४८ घंट्यांनंतरही घातक कृतीशून्यता !

संपादकीय

पुलवामा येथे सैन्यावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाला आता अनुमाने ४८ घंटे उलटून गेले आहेत. ‘या आक्रमणामागे पाकचाच हात आहे’, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. शत्रूकडून इतका मानहानीकारक मार खाऊनही अद्याप भाजप सरकारच्या मुठी आवळल्या गेलेल्या नाहीत. देशात कोणाचेही सरकार असो, त्यांना प्रतिआक्रमण करण्याची रीतच ज्ञात नाही. आतंकवाद्यांनी उरी, पठाणकोट आणि आता पुलवामा येथे एकापाठोपाठ एक मोठी आक्रमणे करून जगात भारताची नाचक्की केली. या आक्रमणात आपले शूरवीर सैनिक धारातीर्थी पडले, ही हानी तर कधीही भरून न निघणारी आहे. तरीही सरकारला त्याच्याशी काही देणेघेणे नाही, असेच गेल्या ४८ घंट्यांतील चित्र आहे. साधे कोणी आपल्या कानशिलात लगावली, तर त्याचा हात खाली जायच्या आत आपला हात त्याच्या कानशिलावर पडलेला असतो. याला प्रतिआक्रमण म्हणतात. ही एक नैसर्गिक चीड असते. भाजप सरकारमध्ये तीही दिसून येत नाही. हे दुर्दैवी वगैरे नव्हे, तर संतापजनक आहे.

व्हेअर इज द होश ?

आतंकवादी आक्रमणाविषयी जनतेमध्ये किती रोष आहे, हे देशभरात विविध ठिकाणी नागरिकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनांतून दिसून आले. ही आंदोलने वेतनवाढ, आरक्षण आदी कुठल्याही स्वार्थी मागण्यांकरता नव्हती, तर ‘पाकला नष्ट करा’, या एकाच मागणीसाठी होती. थोडक्यात तो राष्ट्रभक्तीचा व्यक्त स्वरूपातील संघटित आविष्कार होता. नागरिकांनी ठिकठिकाणी ‘रेल रोको’, ‘रस्ता रोको’, पाकचा पुतळा जाळणे आदी आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र सरकार अद्यापही उद्घाटनांच्या धुंदीत आहे. अजूनही त्यांना संरक्षणाऐवजी तथाकथित विकासकामेच महत्त्वाची वाटत आहेत. घरात दुःखद घटना घडली की, साहजिकच आपण सर्व कार्यक्रम रहित करतो; मात्र श्रेय लाटण्याच्या धुंदीत भाजप सरकारला याचेही भान राहिलेले दिसत नाही. उद्घाटन हा एकप्रकारचा आनंदसोहळा असतो. आज देश शोकसागरात बुडाला असतांना उद्घाटने करायला सरकारला लाज कशी वाटत नाही ? २६/११ च्या आक्रमणाच्या कालावधीत काँग्रेस सरकारचे तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी लग्नसराई असल्याप्रमाणे ४ घंट्यांत ४ वेळा वेगवेगळे पोषाख परिधान केले होते. तेव्हा त्यांच्यावर याच भाजपने टीका केली होती ना ! मग आता विविध ठिकाणी आनंदसोहळ्याचे प्रतीक असलेली उद्घाटने करून भाजप वेगळे काय करत आहे ? यावरून सर्व राजकीय पक्ष एका माळेचे मणी आहेत, हे स्पष्ट होते.

अमेरिका किंवा ब्रिटन या राष्ट्रांत अशी आक्रमणे झाल्यावर तेथील राष्ट्रप्रमुख कधी उद्घाटनांचा धडाका लावतांना दिसतात का ? ते शत्रूचा बीमोड करण्यात मग्न असतात. याउलट चित्र सध्या आपल्याकडे पहायला मिळत आहे. या सर्वांमुळे जनतेचा भाजप सरकारविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. अशा शासनकर्त्यांच्या हातात राष्ट्र कधीतरी सुरक्षित राहील का ? सरकारला स्वतःच्या दायित्वाचेही भान उरलेले नाही; म्हणूनच सरकारला ‘व्हेअर इज द होश ?’, असे ठणकावून विचारण्याची वेळ आली आहे.

फुटीरतावाद्यांना धडा शिकवा !

कुठलेही आक्रमण हे स्थानिकांच्या साहाय्याविना होऊ शकत नाही, हे सर्वश्रृत आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी धर्मांध हे जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे आश्रय देतात. आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ हेच फुटीरतावादी धर्मांध भारतीय सैन्यावर दगडफेक करून त्यांच्या जिवावर उठतात. ते उघडउघड पाकची बाजू घेतात, देशविरोधी घोषणा देतात, तसेच भारताचा राष्ट्रध्वज जाळतात. तरीही एकही सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. फुटीरतावाद्यांना रोखू न शकणारे सरकार आतंकवाद्यांना काय रोखणार ? सरकारला जर खरोखरच आतंकवाद्यांचा निःपात करायचा असेल, तर त्यांनी प्रथम देशद्रोही फुटीरतावाद्यांना धडा शिकवला पाहिजे. यासाठी त्यांना इस्रायली बाणा अंगीकारावा लागेल. तथापि मुळमुळीत धोरण असलेले भाजप सरकार हे कदापि करणार नाही, हेही तितकेच खरे ! भाजपची कारवाई म्हणजे ‘प्रसिद्धीपत्रक काढणे’ आणि धडक कारवाई म्हणजे ‘पत्रकार परिषद घेणे’, असा आजवरचा अनुभव आहे ! पुलवामा प्रकरणातही वेगळे काही होतांना दिसत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ ‘सैनिकांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही’, अशी ‘री’ ओढतांना दिसत आहेत. ‘कृतीवीण वाचाळता व्यर्थ आहे’, हे सरकारला कुणीतरी सांगायची आवश्यकता आहे.

हास्यास्पद कारवाईचा बडेजाव !

पुलवामा आक्रमण झाल्यानंतर सरकार तडक सैन्य घुसवून पाकला धडा शिकवील, अशी अपेक्षा होती; परंतु सरकारने काय केले, तर म्हणे पाकला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेतला ! याला जर सरकार कारवाई म्हणणार असेल, तर हसावे कि रडावे, हा प्रश्‍न कुणालाही पडेल. त्यातही सरकार एक गोष्ट जनतेला उघडपणे सांगत नाही किंवा जनतेपासून लपवून ठेवत आहे. ती म्हणजे मुळात पाकने हा दर्जा आपल्याला दिलाच नव्हता. थोडक्यात हे ‘दर्जाप्रेम’ एकतर्फी होते. त्यामुळे हा दर्जा देणार्‍या आणि तो इतकी वर्षे ठेवणार्‍या सर्वपक्षांच्या सरकारांना याची लाज वाटली पाहिजे. म्हणूनच हा दर्जा देणारी काँग्रेस आणि तो विलंबाने काढून घेणारा भाजप दोघेही जनतेच्या न्यायालयात दोषीच ठरतात. हा दर्जा काढून घेऊन ‘आम्ही खूप काहीतरी केले आहे’, अशा आविर्भावात सरकार वागत आहे. अशा फुटकळ कारवाईची भाषा पाकला समजत नाही, हे ढिम्म आणि सुस्त सरकारने लक्षात घ्यायला हवे. कारवाई करायचीच असेल, तर पाकमधून आपल्या राजदुताला परत बोलवा, पाकशी सर्व प्रकारचे संबंध तोडा आणि इस्रायली बाण्याने त्याला नष्ट करा ! हीच सीमेवर रक्त सांडणार्‍या सर्व हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now