सनातन संस्थेचे कार्य अद्वितीय आहे ! – श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज, मुंबई

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनांना विविध संत-महंत यांनी भेट दिल्यावर काढलेले गौरवोद्गार !

प्रयागराज (कुंभनगरी), १४ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेचे कार्य अद्वितीय असून आपल्यावर देवाची मोठी कृपा आहे. सध्याच्या कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या महापुरुषांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दहिसर (मुंबई) येथील श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज यांनी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनांना भेट दिल्यानंतर ते बोलत होते. सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी त्यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती दिली. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्याशी ‘राष्ट्र अन् धर्म’ या विषयांवर चर्चा केली.

श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना (डावीकडून) सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि पू. नीलेश सिंगबाळ

श्री श्री १००८ श्री महंत काशीदास महात्यागी महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही घर, प्रपंच पाहून लोकांना धर्माच्या मार्गावर आणत आहात, हे मोठे यशस्वी कार्य आहे. सनातनसारख्या संस्थेची सध्या आवश्यकता आहे. असे धर्मप्रसार करणारे ज्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतात, त्यांच्या ७ पिढ्यांचा उद्धार होत असतो. निःस्वार्थीपणे कार्य करणे, ही एकप्रकारे तपश्‍चर्या आहे. यामुळे पुढील अनेक पिढ्या आपले नाव निघत राहील. कलियुगाचा पहिला टप्पा चालू असून यामध्ये सर्व हिंदूंना जागृत करून धर्माच्या मार्गावर आणणे आवश्यक आहे. लोकांना मांसाहारापासून शाकाहाराकडे वळवणे, विविध व्यसनांपासून जनतेला परावृत्त करणे, असे केल्यानेच दारिद्य्र दूर होऊ शकते. सरकार बोलते ‘दारिद्य्र हटवा !’; मात्र ते कसे हटणार ? प्रत्येक माणूस सत्मार्गावर चालल्यास तो व्यसनांपासून दूर राहून दारिद्य्र हटू शकते.’’


Multi Language |Offline reading | PDF