‘रथसप्तमीच्या दिवशी गंगास्नान घडणे आणि त्याच दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांचे पूजन होणे’, हे ईश्‍वरी नियोजन !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. ‘आपत्कालीन व्यवस्था आणि पाण्यातील प्रथमोपचार’ याविषयी माहिती देण्यासाठी एका धर्मप्रेमींनी प्रयाग किल्ल्यातील अक्षयवट वृक्ष येथे असलेल्या नावघाटावर बोलावणे आणि त्याच दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या दिव्य जीवनचरित्राशी निगडित कार्यक्रम असल्याचे कळणे

‘१२.२.२०१९ या दिवशी पहाटे आम्ही (मी आणि श्री. चेतन राजहंस) प्रयाग येथील त्रिवेणी संगमावर गेलो होतो. तेथे आम्हाला ‘आपत्कालीन व्यवस्था आणि पाण्यातील प्रथमोपचार’ याविषयी माहिती देण्यासाठी एक धर्मप्रेमी भेटणार होते. ते २ – ३ दिवसांपासून आम्हाला वेळ देण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी आम्हाला १२.२.२०१९ या दिवशी सकाळी सहा वाजता प्रयाग किल्ल्यातील अक्षयवट वृक्ष येथे असलेल्या नावघाटावर बोलावले.

या दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या दिव्य जीवनचरित्राशी निगडित एक कार्यक्रम होता. याविषयी आम्हाला नंतर समजले, ‘परात्पर गुरुदेवांच्या चरणपादुकांचे पूजन होऊन त्या विविध ठिकाणी स्थापित केल्या जातील.’

२. नावाड्याला यायला उशीर होत असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी ‘त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान करू’, असे सांगणे

आम्ही नावेत बसून ‘पाण्यातील प्रथमोपचार व्यवस्था आणि पाण्यातील आपत्कालीन व्यवस्थापन’ याविषयी माहिती जाणून घ्यायची’, असे ठरवले होते. आमचा त्या विषयावर एक लेख लिहिण्याचा विचार होता. नावाडी यायला उशीर होत होता. जे हिंदुत्वनिष्ठ आम्हाला हे सर्व दाखवणार होते, त्यांना थोडेसे अवघडल्यासारखे झाले. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘आपण चालत त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान करू.’’

३. रथसप्तमीच्या दिवशी अकस्मात घडलेले गंगास्नान !

३ अ. श्री. चेतन राजहंस यांनी सूर्याला ३ वेळा अर्घ्य देण्यास सांगणे : आम्ही साडेसहा वाजता त्रिवेणी संगमावर पोचलो. त्या वेळी अंधार होता. सूर्य कुठेच दिसत नव्हता. आम्ही किनार्‍यावर कपडे ठेवून नदीच्या पात्रात उतरलो. त्या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी सांगितले, ‘‘सूर्याला ३ वेळा अर्घ्य द्यावे आणि ३ वेळा पाण्यात डुबकी मारावी, म्हणजे धर्मशास्त्रानुसार गंगास्नान होईल.’’

३ आ. सूर्याला अर्घ्य देत असतांना क्षितिजावर सूर्य उदित होतांना दिसणे आणि ‘अर्घ्य घेण्यासाठी सूर्यदेवता प्रकट झाली’, असे जाणवणे : मी नदीत उतरून सूर्याला अर्घ्य द्यायला हातात पाणी घेतले आणि वर पाहिले, तर त्याच वेळी क्षितिजावर सूर्य उदित होत होता. ‘ही दिव्य घटना घडली आहे’, याची मला क्षणभर जाणीव झाली. ‘अर्घ्य घेण्यासाठी सूर्यदेवता प्रकट झाली’, असे मला जाणवले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘अकस्मात घडलेले गंगास्नान हे ईश्‍वरी नियोजन आहे.’

३ इ. ‘आज रामनाथी आश्रमात होणार्‍या दिव्य कार्यक्रमाचा प्रारंभ गंगास्नानाने, तसेच सूर्यदेवाने गंगाजलाचे अर्घ्य स्वीकारून झाला आहे’, असे मला जाणवले.

३ ई. ‘सूर्याला दिलेले अर्घ्य त्याने स्वीकारून रामनाथी आश्रमात होणार्‍या कार्यक्रमाचे दिव्यत्व आणि परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे अवतारत्व सिद्ध केले आहे’, असे सहसाधकाने सांगणे : मी श्री. चेतन राजहंस यांना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘रामनाथी आश्रमात होणार्‍या दिव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांनी तुमच्या माध्यमातून गंगास्नान केले. तुम्ही (परात्पर गुरुदेवांनी तुमच्या माध्यमातून) सूर्याला दिलेले अर्घ्य सूर्यदेवाने स्वीकारून आज होणार्‍या कार्यक्रमाचे दिव्यत्व आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व सिद्ध केले आहे.’’

४. ‘रथसप्तमीच्या दिवशी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची स्थापना झाल्यामुळे त्यांचे (सनातन संस्थेचे) कार्य सूर्यासमान ब्रह्मांडात तळपत राहील’, असा संकेत असल्याचे जाणवणे

रामनाथी आश्रमात दुपारी गुरुदेवांच्या श्री पादुकांची स्थापना झाली. आम्ही तंबूत आल्यावर आम्हाला समजले, ‘आज रथसप्तमी असून आजचा दिवस हा तसाच दिव्य आणि विशेष आहे. आजच्या दिवशी ‘सूर्यदर्शन करणे’ महत्त्वाचे असते.’ ही अनुभूती अनमोल आहे. ‘आज रामनाथी आश्रमात परात्पर गुरुदेवांच्या पादुकांची स्थापना झाल्यामुळे परात्पर गुरुदेवांचे (सनातन संस्थेचे) कार्य सूर्यासमान ब्रह्मांडात तळपत राहील’, असा संकेत आहे’, असे मला जाणवले.

या अनुभूतीसाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, प्रयागराज, उत्तरप्रदेश. (१२.२.२०१९)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now