किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’च्या वतीने आयोजित केलेले ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावरील शिबीर उत्साहात पार पडले !

किन्नीगोळी (कर्नाटक), १४ फेब्रुवारी (वार्ता.) –  मंगळूरू तालुक्यातील किन्नीगोळी येथील ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’मध्ये प.पू. देवबाबा यांनी ४ ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) या विषयावर शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये भारतभरातून ४० जण सहभागी झाले होते. या शिबिरात ‘श्री शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांनी कुंडलिनीचक्रांशी संबंधित बीजमंत्र आणि ‘ॐ’कार यांच्या माध्यमातून ध्यान अन् योगनिद्रा साध्य करण्याच्या पद्धतीविषयी तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती सांगितली. यासमवेत शिबिरार्थींचे शंकानिरसनही करण्यात आले. या शिबिरात सनातनचे पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील कु. तेजल पात्रीकर आणि ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप अन् श्री. निषाद देशमुख सहभागी झाले होते.

शिबिरात मार्गदर्शन करतांना प.पू. देवबाबा

‘ब्रह्मचैतन्य’ म्हणजे ब्रह्मांडात कार्यरत असलेली चैतन्यशक्ती (कॉस्मिक एनर्जी) आणि ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ म्हणजे सहस्रारचक्रावर चैतन्यशक्तीची अनुभूती घेऊन आनंद अनुभवणे. हा आनंद ध्यान आणि योगनिद्रा यांमध्ये अनुभवू शकतो’, असे मार्गदर्शन प.पू. देवबाबा यांनी केले. तसेच ‘हा अनुभव मिळवायचा कसा ?’ याविषयीची तात्त्विक माहिती शिबिरार्थींना सांगून त्यांच्याकडून प्रयोगही करवून घेतले. यासोबत प.पू. देवबाबा यांनी शिबिरार्थींना साधनेमध्ये पडणारे प्रश्‍न विचारून घेऊन त्यांसंदर्भात उपस्थितांची गटचर्चा घडवून आणली आणि त्यांविषयी स्वतःही मार्गदर्शन केले.

शिबिराला उपस्थित शिबिरार्थी, समवेत १. पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ

देशी गायींच्या चांगल्या जातींचे (कपिला, कौशली इत्यादी) संवर्धन होण्यासाठी भूमीची आवश्यकता आहे. ‘ही भूमी विकत घेण्यासाठी धन मिळावे’, या हेतूने या शिबिरांच्या श्रृंखलेतून मिळणार्‍या अर्पणाचा उपयोग केला जाणार आहे. याच विषयावरील पुढील शिबीर २४ ते २८ एप्रिल २०१९ या कालावधीत आयोजित केले जाणार आहे.

‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) शिबिराच्या समारोप सोहळ्यात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर यांनी प्रस्तुत केलेल्या गायनाच्या संदर्भात शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती

कु. तेजल पात्रीकर

‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ (कॉस्मिक डान्स) शिबिराच्या समारोप सोहळ्यामध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील कु. तेजल पात्रीकर यांनी गुरुचरणी कृतज्ञता म्हणून हिंदी भाषेतील ‘गुरु मेरी पूजा…’ हे भजन प्रस्तुत केले. या संदर्भात शिबिरार्थींना पुढील अनुभूती आल्या.

१. कु. तेजल यांनी भजन पुष्कळ भावपूर्ण आणि सुमधुर गायले. ते हृदयाला भिडले. असे भजन मी आतापर्यंत कधीच ऐकले नाही. – श्री. प्रभाकर प्रभु, मूडबिद्री, मंगळूरू.

२. मी आतापर्यंत अनेक प्रसिद्ध गायकांची भजने ऐकली आहेत; पण असे भजन कुठेच ऐकले नाही. पुष्कळ सुंदर ! – श्री. अशोक परुळेकर, गोवा

३. भजन गायन झाल्यावर कु. तेजल यांची भावजागृती झाली, तसेच सर्व शिबिरार्थींचीही भावजागृती होऊन ते निःशब्द झाले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संदर्भात प.पू. देवबाबा आणि शिबिरार्थी यांनी काढलेले गौरवोद्गार

  • शिबिरामध्ये सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनी शिबिराशी संबंधित सूक्ष्म परीक्षण सांगितल्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘हा सूक्ष्मातील स्कॅनर (तपासणीयंत्र) आहे.’’
  • ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुष्कळ छान साधक या शिबिराला पाठवले, याचा मला पुष्कळ आनंद होत आहे. यातून माझ्यावर असलेल्या त्यांच्या कृपेची अनुभूती मी घेत आहे’, असे गौरवोद्गार शिबिराच्या समारोपाच्या सत्रात प.पू. देवबाबा यांनी काढले.
  • शिबिरात प.पू. देवबाबा यांनी स्वतःहून महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनाच्या संदर्भातील माहिती उपस्थितांना सांगितली.
  • शिबिरात सहभागी झालेल्या एका महिलेने सांगितले, ‘सनातनच्या साधकांच्या चेहर्‍यावर पुष्कळ सात्त्विकता आणि तेज दिसते.’

क्षणचित्रे

  • या शिबिरात ध्यान आणि योगनिद्रा यांना पूरक असे प्राणायाम अन् योगासने शिकवण्यात आली. त्यांचा शिबिरार्थींना लाभ झाला.
  • आश्रमात ४० – ५० गायी आहेत. त्यांची सेवा करण्याची संधी शिबिरार्थींना प्रतिदिन मिळाली.
  • सर्व शिबिरार्थींनी ध्यानातील आनंदाची अनुभूती कमी-अधिक प्रमाणात घेतल्याचे मनोगत समारोप सोहळ्यात व्यक्त केले.
  • ‘शिबिरात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर आणि सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी समाधी अवस्थेची अनुभूती घेतली’, असे प.पू. देवबाबा यांनी उपस्थितांना सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF