श्री महालक्ष्मी मंदिरात पुजारी पदासाठी २५२ जणांचे आवेदन !

देवालय ही काही वेतनावर पुजारी नेमण्याची जागा नाही. पूजा करणार्‍यांना मंत्रोपचार, तसेच अन्य धार्मिक कृतींची यथायोग्य माहिती असणे अपेक्षित आहे ! वेतनावर नेमलेल्यांमध्ये देवीप्रती भाव असेल का ?

कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात वेतनावर पुजार्‍यांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले होते. या पदासाठी २५२ आवेदने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे प्राप्त झाली असून पुजारी आणि सेवेकरी अशा दोन वर्गांत ही नेमणूक करण्यात येणार आहे. १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आवेदने पाठवलेल्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यात श्री महालक्ष्मीदेवीच्या संदर्भातील माहिती, पूजा-अर्चा, मंत्रोपचार, तसेच अन्य गोष्टींविषयी माहिती विचारण्यात येणार आहे. सध्या श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण ५० पुजारी आणि सेवेकरी आवश्यक आहेत. देवस्थान समितीने मुलाखतीसाठी कोणत्याही जातीचे बंधन ठेवले नसून हिंदूंमधील सर्व जातींच्या लोकांनी आवेदन करून मुलाखती द्याव्यात, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF