अन्नदानासाठी साहाय्य करणार्‍या ‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’चे स्वामी ग्यानसिंहजी महाराज यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

स्वामी ग्यानसिंहजी महाराज (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), १२ फेब्रुवारी (वार्ता.) – हरिद्वार येथील ‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’ने कुंभमेळ्यात धर्मकार्यासाठी देशभरातून आलेले सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली. यासाठी ट्रस्टचे स्वामी ग्यानसिंहजी महाराज यांचा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पुष्पहार घालून अन् भेटवस्तू देऊन नुकताच सन्मान केला. या वेळी समितीचे ओडिशा राज्याचे समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर हेही उपस्थित होते.

स्वामी ग्यानसिंहजी महाराज हे कनखल, हरिद्वार येथील श्री पूज्य पंडित अवतारहरिजी महाराज यांच्या ‘ओम दीनदयाळ ट्रस्ट’च्या कुंभमधील अन्नछत्राचे संचालक आहेत. वर्ष २०१३ च्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यातही या न्यासाच्या वतीने साधकांना अन्नदानासाठी साहाय्य करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभमेळ्यात धर्मप्रसारासाठी मोरी मुक्ती चौक येथे अनुक्रमे ग्रंथप्रदर्शन अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यासह कुंभक्षेत्री अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन, हिंदु राष्ट्र जागृती संपर्क अभियान, हिंदू अधिवेशन, स्वच्छ कुंभ  सात्त्विक कुंभ अभियान आदी अनेक उपक्रम चालू आहेत. या सेवेसाठी प्रयागराज येथे देशभरातून सनातनचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते आले आहेत. याची माहिती मिळताच स्वामी ग्यानसिंहजी महाराज यांनी साधकांना अन्नदानासाठी साहाय्य केले. त्यांच्या या सहकार्यामुळे धर्मकार्यात मोलाचे साहाय्य झाले. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांची भेट घेऊन संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेचे धर्मकार्य ऐकूण महाराजांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि अशा कार्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF