गोव्यात ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामावरून मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मुलाला उच्च न्यायालयाची नोटीस

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामावरून गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांचा मुलगा अभिजात पर्रीकर यांना १२ फेब्रुवारी या दिवशी नोटीस पाठवली आहे. नेत्रावळी पंचायतीचे उपसरपंच अभिजीत देसाई यांनी ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामावर स्थगिती आणण्याच्या मागणीला अनुसरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला अनुसरून उच्च न्यायालयाने ही नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी अभिजात पर्रीकर यांच्यासमवेतच राज्याचे मुख्य सचिव, पर्यावरण आणि वन खात्याचे सचिव, वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. नोटिसीला ११ मार्चपर्यंत उत्तर द्यावे, असे आदेशात म्हटले आहे. हा प्रकल्प नेत्रावळी अभयारण्याच्या जवळ उभारला जात आहे.

उपसरपंच अभिजीत देसाई यांनी केलेल्या याचिकेनुसार ‘इको-रिसॉर्ट’च्या बांधकामाला अनुसरून मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र नष्ट करण्यात येत आहे, तसेच हे बांधकाम करण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्याही करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी शासनाने वटहुकूमही काढला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF