिन विशेषांका’चे प्रकाशन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

दैनिक सनातन प्रभातमधील ज्ञानापासून वंचित असलेल्या सर्व धर्मबांधवांपर्यंत हा अंक पोहोचणे अपेक्षित ! – दीपक मुळ्ये, वाचक

दैनिक सनातन प्रभातच्या व्यासपिठावरील माझे मनोगत म्हणजे साध्या ज्योतीने तेजाची केलेली आरती आहे. माझ्याकडे वर्ष २००० पासून साप्ताहिक आणि वर्ष २००९ पासून नियमित दैनिक सनातन प्रभात चालू झाले. प्रारंभी मी आणि माझे कुटुंबीय अन्य वर्तमानपत्रे आधी वाचत असे आणि नंतर दैनिक सनातन प्रभात. काही वर्षांनी त्यात काही वेगळेच असल्याचे लक्षात आले आणि वृत्तपत्र वाचनाचा क्रम उलटा झाला. अन्य वर्तमानपत्रे तर केवळ चाळली जाऊ लागली. एखाद्या दिवशी दैनिक सनातन प्रभात आले नाही, तर संबंधितांना संपर्क करून लगेच विचारतो. इतकी आत्मीयता, बांधीलकी या दैनिकाशी निर्माण झाली आहे.  दैनिक सनातन प्रभातच्या या ज्ञानापासून जे वंचित आहेत, अशा सर्व धर्मबांधवांपर्यंत हा अंक पोहोचावा, अशी मी प्रार्थना करतो.

ते पुढे म्हणाले…

१. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपेक्षित असलेली आणि त्याही पुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण अन् देवी सरस्वतीला अपेक्षित असलेली पत्रकारिता दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून पहायला मिळते.

२. आपण करत असलेल्या कार्याविषयी निष्ठा किती असावी, हेही दैनिक सनातन प्रभातच्या माध्यामातून पहायला मिळते. याचे उदाहरण म्हणजे जर काही चूक झाली, तर दुसर्‍या दिवशी ते दैनिकात प्रसिद्ध केले जाते आणि संबंधित साधक त्याचे प्रायश्‍चित घेतो.

३. सर्वसामान्यांना कळेल असा वैचारिक प्रतिवाद समर्थपणे आणि योग्य पद्धतीने दैनिक सनातन प्रभातमधून केला जातो.

४. ४ मासांपूर्वी मला झालेल्या आजारामधून  मी दैनिक सनातन प्रभातमधील चौकटी आणि आध्यात्मिक उपाय यांमुळे सावरलो.

५. देवता आणि संत यांचा आशीर्वाद यांमुळे दैनिक सनातन प्रभातने आपला गुणात्मक दर्जा कधीच सिद्ध केला आहे.

आपण संघटित राहिलो, तर धर्मकार्य करतांना होणारा विरोध मावळतो ! – राकेश नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

निर्भीड आणि परखडपणे मत मांडणार्‍या दैनिक सनातन प्रभातला आज २० वर्षे पूर्ण झाली. हिंदु धर्माविषयी अभिमान कसा असावा, हे या नियतकालिकातून शिकायला मिळते. काही संघटना हिंदु धर्मातील परंपरा आणि सण कसे चुकीचे आहेत’, हे सांगतात; मात्र याचे खंडण करणारे दैनिक सनातन प्रभात हे एकमेव दैनिक आहे. ‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणार आहे’, हे सांगितले जाते, तोच दैनिकाचा उद्देश आहे. हिंदु राष्ट्र येणार आणि आपण त्याचे साक्षीदार असणार आहोत.

ते पुढे म्हणाले…

१. ‘छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी केलेला त्याग फुकट गेला कि काय’, असे वाटण्यासारखी आज परिस्थिती निर्माण झाली आहे.

२. आपण संघटित राहिलो, तर धर्मकार्य करतांना होणारा विरोध मावळतो. याचे उदाहरण म्हणजे पिरलोटे येथे गोतस्करीसाठी नेणारी वाहने हिंदु बांधवांनी अडवल्यानंतर पोलिसांनी उलट हिंदूंवरच अत्याचार केले; मात्र त्यानंतर संघटित झालेल्या हिंदु समाजासमोर प्रशासनाला नमावे लागले.

३. हिंदु जनजागृती समितीची सभा असो किंवा वर्धापनदिन सोहळा असो, अशा कार्यक्रमांना ‘सिव्हील ड्रेस’मध्ये पोलीस उपस्थित असतील, या कार्यक्रमांचे चित्रीकरण केले जात असेल, तर पोलिसांना मी सांगू इच्छितो, ‘‘आज मशिदींमधून हिंदूंचे धर्मांतर केले जाते, स्त्रियांची अब्रू लुटली जाते, ‘लव्ह जिहाद’ केला जातो, त्या ठिकाणचे चित्रीकरण करा. आम्ही धर्माचे रक्षण करणारे आहोत, चोर नव्हे.’’

४. धर्मरक्षण करणार्‍या या दैनिकाच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहावे. जरी आपल्या संघटना वेगवेगळ्या असल्या, तरी ध्येय एक असेल, तर आपण त्या ठिकाणी जायला हवे.

५. दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होणारे लिखाण हे कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नसून जे सत्य आहे, तेच असते.

६. पोलीस राष्ट्र-जागृती सभेचे ध्वनीचित्रीकरण करत असतील, तर ‘त्यांना बाहेर जाण्यास सांगावे’, असे वाटते. आज मी हे जे एवढ्या धाडसाने बोललो आहे, ते केवळ सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांच्यामुळेच !

दैनिक सनातन प्रभात म्हणजे एक योद्धा सेनापती ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती

काहींना ‘दैनिक सनातन प्रभात म्हणजे सैनिक आहे’, असे वाटते. दैनिक सनातन प्रभात म्हणजे केवळ सैनिक नसून तो एक योद्धा सेनापती आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी एकेका जिवाला आपल्याला जोडायचे आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार त्यांच्या अंतर्मनात रूजवायचा आहे. हिंदु राष्ट्रासाठी आपल्याला संघर्षच करावा लागेल.

ते पुढे म्हणाले…

१. ज्या सरकारला चर्च आणि मशिदी अधिग्रहण करण्याचे धाडस होत नाही, ते सरकार हिंदूंची मात्र मंदिरे एकेक करून कह्यात घेत आहे. बाबरी मशिदीचा ढाचा पाडणार्‍या हिंदूंना मी सलाम करतो आणि उपस्थितांना आवाहन करतो की, हे राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित झाल्यावर ज्या मंदिरांचे मशिदींमध्ये रूपांतर झाले आहे, त्या ठिकाणी पुन्हा एकदा मंदिरे उभारण्यात येतील.

२. ज्या देशात श्रीकृष्णाने गोरक्षणासाठी कौरवांशी युद्ध केले, तोच भारत देश आज ‘गोमांसाची निर्यात करणारा देश’ म्हणून ओळखला जात आहे. ही धर्मनिरपेक्षतेची फळे आहेत.

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या युद्धतंत्राचा वापर करून व्हिएतनामसारखा देश बलाढ्य अमेरिकेशी २ वर्षे लढला, त्याच युद्धतंत्राचा वापर करून पुलवामा येथे स्फोट घडवण्यात आला.

४. हिंदु राष्ट्र आणायचे असेल, तर या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढावे लागेल आणि या लढ्यासाठी आवश्यक असणारी वैचारिक बैठक दैनिक सनातन प्रभातमधूनच सिद्ध होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now