श्री गुरुपादुकांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

‘वसंतपंचमीच्या शुभ तिथीला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पादुका धारण केल्या. रथसप्तमीच्या शुभ तिथीला सद्गुरुद्वयींनी गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन केले आणि नंतर त्यांची ध्यानमंदिरात स्थापना करण्यात आली. या दिव्य सोहळ्याचे ईश्‍वराच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहे.

१. गुरुपादुकांचे पूजन होण्यापूर्वी जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१ अ. आश्रमात सर्वत्र सूक्ष्मातून पिवळ्या आणि पांढर्‍या फुलांच्या माळा लावलेल्या दिसणे अन् या फुलांतून निघणार्‍या दैवी सूक्ष्म गंधामुळे आश्रमातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होणे : आश्रमामध्ये सकाळपासूनच पुष्कळ चैतन्य जाणवत होते आणि आश्रमातील वातावरण अधिक पवित्र झाले होते. आश्रमात सर्वत्र सूक्ष्मातून पिवळ्या आणि पांढर्‍या फुलांच्या माळा लावल्या होत्या. या फुलांच्या माळा हे मांगल्याचे प्रतीक होते. या फुलांतून निघणार्‍या दैवी सूक्ष्म गंधामुळे आश्रमातील वातावरण मंगलमय आणि पवित्र झाले होते.

कु. मधुरा भोसले

१ आ. आश्रमात दिवाळी असल्याप्रमाणे सर्वत्र सूक्ष्मातून पणत्या लावलेल्या दिसणे : १०.२.२०१९ या दिवशी आश्रमात दिवाळी असल्याप्रमाणे सर्वत्र सूक्ष्मातून पणत्या लावल्या होत्या. सूक्ष्मातील पणत्यांच्या ज्योतींमधून गुलाबी, केशरी, पिवळी, निळी आणि पांढर्‍या रंगाच्या प्रभावळी संपूर्ण वातावरणात पसरत होत्या. (१२.२.२०१८ या दिवशी रात्री आश्रमात प्रत्यक्ष पणत्या लावण्यात आल्या.)

१ इ. आश्रमातील वातावरणात सूक्ष्मातून ‘स्वस्तिक आणि श्री’, ही शुभचिन्हे दिसणे : आश्रमातील वातावरण पवित्र झाल्यामुळे आश्रमातील वातावरणात सूक्ष्मातून ‘स्वस्तिक आणि श्री’, ही शुभचिन्हे दिसत होती. या चिन्हांतून तारक शक्ती आणि भाव यांच्या लहरी संपूर्ण वातावरणात पसरून आश्रमातील वातावरण भावपूर्ण झाले होते.

२. परात्पर गुरुमाऊलीचे शुभागमन झाल्यावर ‘साक्षात श्रीमन्नारायणच आले आहेत’, असे जाणवणे

कार्यक्रमाच्या ठिकाणी परात्पर गुरुमाऊलीचे शुभागमन झाल्यावर ‘साक्षात श्रीमन्नारायणच आले आहेत’, असे जाणवले. तेव्हा प्रवेशद्वाराच्या जवळ ठेवलेल्या जय आणि विजय यांच्या चित्रांमध्ये चैतन्य पसरून ते सजीव झाल्याचे जाणवले. त्यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी भावपूर्ण वंदन करून ‘श्रीमन्नारायणाचा विजय असो’, असा जयघोष करून श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भावपूर्ण स्वागत केले. जेव्हा साधक-पुरोहित श्री. दामोदर वझेकाका भावपूर्णरित्या मंत्रोच्चार करत होते, तेव्हा स्वर्गलोकातील देवता आणि ऋषि यांनी वेदमंत्रांचे भावपूर्ण उच्चारण करून शंखनाद केला अन् परात्पर गुरुमाऊलीवर दिव्य सुगंधी फुलांची वृष्टी केली.

३. परात्पर गुरुदेव आसनस्थ झाल्यावर ‘श्रीमन्नारायणच शेषासनावर आसनस्थ झाले आहेत’, असे जाणवणे

परात्पर गुरुदेव व्यासपिठावर आसनस्थ झाले. तेव्हा सूक्ष्मातून ‘श्रीमन्नारायणच शेषासनावर आसनस्थ झाले आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून वैकुंठाचे वातावरण निर्माण होऊन सर्वत्र निळसर रंगाचा प्रकाश पसरला आणि मला शंख, चक्र, पद्म आणि गदा या श्रीविष्णूच्या आयुधांचे दर्शन झाले.

४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुक्रमे उजव्या अन् डाव्या चरणांमध्ये खडावा घातल्यावर सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडी

४ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी श्रीदेवी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी भूदेवी यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे :  सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुक्रमे उजव्या अन् डाव्या चरणांमध्ये खडावा घातल्या. तेव्हा मला सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी श्रीदेवी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी भूदेवी यांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. ‘श्रीविष्णु त्याच्या दोन्ही शक्तींसहित पृथ्वीवर विराजमान आहे’, असे जाणवले.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उजव्या चरणात खडावा घातल्यावर त्यांची सूर्यनाडी आणि डाव्या चरणात खडावा घातल्यावर चंद्रनाडी चालू होऊन वातावरणात शक्ती अन् चैतन्य यांचे प्रक्षेपण होणे : जेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या चरणामध्ये खडावा घातली, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सूर्यनाडी चालू झाली आणि संपूर्ण ब्रह्मांडात मारक शक्ती अन् सगुण चैतन्य यांचे प्रक्षेपण होऊन ब्रह्मांडाची शुद्धी चालू झाली. जेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या चरणामध्ये खडावा घातली, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चंद्रनाडी चालू झाली आणि संपूर्ण ब्रह्मांडात तारक शक्ती अन् निर्गुण चैतन्य यांचे प्रक्षेपण होऊन ब्रह्मांडाची सात्त्विकता वाढून सर्वत्र शीतलता पसरली, असे मला जाणवले.

४ इ.  परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी मला तपस्वी वेशातील प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पादुका धारण केल्यावर परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी सूक्ष्मातून कार्यरत असणारे श्रीमन्नारायणाचे रूप श्रीरामाच्या रूपात परिवर्तित झाले. तेव्हा मला वनवासाला निघालेल्या तपस्वी वेशातील प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले आणि वातावरणात मोगर्‍याचा मंद सुगंध स्थुलातून दरवळला. त्यांच्या चरणांमध्ये असणार्‍या पादुका भरताने घेतल्या आणि त्याने पादुकांचे पूजन करून त्यांची राजसिंहासनावर स्थापना केली. हे दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून झरकन निघून गेले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी मला तपस्वी वेशातील प्रभु श्रीरामाचे दर्शन झाले आणि दोन्ही सद्गुरूंमध्ये भरताप्रमाणे भक्तीभाव जागृत झाल्याचे जाणवले.

५. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मोगर्‍याच्या कळ्या वाहिल्यावर सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडी

५ अ. सद्गुरुद्वयींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मोगर्‍याच्या कळ्या वाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी एकमुखी दत्ताचे दर्शन होणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मोगर्‍याच्या कळ्या वाहिल्या. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ठिकाणी मला पितांबर धारण केलेल्या एकमुखी दत्ताचे दर्शन झाले अन् वातावरणात चंदनाचा पुष्कळ सुगंध स्थुलातून पसरला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी मला त्रिमुखी दत्ताऐवजी एकमुखी दत्ताचे दर्शन का होत आहे ?’, असा मला प्रश्‍न पडल्यावर देवाने सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूचे निर्गुणतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्यामुळे तुला त्यांच्या ठिकाणी एकमुखी दत्ताचे दर्शन झाले.’’

५ आ. स्वर्गलोकातील अप्सरा, यक्षिणी, योगिनी आणि समस्त मातृका यांनी दत्तरूपातील परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांवर समर्पित जिवांचे प्रतीक असणार्‍या मोगर्‍याच्या कळ्या वाहिल्याचे जाणवणे आणि गुरुचरणांना स्पर्श केल्यामुळे कळ्यांचे रूप धारण केलेल्या समस्त जिवांना सद्गती मिळणे : स्वर्गलोकातील अप्सरा, यक्षिणी, योगिनी आणि समस्त मातृका यांनी दत्तरूपातील परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांवर समर्पित जिवांचे प्रतीक असणार्‍या मोगर्‍याच्या कळ्या वाहिल्याचे जाणवले. विविध लोकांतील आणि ईश्‍वराला शरण आलेल्या समर्पित जिवांनी मोगर्‍याच्या कळ्यांचे रूप धारण केले होते; कारण त्यांना गुरुचरणी समर्पित होण्याचा ध्यास लागला होता. दत्तरूपातील परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांना मोगर्‍याच्या कळ्यांनी स्पर्श करताच कळ्यांमधून धूर निघतांना जाणवला. कळ्यांमध्ये सूक्ष्म रूपाने वास करणार्‍या समर्पित जिवांना गुरुचरणांतील चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्यांचा उद्धार होऊन त्यांची समस्त पापे आणि कर्मफल नष्ट होऊन त्यांना सद्गती मिळाली. त्यामुळे हे जीव मोगर्‍याच्या कळ्यांतून मुक्त होऊन पुढच्या लोकांकडे निघाले. तेव्हा मोगर्‍याच्या कळ्यांतून सूक्ष्मातून धूर निघतांना दिसला.

५ इ. मोगर्‍याच्या कळ्यांचा स्पर्श श्रीदत्तात्रेयांच्या चरणांना झाल्यामुळे, त्यांच्या चरणांमध्ये वास करणारे लक्ष्मीतत्त्व जागृत होणेे आणि ते गुलाबी रंगाच्या कारंज्याच्या रूपाने वातावरणात प्रक्षेपित होणे : मोगर्‍याच्या कळ्यांचा स्पर्श श्रीदत्तात्रेयाच्या चरणांना झाल्यामुळे, त्यांच्या चरणांमध्ये वास करणारे लक्ष्मीतत्त्व जागृत झाले आणि ते गुलाबी रंगाच्या कारंज्याच्या रूपाने वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे हा सोहळा पहाणार्‍या जिवांना दत्तात्रेयांसह श्रीलक्ष्मीचेही कृपाशीर्वाद लाभले.

५ ई. परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे ‘ॐ’ कार स्वरूप असल्यामुळे त्यांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांचा आकार ‘ॐ’ प्रमाणे होणे : परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे ‘ॐ’ कार स्वरूप असल्यामुळे त्यांच्या चरणांवर वाहिलेल्या फुलांचा आकार ‘ॐ’ प्रमाणे झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण स्तरावरील चैतन्याचा हा दृश्य परिणाम आहे’, असे जाणवले.

६. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गुरुपादुकांचे पूजन केल्यावर सूक्ष्मातून घडलेल्या घडामोडी

६ अ. गुरुचरणांचे पूजन झाल्यावर खडाव्यांचे रूपांतर गुरुपादुकांमध्ये होणे : परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या चरणांमध्ये खडावा शोभून दिसत होत्या. गुरुचरणांचे पूजन झाल्यावर खडाव्यांचे रूपांतर गुरुपादुकांमध्ये झाले आणि या पादुकांमध्ये पुष्कळ ईश्‍वरी चैतन्य कार्यरत झाले.

६ आ. सद्गुरुद्वयींमधील दैवी ऊर्जेचा प्रवाह आपतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत होऊन तो गंगानदी आणि यमुनानदी यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित होणे आणि ब्रह्मदेवाने त्याच्या कमंडलूतील जलाची धारा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकावर सोडल्यावर सरस्वतीनदीचा प्रवाह त्यांच्या डोक्यावर वाहून त्यांच्या चरणी समर्पित होणे : गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुक्रमे उजव्या अन् डाव्या बाजूला बसल्या होत्या. तेव्हा मला सूक्ष्मातून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी गंगानदी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी यमुनानदी असल्याचे जाणवले. सद्गुरुद्वयींमधील दैवी ऊर्जेचा प्रवाह आपतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत होऊन तो गंगानदी आणि यमुनानदी यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित झाला. तेव्हा गंगा आणि यमुना या नद्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे पूजन केल्याचे जाणवले. तेव्हा ब्रह्मलोकातील ब्रह्मदेवाने त्याच्या कमंडलूतील जलाची धारा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मस्तकावर सोडली. ही कमंडलूची धारा म्हणजे सरस्वती नदी असल्याचे जाणवले. सरस्वतीनदीचा प्रवाह त्यांच्या डोक्यावर वाहून त्यांच्या चरणी समर्पित झाला. अशा प्रकारे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांनी गुरुचरणांचा अभिषेक घालून त्यांचे पूजन केले. परात्पर गुरुदेवांचे श्रीचरण हे सप्तनद्यांहून पवित्र असल्यामुळे त्यांचा स्पर्श झाल्यामुळे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या अधिक शुद्ध अन् पवित्र झाल्या.

७. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणे आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या चंद्राप्रमाणे शीतल झाल्याचे जाणवणे

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आरती केली. सद्गुरुद्वयींनी श्रीगुरूंची आरती भावपूर्ण केली. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ या सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होत्या आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या चंद्राप्रमाणे शीतल झाल्याचे जाणवले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्थूल देह दैवी दिसला.

८. सद्गुरुद्वयींनी श्रीगुरूंना वाकून भावपूर्ण नमस्कार केल्यावर सद्गुरुद्वयींच्या रूपाने चंद्र आणि सूर्य गुरुचरणांशी समर्पित झाल्याचे जाणवणे

जेव्हा सद्गुरुद्वयींनी श्रीगुरूंना वाकून भावपूर्ण नमस्कार केला, तेव्हा मला सूक्ष्मातून सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या ठिकाणी सूर्यदेवाचे आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या ठिकाणी चंद्रदेवाचे दर्शन झाले. चंद्र आणि सूर्य गुरुचरणांशी समर्पित झाल्याचे जाणवले.

९. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची आरती केल्यावर त्यांचे सूक्ष्म रूप त्रिमुखी दत्ताप्रमाणे दिसू लागणे आणि त्यांच्या सूक्ष्म रूपाने विराट रूप धारण करून संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकणे

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची आरती केल्यावर त्यांचे सूक्ष्म रूप त्रिमुखी दत्ताप्रमाणे दिसू लागले आणि त्यांनी धारण केलेले पिंतांबर त्यांना शोभून दिसू लागले. त्यांच्या सूक्ष्म रूपाने विराट रूप धारण करून संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकले होते. विराट रूपातील दत्तगुरुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीचरणांचे दर्शन घेण्यासाठी १४ भुवनांतील कोट्यवधी जीव आतुरले होते. श्रीगुरुचरणांच्या पादुकांचा स्पर्श विविध लोकांतील समस्त जिवांच्या मस्तकाला झाल्याने समस्त जीव प्रसन्न होऊन कृतकृत्य झाले. अनेकांच्या पापांचे क्षालन झाले, तर अनेकांना सद्गती लाभली. अनेक जिवांना श्रीगुरुपादुकांचा स्पर्श झाल्याने अनेकांची कुंडलिनीशक्ती जागृत झाली.

१०. वसंतपंचमीला गुरुपादुकांचे पूजन झाल्यामुळे काळाच्या तारक रूपाचे कृपाशीर्वाद साधकांना लाभून त्याचा निर्गुण आणि समष्टी स्तरावर पुष्कळ लाभ होणार असणे आणि रथसप्तमीला गुरुपादुकांचे पूजन होऊन त्यांची स्थापना झाल्यामुळे गुरुपादुकांमध्ये निर्गुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत होणे

श्रीगुरुपादुकांचे पूजन झाले ती तिथी वसंतपंचमी होती. ही तिथी शुभ आणि आध्यात्मिक कार्यासाठी विशेष लाभदायी असल्यामुळे या दिवशी गुरुपादुकांचे पूजन झाल्यामुळे काळाच्या तारक रूपाचे कृपाशीर्वाद साधकांना लाभून निर्गुण आणि समष्टी स्तरावर पुष्कळ लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे रथसप्तमीला गुरुपादुकांचे पूजन होऊन त्यांची स्थापना झाल्यामुळे गुरुपादुकांमध्ये निर्गुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत झाले.

११. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी स्पर्श केलेल्या गुरुपादुका दैवी शक्ती आणि दैवी चैतन्य यांनी भारित होणे

यानंतर परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी विविध ठिकाणी स्थापन करायच्या १६ गुरुपादुकांना स्पर्श केला. तेव्हा त्यांच्या देहातील लाल रंगाची अवतारी शक्ती आणि पिवळ्या रंगाचे अवतारी चैतन्य त्यांच्या हातातून गुरुपादुकांमध्ये संक्रमित होतांना दिसले. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी स्पर्श केलेल्या गुरुपादुका दैवी शक्ती आणि दैवी चैतन्य यांनी भारित झाल्या.

१२.  परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी धारण केलेल्या पादुकांमध्ये निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याने त्या ‘श्रीदत्ताच्या निर्गुण पादुका’, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उजव्या बाजूने आणि आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी डाव्या बाजूने दिलेल्या खडावांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी स्पर्श केल्यावर त्यांचे रूपांतर अनुक्रमे ‘श्रीदत्ताच्या विमल पादुका’ आणि ‘श्रीदत्ताच्या मनोहर पादुका’ यांमध्ये होणे

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी धारण केलेल्या पादुकांमध्ये निर्गुण तत्त्व कार्यरत झाल्याने त्या श्रीदत्ताच्या निर्गुण पादुकांप्रमाणे झाल्या. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उजव्या बाजूने आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी डाव्या बाजूने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर खडावा धरल्या होत्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श केल्यावर उजव्या बाजूच्या पादुकांचे रूपांतर ‘श्रीदत्ताच्या विमल पादुका’ आणि डाव्या बाजूच्या पादुकांचे रूपांतर ‘श्रीदत्ताच्या मनोहर पादुका’ यांमध्ये झाले.

१३. गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना दत्तलोक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी इतर गुरुपादुकांना स्पर्श केला तेव्हा वैकुंठलोक यांचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण होणे

गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना ‘हा सोहळा दत्तलोकात चालू आहे’, असे जाणवत होते आणि सर्वत्र पिवळसर रंगाचा प्रकाश पसरतांना दिसला अन् सर्वत्र दत्तलोकाचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण झाले. ‘जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी इतर गुरुपादुकांना स्पर्श केला, तेव्हा हा सोहळा वैकुंठात चालू आहे’, असे जाणवले आणि सर्वत्र निळसर रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे जाणवले अन् सर्वत्र वैकुंठलोकाचे वातावरण सूक्ष्मातून निर्माण झाले.

१४. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अत्यंत भावपूर्णरित्या गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन केल्यामुळे गुरुपादुकांमध्ये सुप्तावस्थेत असणारी ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य जागृत होऊन संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित होणे

१२.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अत्यंत भावपूर्णरित्या गुरुपादुकांचे षोडशोपचार पूजन केले. त्यामुळे गुरुपादुकांमध्ये सुप्तावस्थेत असणारी ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य जागृत होऊन संपूर्ण वातावरणात प्रक्षेपित झाले. गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात श्रीविष्णूची शक्ती आणि निर्गुण चैतन्य कार्यरत झाले होते. त्यामुळे पाताळातील अघोरी आणि तंत्र उपासना करणार्‍या मोठ्या वाईट शक्ती पाताळात लपून बसल्या होत्या. त्यांना गुरुपादुकांशी लढता आले नाही. त्यामुळे ते दूर राहून कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे गुरुपादुका-पूजनाचा कार्यक्रम रामनाथी आश्रमात निर्विघ्नपणे पार पडला.

१५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या पादुकांवर सूक्ष्मातून विविध शुभचिन्हे अंकित झाल्याचे दिसणे

त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धारण केलेल्या पादुका सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतल्या. तेव्हा या पादुकांवर सूक्ष्मातून ‘शंख, चक्र, गदा, पद्म, धर्मध्वज, स्वस्तिक आणि ॐ’, ही शुभचिन्हे अंकित झाल्याचे दिसले.

१६. विविध ठिकाणी गुरुपादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाचीही स्थापना होणार असल्याने सूक्ष्मातून होणारे परिणाम

१६ अ. १६ ठिकाणी स्थापन होणार्‍या गुरुपादुकांमध्ये १६ प्रकारच्या लक्ष्मींची सूक्ष्म रूपे कार्यरत होणार असणे : भृगु महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून दिलेल्या आज्ञेनुसार ‘श्रीं’ बीजमंत्ररूपी महालक्ष्मीदेवीची शक्ती गुरुपादुकांसह कार्यरत असल्यामुळे विविध ठिकाणी गुरुपादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकांचीही स्थापना होणार आहे. अशा प्रकारे १६ ठिकाणी स्थापन होणार्‍या गुरुपादुकांमध्ये १६ प्रकारच्या लक्ष्मींची सूक्ष्म रूपे कार्यरत होणार आहेत. सर्व ठिकाणी लक्ष्मीसहित असणार्‍या श्रीविष्णूच्या श्रीपाद रूपातील ‘श्रीचरणांची शक्ती’ सूक्ष्मातून कार्यरत होणार आहे.

१६ आ. ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना विविध ठिकाणी झाल्यावर श्रीविष्णुसहित महालक्ष्मीची कृपा साधकांना लाभून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी जीवनाचे कल्याण होणार असणे : पादुकांमध्ये आवश्यकतेनुसार दत्त किंवा विष्णु तत्त्व कार्यरत होण्यासाठी पदकातील ‘श्रीं’ बीजमंत्ररूपी महालक्ष्मीदेवीची शक्ती सक्रीय होणार आहे. अशा प्रकारे पादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना विविध ठिकाणी झाल्यावर श्रीविष्णुसहित महालक्ष्मीची कृपा साधकांना लाभून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी जीवनाचे कल्याण होणार आहे.

१६ इ.  पादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना विविध ठिकाणी झाल्यावर सर्वत्र श्रीमहालक्ष्मीची सोनपावले उमटणार असणे : पादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना विविध ठिकाणी झाल्यावर सर्वत्र श्री महालक्ष्मीची सोनपावले उमटणार आहेत. या पावलांतून ‘श्री’, ‘शुभ लाभ’ आणि ‘स्वस्तिक’ यांची निर्मिती होऊन हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती, विद्या आणि धनसंपदा जगभरातील साधकांना मिळणार आहे.

१७.  परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाला स्थुलातून स्पर्श करणे, त्याकडे पहाणे आणि शेवटी डोळे मिटणे या वेळी घडलेली सूक्ष्म प्रक्रिया

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाला स्थुलातून स्पर्श केला. तेव्हा त्यांच्या हस्तस्पर्शामुळे पदकामध्ये विष्णुतत्त्व, अवतारी शक्ती अन् चैतन्य कार्यरत झाले. जेव्हा परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून केशरी रंगाचा प्रकाशझोत आणि सगुण स्तरावरील चैतन्य सुवर्णपदकाकडे जातांना दिसले. जेव्हा त्यांनी डोळे मिटले, तेव्हा त्यांच्या आज्ञाचक्रातून पांढर्‍या रंगाचा प्रकाशझोत आणि निर्गुण चैतन्य सुवर्णपदकाकडे जातांना दिसले. त्यामुळे पदकामध्ये ब्रह्मांडातील लक्ष्मीतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता निर्माण झाली आणि पदकाकडे ब्रह्मांडातील श्री लक्ष्मीदेवीच्या शक्तीचा प्रवाह वेगाने आकृष्ट झाला. तो सुवर्णपदकामध्ये अंकित केलेल्या ‘श्रीं’ बीजमंत्रामध्ये कार्यरत झाला अन् बीजमंत्रातून संपूर्ण वातावरणात वेगाने प्रक्षेपित होऊ लागला.

१८. गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेले सुवर्णपदक यांची स्थापना सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात केल्यावर झालेली सूक्ष्म प्रक्रिया

१२.२.२०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रात्री गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेले सुवर्णपदक यांची स्थापना सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात केली. त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फुले वाहिली. तेव्हा पादुकांमधून निर्गुण चैतन्य आणि विष्णुतत्त्व, तर ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकातून निर्गुण शक्ती अन् लक्ष्मीतत्त्व यांचे संपूर्ण आश्रमात, नंतर पृथ्वीवर आणि नंतर संपूर्ण ब्रह्मांडात प्रक्षेपण चालू झाले. गुरुपादुका आणि ‘श्रीं’ बीजमंत्राचे सुवर्णपदक यांचे पूजन अत्यंत भावपूर्णरित्या झाल्यामुळे प.पू. भक्तराज महाराज, म्हणजे गुरुतत्त्व प्रसन्न झाले. त्यामुळे गुरुपादुका आणि सुवर्णपदक यांची स्थापना ध्यानमंदिरात झाल्यावर ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव होऊन त्यांतून दैवी प्रकाश वातावरणात पसरतांना दिसला. त्यांच्या डोळ्यांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे प्रकाशझोत प्रक्षेपित होऊन त्यांचे सनातनच्या विश्‍वव्यापी कार्याला शुभाशीर्वाद लाभले.

१९. येणार्‍या आपत्काळात आणि तिसर्‍या महायुद्धात जगभरातील विविध ठिकाणी रहाणार्‍या साधकांचे रक्षण करण्यासाठी गुरुपादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना विविध ठिकाणी होणार असणे

येणार्‍या आपत्काळात आणि तिसर्‍या महायुद्धात जगभरातील विविध ठिकाणी रहाणार्‍या साधकांचे रक्षण करण्यासाठी गुरुपादुकांसह ‘श्रीं’ बीजमंत्र अंकित केलेल्या सुवर्णपदकाची स्थापना होणार आहे. त्यामुळे या पादुका आणि पदक यांतून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती आणि दैवी चैतन्य यांमुळे सर्व साधकांचे रक्षण होणार आहे. तिसरे महायुद्ध आणि आपत्काळ यांच्या दुष्प्रभावापासून साधकांचे रक्षण करण्यासह सात्त्विक जीव, प्राणीमात्र आणि वनस्पती यांचेही रक्षण होणार आहे. त्याचप्रमाणे गुरुपादुका आणि ‘श्रीं’पदक यांतून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती आणि दैवी चैतन्य यांमुळे संपूर्ण पृथ्वीवरील दूषित वातावरणाची शुद्धी होऊन वातावरण धर्मसंस्थापनेसाठी पूरक होणार आहे अन् साधकांना धर्मसंस्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ आणि ईश्‍वरी कृपा लाभणार आहे.

२०. विविध ठिकाणी स्थापन होणार्‍या गुरुपादुकांमुळे सूक्ष्मातून होणारे विविध परिणाम

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी स्पर्श केलेल्या गुरुपादुका सनातनच्या रामनाथी आश्रमासह जगातील विविध ठिकाणी स्थुलातून स्थापन होणार आहेत. या गुरुपादुका विविध ठिकाणी स्थुलातून स्थापन होण्यापूर्वी त्या सूक्ष्मातून जगातील सनातनच्या विविध ठिकाणी स्थापन होणार आहेत. विविध ठिकाणी गुरुपादुका स्थापन झाल्यामुळे पुढील परिणाम होणार आहेत.

२० अ. शक्तीपिठांची स्थापना होणे : गुरुपादुकांमध्ये कार्यरत असणार्‍या अवतारी शक्तीमुळे आश्रमाभोवती आणि साधकांभोवती सूक्ष्मातून संरक्षककवच निर्माण होऊन आश्रम अन् साधक यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणार आहे.

२० आ. ज्ञानपिठांची स्थापना होणे : गुरुपादुकांमध्ये कार्यरत असणार्‍या ज्ञानशक्तीमुळे आश्रमांमध्ये ज्ञानपिठांची स्थापना होऊन साधकांना सेवेचे ज्ञान, विविध विद्या आणि आत्मज्ञान यांची प्राप्ती होणार आहे.

२० इ. धर्मपिठांची स्थापना होणे : गुरुपादुकांमध्ये कार्यरत असणार्‍या धर्मशक्तीमुळे आश्रमांमध्ये धर्मपिठांची स्थापना होऊन साधकांना धर्मशक्ती, धर्मतेज आणि धर्मज्ञान यांची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे सूक्ष्म आणि स्थूल या रूपांतील अधर्माचा नाश होऊन प्रथम साधकांच्या अंतरात अन् नंतर संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना, म्हणजे धर्मसंस्थापना होणार आहे.

२१. गुरुपादुकांचे दर्शन घेतल्यामुळे साधकांना आध्यात्मिक स्तरावर होणारे विविध प्रकारचे लाभ

विविध ठिकाणच्या साधकांना गुरुपादुकांचे दर्शन होऊन त्यांच्या जीवनातील समस्त अडथळे, संकटे आणि त्यांना होणारे विविध प्रकारचे विकार नष्ट होणार आहेत. अशा प्रकारे साधकांना होणारे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपांचे त्रास दूर होऊन त्यांची भवरोगातून मुक्तता होऊन त्यांचे जीवन आनंदी होणार आहे.

२२.  परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीपादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या दैवी ऊर्जेमुळे भविष्यकाळात अनेक पिढ्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा, आत्मज्ञान आणि आत्मशक्ती यांची प्राप्ती होणार असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीपादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या दैवी ऊर्जेमुळे भविष्यकाळात अनेक पिढ्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा, आत्मज्ञान आणि आत्मशक्ती यांची प्राप्ती होणार आहे. अशा प्रकारे पादुकांमुळे भविष्यातील अनेक पिढ्यांना आध्यात्मिक संपदेचा लाभ होऊन त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्या जीवनाचा उद्धार होणार आहे आणि अवतारी कार्य करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होणार आहे.

२३. भृगु महर्षींनी प्रसन्न होऊन साधकांना आशीर्वाद देणे

भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुपादुका आणि सुवर्णपदक यांचे पूजन झाल्यामुळे भृगु महर्षि प्रसन्न झाले आणि त्यांनी साधकांना आशीर्वाद दिला.

टीप : जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये गुरुतत्त्व आणि ज्ञानशक्ती कार्यरत होत असे, तेव्हा त्यांचे रूप दत्तात्रेयाप्रमाणे दिसले. जेव्हा त्यांच्यामध्ये विष्णुतत्त्व आणि क्रियाशक्ती कार्यरत होत असे, तेव्हा त्यांचे रूप श्रीविष्णुप्रमाणे दिसले.

कृतज्ञता !

‘हे गुरुमाऊली, तुझ्या कृपेमुळे तुझ्या गुरुपादुकांचा महिमा आम्हाला अनुभवण्यास मिळाला आणि तुझ्या कल्याणकारी रूपाचे दर्शन झाले, यासाठी मी तुझ्या पावन चरणी कृतज्ञ आहे.’

(‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणस्वरूप आहेत’, असा साधिकेचा वैयक्तिक भाव आहे, तसेच जीवनाडी पट्टीद्वारे महर्षींनीही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे विष्णुस्वरूप आहेत’, असे सांगितले आहे. – संकलक)

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.


Multi Language |Offline reading | PDF