कुंभमेळ्यात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेले मार्गदर्शन !

११ फेब्रुवारी या दिवशी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सहभाग घेतला. या वेळी त्यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

आंदोलनात सहभागी झालेले संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ

१. महंत श्री रामज्ञानीदास महाराज, गोंदिया (महाराष्ट्र)

‘हिंदु धर्मात गायीमध्ये ३३ कोटी देवता असल्याचे सांगितले आहे. तरीही देशात गायींची कसायांकडून निर्दयीपणे हत्या केली जाते. देशातील भारतमाता, गंगामाता आणि गोमाता यांच्यावर संकट आले आहे. गायीचे दूध पोषक असल्याचे आयुर्वेदाने संशोधनानुसार सिद्ध केले आहे. देशात प्रतिदिन १० सहस्र गायींची हत्या केली जाते. ७० वर्षांपासून देशात अशी स्थिती आहे. वारंवार आंदोलने करूनही सरकार गोहत्येवर बंदी घालत नाही. त्यामुळे सरकारने गोहत्येवर बंदी घालावी.’

२. महंत परमहंसदास महाराज, अयोध्या तपस्वी छावणी

गंगा नदी दूषित होत असतांना याविषयी सरकार गंभीर नाही. गंगा नदीत कचरा न टाकण्यासाठी कठोर कायदा सिद्ध केला पाहिजे. देशात सनातन धर्म असल्याने भारत हिंदु राष्ट्र झाला पाहिजे. विश्‍वातील कोणतीही शक्ती राममंदिर उभारणी आणि भारताला हिंदु राष्ट्र होण्यापासून रोखू शकत नाही. सनातन धर्म समुद्रासारखा विशाल असून तो सर्वांना सामावून घेत असतो. अयोध्येत रामाचा जन्म झाल्याने तेथेच राममंदिर उभारले पाहिजे. बाबराचा याच्याशी काहीच संबंध नाही.

३. स्वामी चैतन्यगिरी महाराज, हिंदु तख्त पंजाब

देशात १०० कोटी हिंदू असल्याने हिंदु राष्ट्र झालेच पाहिजे. देशातील अनेक गद्दार लोक हिंदु धर्मावर सतत कुरघोडी करत असल्याने त्यांना देशातून हाकलून लावले पाहिजे. देशात गायींची सर्रास हत्या होत असतांना शासन त्याकडे दुर्लक्ष करते. गाय सुरक्षित राहिली, तर धर्म आणि देश सुरक्षित राहील.

४. स्वामी स्वतंत्रपाल महाराज, राष्ट्रीय सल्लागार, हिंदु तख्त पंजाब

महंत श्री पंचानंदगिरी महाराज यांच्या वतीने संदेश घेऊन आलेले श्री स्वतंत्रगिरी महाराज म्हणाले, ‘भारत हा विशाल असून तो अफगाणिस्तानपर्यंत आहे. आज बरेच हिंदू केवळ पैशासाठी ख्रिस्ती पंथ स्वीकारत आहेत. मशीद आणि चर्च यांना हात न लावता सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांतील पैशाला हात लावला आहे. सरकार मंदिरांना सरकारचे ‘ट्रस्ट’ बनवत आहे, हे अयोग्य आहे.’

५. ह.भ.प. शाम महाराज, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र हिंदुभूषण

देशात केवळ हिंदूंच्या मंदिरांचे अधिग्रहण होत आहे. सरकारची ही प्रक्रिया चुकीची आहे. अयोध्येत राममंदिर उभे झालेच पाहिजे, असा हिंदूंचा संकल्प आहे. वर्ष २०१४ मध्ये भाजपला निवडून दिले, तरीही राममंदिर उभे राहिले नाही. वर्ष २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने राममंदिराविषयीचा अध्यादेश काढावा. हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. गंगा नदीचे प्रदूषण न होण्यासाठी संत उपोषण करून देहत्याग करतात, ही निंदनीय गोष्ट आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मांडलेल्या विषयांचे मी समर्थन करतो.

६. श्री. जगदीश त्रिपाठी

हिंदु जनजागृती समितीने असे आंदोलन केल्याविषयी मी आनंदित झालो आहे. अयोध्येत बाबरी मशीद नव्हे, तर राममंदिरच उभे राहिले पाहिजे. तेथील भूमी मुसलमानांची नाही. गंगा नदीचे संरक्षण झाले पाहिजे, कारण गंगानदीचे पाणी हिंदूंसाठी पवित्र आहे. त्यामुळे साधू, संत आणि हिंदूंनी गंगा नदी अन् गायी यांचे संरक्षण केले पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF