भारताला मोठी किंमत चुकवावी लावणारे ‘मोस्ट फेवर्ड नेशन !’

‘पुलवामातील आतंकवादी आक्रमणात ४२ सैनिक हुतात्मा झाल्यानंतर भाजप सरकारने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (सर्वाधिक आवडते राष्ट्र) हा दर्जा काढून घेतला. गेल्या अनेक मासांपासून राष्ट्रप्रेमी संघटनांनी पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेण्याची मागणी केली होती. तथापि सरकारने आता पाकला दिलेला हा दर्जा काढून घेतला.

१. तत्कालीन काँग्रेस सरकारने पाकला दिला होता ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा !

भारताने १ जानेवारी १९९६ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’, हा दर्जा दिला. हा दर्जा मिळणार्‍या देशाला म्हणजे पाकिस्तानला व्यापारात विशेष सवलती (उदा. किमान निर्यात शुल्क आणि विभिन्न व्यापारी करांमध्ये सूट) मिळतात.

२. धूर्त पाकने मात्र भारताला अद्याप हा दर्जा दिलेला नाही !

महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’, हा दर्जा दिला; मात्र पाकने भारताला अद्यापही हा दर्जा दिलेला नाही. ‘आय.सी.आर्.आय.ई.आर्.’च्या आकडेवारीनुसार वर्ष २०१३ – २०१४ मध्ये भारत आणि पाक यांच्यातील व्यापार ४.५ बिलीयन ‘अमेरिकन डॉलर’पर्यंत पोहोचला होता. तथापि या व्यापारामध्ये भारताला नव्हे, तर पाकिस्तानलाच अधिक लाभ झाला. हा दर्जा मिळाल्याने पाकला हानी टाळण्यासाठी एकप्रकारे कवच प्राप्त झाले होते. या दर्जामुळे संबंधित देशाला ‘व्यापारात हानी होणार नाही’, याची निश्‍चिती मिळते. तथापि जर दोन राष्ट्रांमध्ये संरक्षणाच्या कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली, तर हा दर्जा परत काढून घेतला जाऊ शकतो. भारताने आता हे पाऊल उचलले आहे.

वर्ष २००० मध्ये अमेरिकेने चीनला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा दिला; पण याचा अमेरिकेस विशेष लाभ झाला नाही. उलट चीनने अमेरिकेच्या बाजारपेठेत स्वतःकडील अल्प मूल्य असलेली उत्पादने पाठवून धुमाकूळ घातला आणि अल्पावधीत आर्थिक प्रगतीकडे झेप घेतली. पाकिस्तानला होणारा विरोध वेगळ्या कारणासाठी आहे. त्यास पाकपुरस्कृत आतंकवादाच्या समस्येची किनार आहे.

३. ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ दर्जामुळे तरी पाक वठणीवर येईल’, अशी भाबडी आशा बाळगणारे भारतीय राज्यकर्ते !

कितीही गहन विचार केला, तरी ‘भारतासाठी पाकिस्तान हा कोणत्या दृष्टीने ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ आहे ?’, हेच कळत नव्हते. ‘व्यापाराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारतील आणि पाकिस्तानला ‘दाम’च्या आधारे योग्य मार्गावर आणता येईल’, अशी भाबडी आशा भारताने बाळगली होती; मात्र ती फोल ठरली. याउलट पाकिस्तानचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत गेला, तसेच पाकपुरस्कृत आतंकवादही कमालीचा वाढला.

४. हा दर्जा काढून घेण्यासाठी ४२ सैनिकांचे प्राण जाऊ देणारे भाजप सरकार !

‘मोस्ट फेवर्ड नेशन’च्या दर्जामुळे पाकिस्तानने भारतात अनेक वस्तूंसह आतंकवादाची निर्यातही सहज केली. त्यामुळेच ‘हा दर्जा काढून घेतला जावा’, अशी मागणी भारतातील अनेक संस्था आणि संघटना यांच्याकडून सातत्याने केली जात होती. भाजपची सत्ता आल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. आता ४२ सैनिकांचे प्राण गेल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला.

५. सतत भारतविरोधी कारवाया करूनही पाकला भारताने हा दर्जा देणे, हे कोडेच !

पाकिस्तानने भारतावर तब्बल ४ युद्धे लादली. त्यात सहस्रो सैनिक हुतात्मा झाले. देशभरात पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे सहस्रो निरपराध नागरिक मारले गेले. पाकने काश्मीरमध्ये फुटीरतावादी आंदोलनाची बीजे रोवली. भारतात बनावट नोटा घुसवून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. हे सर्व आजही सर्रासपणे चालू आहे. तरीही ‘भारत पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चे बक्षीस देतो’, हे वेगळेच कोडे आहे. ही गोष्ट भारताच्या पाकविरोधी आंतरराष्ट्रीय भूमिकेस छेद देते.

६. ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ असलेल्या पाकने भारताला पाठवले होते सडके कांदे !

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी हे सांगितले आहे की, पाकिस्तानवर सैन्याचेच वर्चस्व असून पाकिस्तानी सैन्य अगदी साबणापासून तेल, कपडे, सिमेंट, सोने आदी व्यापारावर स्वतःचे नियंत्रण ठेवते. तेथील व्यापारी नफ्याचा मोठा हिस्सा सैन्याधिकारी स्वतःकडे ठेवतात. थोडक्यात पाकिस्तानशी व्यापार करणे म्हणजे पाकिस्तानी सैन्याला साहाय्य केल्यासारखे आहे. याच ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ असलेल्या पाकिस्तानने यापूर्वी भारताला सडके कांदे पाठवून भारताला खिजवले होते !

७. छत्रपती शिवाजी महाराजांना कधी कोणाला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देण्याची आवश्यकता भासली नाही !

येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते. महाराजांनी मोगलांशी फारसे व्यापारी संबंध ठेवले नाहीत. इतकेच काय इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्याशीही व्यापारी संबंध ठेवतांना त्यांचे व्यापारविषयक धोरण फारच अभ्यासपूर्ण होते. महाराज नेहमीच भारतीय व्यापारी, शेतकरी, सामान्य जनता यांचे हित सर्वतोपरी जपत असत. त्यामुळे संबंधितांना उचित आर्थिक लाभ होत असे. महाराजांना कधी कोणाला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देण्याची आवश्यकता भासली नाही. छत्रपती शिवरायांनी सुरत जी मोगल साम्राज्याची प्रसिद्ध व्यापारी पेठ होती, ती दोनदा लुटली. ‘आपल्या सरकारला लाहोर आणि कराची लुटता नाही आली तरी चालेल; पण पाकिस्तानला व्यापारात ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ची खिरापत तरी वाटू नका’, असे जनतेला वाटत होते.’

– श्री. राहुल लोखंडे (संदर्भ : ‘सामना’ वृत्तसंकेतस्थळ)


Multi Language |Offline reading | PDF