हे गृहयुद्ध जिंकावेच लागेल !

संपादकीय

पुलवामा आक्रमण झाल्यानंतर देशभरातील राष्ट्रप्रेमी निषेध करत आहेत, उत्स्फूर्तपणे आंदोलने करत आहेत. पोवाडे, कविता यांमधून त्यांचा रोष व्यक्त करत आहेत. अशा वेळी देशातील एक वर्ग मात्र अत्यंत उलट अशी राष्ट्रविरोधी भूमिका घेतांना दिसत आहे. या आक्रमणाचे गांभीर्य न्यून करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शत्रूराष्ट्राचे समर्थन करतांना दिसत आहे. हे तथाकथित शांतीदूत आणि पाकप्रेमी यांविषयी देशवासियांना चीड न आल्यास नवल ! याविषयी राष्ट्रप्रेमी कृतीशील होत आहेत, हे चांगले लक्षण आहे.

सर्वप्रथम नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि नंतर काँग्रेसचे नवज्योतसिंह सिद्धू यांनी पाकची पाठराखण केली. फारूख अब्दुल्ला यांच्याकडून ते अपेक्षित आहे; मात्र सिद्धू हे पाकप्रेमात एवढे मुरलेले आहेत, याची राष्ट्रप्रेमींना कल्पना नसावी. पाकिस्तान हे सर्व आतंकवादाचे मूळ आहे, हे जगजाहीर असतांना त्यांनी ‘आतंकवादाला कुठला धर्म आणि देश नसतो’, असे विधान केलेे. त्यामुळे राष्ट्रप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ‘सोनी टीव्ही’ या मनोरंजन वाहिनीवर प्रसारित होणार्‍या ‘कॉमेडी शो’मधून त्यांची हकालपट्टी करावी अन्यथा वाहिनीवर बहिष्कार घालण्यात येईल’, अशी चेतावणी दिल्यावर सिद्धू यांना ‘शो’मधून काढण्यात आले. उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात काढलेला मोर्चा काश्मिरी मुली रहात असलेल्या वसतीगृहाच्या शेजारून जात असतांना धर्मांध काश्मिरी मुलींनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तेव्हा मोर्च्यातील हिंदुत्वनिष्ठांनी तात्काळ वसतीगृहाला घेराव घालून काश्मिरी विद्यार्थ्यांना हाकलून देण्याची मागणी केली. यामुळे ‘काश्मिरी मुले धोक्यात आहेत’, असा पुरो(अधो)गाम्यांनी प्रसार केला, तर कथित ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी कहर करत ‘कोणा काश्मिरींना अडचण असेल, तर त्यांनी मला संपर्क करा’, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. पाकप्रेमींना पाठीशी घालणारे राजदीप देसाई यांना एव्हाना कारागृहात पाठवणे आवश्यक होते; मात्र विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली ही माणसे काहीही बरळतात आणि ताठ मानेने समाजात वावरतात, हे संतापजनक होय !

फितुरांवर कारवाई हवी !

वादग्रस्त पत्रकार राणा अयुब यांना ‘आतंकवादाचा सूड घेण्याची मागणी करणे दु:खदायक आहे’ याचा साक्षात्कार झाला आहे, तर एन्डीटीव्हीच्या उपसंपादिका निधी सेठी यांनी आतंकवादी कारवाईची पाठराखण करणारे आक्षेपार्ह ट्वीट केले. परिणामी त्यांचे केवळ २ आठवड्यांसाठी निलंबन झाले आहे. राजस्थानातील प्रतापगढ जिल्ह्यातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक महंमद इकराम अजमेरी यांनी विद्यार्थ्यांसमोरच सैनिकांना शिव्यांची लाखोली वाहिली. बहुसंख्य मुसलमान विद्यार्थी असल्याने ही गोष्ट बाहेर आली नाही; मात्र आसपासच्या लोकांना कळल्यावर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ‘हॉऊज द जैश ?’ असे जैश-ए-महंमदची पाठराखण करून भारतियांना अवमानित करणार्‍या बसिम हिलाल याला ‘अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी’ने काढून टाकले आहे, अशीच कारवाई अन्य विद्यापिठांनी काही विद्यार्थ्यांवर केली आहे. रियाझ अहमद वानी आणि इक्बाल हुसेन यांनी ‘हा खरा सर्जिकल स्ट्राईक’, असे म्हटल्याने लोकांनी निषेध केल्यावर अनुक्रमे ‘मॅक्लेओडस’ या औषध बनवणार्‍या आणि ‘झिडस’ या आस्थापनांनी त्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशाच प्रकारे राष्ट्रप्रेमींच्या मागणीनंतर काही धर्मांधांना त्यांच्या आस्थापनांनी काढून टाकले आहे.

तथाकथित शांतीचे पुरस्कर्ते महेश भट यांनी ‘काही हिंसक लोकांकडून झालेल्या कृतीमुळे माझ्यासारख्या शांतीप्रिय असणार्‍या अनेक लोकांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये’, असे आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केले आहे, तर प्रशांत भूषण यांनी आतंकवाद्यांचा कळवळा घेत ‘अहमद डार हा आतंकवादी बनण्यास सेनाच उत्तरदायी आहे’, असे अकलेचे तारे तोडले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर अखंड टीका करणार्‍या नवी देहलीतील ‘आप’च्या अलका लांबा यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थन करून आणि ‘मी त्यांच्या समवेत आहे’, असे विधान करून सर्वांना धक्का दिला आहे.

या राष्ट्रघातक्यांची सूची आणि त्यांनी केलेल्या राष्ट्रविरोधी कृती यांची सूची मोठी आहे. असे असले, तरी राष्ट्रप्रेमी आणि कृतीशील नागरिक यांचीही देशात कमतरता नाही, हेसुद्धा या निमित्ताने दिसून आले. अभिनेत्री कंगना राणावत यांनी ‘आता कोणी शांतीची भाषा केल्यास त्याच्या कानशिलात वाजवा’, असे सांगत पाकिस्तानात जाऊ इच्छिणारे जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना ‘देशद्रोही’ आणि ‘तुकडे तुकडे गँग’चे समर्थक म्हटले आहे. जैन मुनी तरुण सागर यांनी ‘पाकिस्तानमध्ये जेवढे आतंकवादी नाहीत, तेवढे या देशात गद्दार आहेत !’ हे केलेले विधान किती सार्थ आहे, याची खात्री पटते.

भारताच्या इतिहासात डोकावून पाहिले, तर देशाला फितूर, घरभेदी यांचाच सर्वांत अधिक त्रास झाला आहे. त्यांच्यामुळे ऐन युद्धात देशातील शूरविरांना हकनाक पराभव पत्करावा लागला. समर्थ रामदासस्वामी यांनी ‘देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनी घालावे परते ।’ असे आधीच सांगून ठेवले आहे. देशावर आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यावर सैनिक त्यांच्यासमवेत लढून त्यांना नष्टही करतील. शासनकर्त्यांची इच्छा असल्यावर पाकिस्तानवर आक्रमण करून त्यालाही नामशेष करतील; मात्र घरभेद्यांचे काय ? पाकप्रेमी, धर्मांध यांची सामाजिक माध्यमांवरील देशविरोधी मते हे केवळ त्यांचे म्हणणे नसून देशातील ‘गृहयुद्धच’ आहे. आतंकवाद्यांना कोणताही विध्वंस घडवायचा असल्यास ‘स्लीपर सेल’ची आवश्यकता असते. त्यामुळे पाकच्या समर्थनार्थ गळे काढणार्‍या या घरभेद्यांच्या घरावर धाडी घालून त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. या कामी सरकार आणि नागरिक या दोहोंनी हातात हात घालून घरभेद्यांनी छेडलेले हे गृहयुद्ध जिंकण्यासाठी संघटित प्रयत्न केल्यास निश्‍चितच यश मिळेल, यात शंकाच नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now