सूर्यनारायणाशी बोलण्याची इच्छा व्यक्त केल्यावर साधिकेला सूर्यनारायणाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘२८.१२.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘महर्षींनी पू. डॉ. उलगनाथन् यांच्या माध्यमातून ‘साधकांनी प्रतिदिन ९ सूर्यनमस्कार घालावेत’, असे सांगितल्याचे छापून आले होते. त्यानुसार मी सूर्यनमस्कार घालू लागले. सूर्यनमस्कार घालून झाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सूर्यनमस्कार घातल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले अन् काही त्रास झाला नाही’, असे आपण सूर्यनारायणाला सांगूया.’ त्यानंतर सूर्यदेवाशी बोलतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सूर्यदेवाशी बोलण्यासाठी आगाशीत गेल्यावर ‘तो वाट पहात आहे’, असे जाणवणे आणि त्याला प्रार्थना करणे

एके दिवशी सकाळी खोलीत सूर्यनमस्कार घालून झाल्यावर मी सूर्यदेवाशी बोलण्यासाठी आगाशीत गेले, तेव्हा ‘सूर्यदेव माझीच वाट पहात आहे’, असे मला जाणवले. मी सूर्यदेवाला नमस्कार करून त्याला सांगितले, ‘मला सूर्यनमस्कार घातल्यावर चांगले वाटले आणि माझा सेवेतील उत्साहही वाढला.’ नंतर ‘तुझे हे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे. त्या चैतन्यामुळेे माझ्यातील स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ देत. तुझ्यातील चैतन्याने मला निर्मळ आणि स्वच्छ कर, म्हणजे मला गुरुचरणांकडे लवकर जाता येईल’, अशी मी प्रार्थना केली.

२. डोळ्यांना सूर्यकिरणांचा त्रास होत असल्याचे सूर्यदेवाला सांगितल्यावर त्याने स्वतःवर काळा गोळा घेतला असल्याचे आणि त्या काळ्या गोळ्याचे विघटन होऊन गुलाबी रंग पसरल्याचे जाणवणे अन् आकाशात सूर्यकिरण न दिसता सूर्याचा पांढरा रंग वर्तुळाकारात दिसणे

मी सूर्यदेवाला म्हणाले, ‘तुझ्याशी बोलतांना माझ्या डोळ्यांना तुझ्या किरणांचा त्रास होत आहे. माझ्या डोळ्यांची अवस्था तुला ठाऊकच आहे, तरीही मला तुझ्याशी बोलायचे आहे.’ नंतर माझ्या डोळ्यांना त्रास होऊ नये; म्हणून सूर्यनारायणाने एक चमत्कार केला. ‘त्याने स्वतःवर एक काळ्या रंगाचा गोळा घेतला आणि नंतर त्या काळ्या गोळ्याचे विघटन होऊन तेथे गुलाबी रंग पसरला अन् ‘त्या गुलाबी रंगाने संपूर्ण आकाश गुलाबी झाले आहे’, असे मला जाणवले. आकाशात सूर्यकिरण न दिसता सूर्याचा पांढरा रंग वर्तुळाकारात दिसत होता. माझी दृष्टी जेथे जाईल, तेथे मला सगळे गुलाबीच दिसत होते. नंतर मी सूर्यदेवाला ‘आता मला प्रथम ध्यानमंदिरात जाऊन नंतर सेवेला जायचे आहे’, असे सांगितले. मी ध्यानमंदिरात जात असतांना मला पायर्‍यांवर आणि नंतर ध्यानमंदिरातही सगळीकडे गुलाबी रंग दिसत होता.

३. दुसर्‍या दिवशीही ‘सूर्यदेवाने स्वतःवर काळा गोळा घेऊन नंतर गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे वलय पसरवून डोळ्यांची काळजी घेतली’, असे जाणवणे

दुसर्‍या दिवशी मी आगाशीत गेल्यावर सूर्यनारायणाने तसाच चमत्कार दाखवला. ‘त्याने स्वतःवर काळा गोळा घेतला असल्याचे आणि नंतर त्याचे विघटन होऊन प्रथम गुलाबी आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे वलय पसरवले’, असे मला जाणवले. त्या पिवळ्या रंगात मधोमध पांढरा रंग, म्हणजे  सूर्यनारायणच दिसत होता.

अशा प्रकारे सूर्यनारायणाने सतत दोन दिवस मला वेगवेगळ्या अनुभूती देऊन माझ्या डोळ्यांची काळजी घेतली आणि मला पुष्कळ आनंद दिला. (अंदाजे १० वर्षांपासून डोळ्यांचा त्रास आहे. उजव्या डोळ्याचे बुबुळ फिरते. ते पुन्हा जागेवर आणावे लागते. ३ वर्षांपूर्वी डाव्या डोळ्याच्या मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले आहे.)

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेनेच मी या अनुभूती घेऊ शकले. त्यासाठी भगवान श्रीकृष्ण, श्री सूर्यनारायण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती अनिता कोनेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.३.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF