संस्कृतीहीन ‘वेब सिरीज’वर बंदी हवीच !

गेल्या काही वर्षांत माध्यमांमधील स्वातंत्र्याचा अतिरेक होत असून त्याचे गंभीर परिणाम युवा पिढीवर दिसून येत आहेत. परदेशात पाय रोवल्यावर ‘नेटफ्लिक्स’, ‘अ‍ॅमेझॉन’, तसेच अशा अनेक आस्थापनांकडून विविध ‘वेब सिरीज’ भारतात दाखवल्या जात आहेत. यात आता भारतीय दिग्दर्शकही मागे नसून यातील मालिकांमध्ये मुख्यत्वेकरून अश्‍लीलता आणि हिंसक दृश्ये यांचा भडीमार असतो. दुर्दैवाने सध्यातरी यांवर अंकुश ठेवता येईल, असा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याने त्याचाच अपलाभ ही आस्थापने घेत आहेत; मात्र कायदा नाही म्हणून अशा प्रकारच्या ‘वेब सिरीज’ चालू ठेवण्यास अनुमती देणे म्हणजे स्वैराचार करणारे युवक आणि आंबटशौकीन यांना अनिर्बंध वागण्याची एकप्रकारे अनुमती दिल्यासारखे आहे. एकत्र कुटुंबपद्धत, संयत कौटुंबिक जीवन, कौटुंबिक आणि राष्ट्र स्तरावर इतरांचा विचार करणे, हीच भारतीय संस्कृतीची मुख्य मूल्ये असून थेट त्यावरच घाला घालण्याचे काम या ‘वेब सिरीज’ करत आहेत.

‘सेक्स एज्युकेशन’सारख्या मालिका आता ‘नेटफ्लिक्स’वर दाखवल्या जात असून या मालिकेत सर्व मर्यादा पार करण्यात आल्या आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली नेटफ्लिक्सवर ‘पॉर्न’ दाखवण्यात येत आहे. ‘गंदी बात’ नावाची समलैंगिक संबंधांवर आधारीत ‘बेव सिरीज’ एकता कपूर दाखवत असून यात वहिनी-पतीचा भाऊ, महिला नोकर आणि पती यांच्यातील अनैतिक संबंध दाखवण्यात येत आहेत. ‘वेब सिरीज’चा परिणाम आता थेट जनमानसावर दिसत असून याद्वारे लैंगिक भावना उद्दिपत होऊन बलात्काराच्या घटना घडल्याची अनेक उदाहरणे आहेत, तसेच यातील हिंसक दृश्ये पाहून कोवळ्या वयातील लहान मुलेही खून करण्यास मागे-पुढे पहात नसल्याचे समोर येत आहे. या ‘वेब सिरीज’ सहजतेने संकेतस्थळांवर पहाण्यासाठी उपलब्ध होत असून किशोरवयीन तरुणांमध्ये याचे आकर्षण वाढत आहे.

भाजप शासनाने कायदा करून ‘वेब सिरीज’ बंद कराव्यात !

‘सुदर्शन’ वाहिनीचे श्री. सुरेश चव्हाणके यांनी याविषयी आवाज उठवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. श्री. चव्हाणके यांनी ‘ट्विटर’वर यासाठी अभियान उघडले असून त्याला प्रतिसादही मिळत आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून त्यावर सुनावणी चालू आहे. न्यायालयाने नोटीस पाठवल्यावर ‘वेब सिरीज’ चालवणार्‍या काही आस्थापनांनी सुनावणीसाठी उपस्थित रहाण्यास नकार देत ‘आम्हाला माध्यम स्वातंत्र्य असून संकेतस्थळाद्वारे आम्ही काय दाखवावे, याचे बंधन सरकार आम्हाला घालू शकत नाही’, असे उद्दाम उत्तर दिलेे. भाजप शासनाने तरुण पिढीला स्वैराचार आणि गुन्हेगारीकडे वळण्यापासून वाचवण्यासाठी लवकरात लवकर कठोर कायदा करून अशा ‘वेब सिरीज’ बंद केल्या पाहिजेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now