भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार ११.११.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात दुसर्‍यांदा झालेल्या ‘सौरयागा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना आलेल्या अनुभूती !

 

कु. मधुरा भोसले

‘भृगु नाडीपट्टीवाचक श्री. सेल्वम गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षी भृगु यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी, ११.११.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात दुसर्‍यांदा ‘सौरयाग’ करण्यात आला. या यागाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

१. सौरयागाच्या वेळी आलेल्या अनुभूती

१ अ. शंखनाद ऐकतांना शंखनादातील सूक्ष्म नादलहरींतून प्रक्षेपित होणारे निर्गुण चैतन्य आज्ञाचक्रावाटे देहात जातांना जाणवणे : सौरयागाला आरंभ होण्यापूर्वी सनातनचे साधक-पुरोहित श्री. चैतन्य दीक्षित यांनी ३ वेळा शंखनाद केला. तेव्हा मला माझ्या आज्ञाचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या आणि माझ्या मनाची एकाग्रता वाढली. ‘शंखनादातील सूक्ष्म नादलहरींतून प्रक्षेपित होणारे निर्गुण चैतन्य आज्ञाचक्रावाटे माझ्या देहात जात आहे’, असे मला जाणवले.

१ आ. गणपति-पूजनाच्या वेळी गणपतीचा नामजप चालू होणे : गणपति-पूजनाच्या वेळी माझा ‘ॐ गँ गणपतये नम: ।’, हा नामजप चालू झाला. श्रीगणेशपूजनातून प्रक्षेपित होणारे गणेशतत्त्व आणि प्राणशक्ती मला ग्रहण करता आली. त्यामुळे मला जाणवणारा आध्यात्मिक थकवा थोडा उणावला.

१ इ. सूर्यदेवाच्या पूजनाच्या वेळी सूर्यदेवाचा नामजप चालू होणे आणि जलाभिषेकाच्या वेळी शरिरात थंडावा पसरतांना जाणवणे : सूर्यदेवाचे पूजन चालू झाल्यावर माझा ‘ॐ सूर्याय नम: ।’, हा नामजप चालू झाला आणि ‘माझ्या देहाकडे सूर्यतत्त्व आकृष्ट होत आहे’, असे मला जाणवले. जेव्हा सूर्यदेवाच्या मूर्तीवर जलाभिषेक चालू होता, तेव्हा ‘माझ्या शरिरात थंडावा पसरत आहे’, असे मला जाणवले.

२. सौरयागाचे सूक्ष्म परीक्षण

२ अ. सूर्याच्या परिवार देवतांनी संतांच्या भोवती ३ वेळा प्रदक्षिणा घातल्यावर संतांभोवती संरक्षककवच निर्माण होणे : सूर्याच्या बारा रूपांना ‘सूर्याच्या परिवार देवता’ म्हणतात. सौरयाग चालू असतांना सूर्याच्या परिवार देवतांनी संतांच्या भोवती ३ वेळा प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा ‘संतांच्या भोवती सौरमंडल कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे त्यांच्यावर तेजतत्त्वाच्या स्तरावर होणारी सूक्ष्मातील वाईट शक्तींची आक्रमणे परतवली गेली.

२ आ. ५ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी काळ्या रंगाच्या आकृत्यांचे रूप धारण करून यज्ञकुंडाजवळ येणे आणि त्यांनी सूर्यदेवाकडून प्रक्षेपित होणारा दैवी प्रकाश दैवी अन् ऊर्जा २० टक्के इतकी शोषून घेणे अन् त्यांना सूर्यदेवाकडून प्रक्षेपित झालेले सूर्यास्त्र लागल्यावर त्या नष्ट होणे, तसेच त्यांच्या साहाय्यासाठी आलेल्या ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींना श्रीहरि विष्णूकडून प्रक्षेपित झालेले वैष्णवास्त्र लागल्यावर त्यांचा नाश होणे : सौरयाग चालू असतांना यज्ञकुंडातील अग्नीज्वालेत प्रकट झालेल्या सूर्यदेवाकडून दैवी ऊर्जा आणि दैवी प्रकाश यांचे वातावरणात प्रक्षेपण चालू झाले. ‘ही दैवी ऊर्जा आणि दैवी प्रकाश सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मिळू नये’, यासाठी ५ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती काळ्या रंगाच्या आकृतींचे रूप धारण करून यज्ञकुंडाजवळ आल्या. या आकृत्यांमध्ये निर्गुण स्तरावरील काळी शक्ती कार्यरत असल्यामुळे त्यांच्याकडे पहातांना त्यांचे नाक, डोळे किंवा तोंड दिसत नव्हते. या आकृत्यांनी यज्ञकुंडातून प्रक्षेपित होणारा दैवी प्रकाश आणि दैवी ऊर्जा २० टक्के इतकी शोषून घेतली. त्यानंतर सूर्यनारायणाकडून त्यांच्या दिशेने सूर्यास्त्र गेले आणि सूर्यास्त्रातील शक्तीच्या आघातानेे त्या वाईट शक्तींचा नाश झाला. जेव्हा ५ व्या पाताळातील वाईट शक्तींना साहाय्य करण्यासाठी ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती आल्या, तेव्हा त्यांचा निप्पात करण्यासाठी श्रीहरि विष्णूने वैष्णवास्त्र सोडले. त्यामुळे ६ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा नाश झाला.

२ इ. सूर्यगायत्री मंत्र चालू असतांना यज्ञात तुपाची आहुती देतांना यज्ञकुंडातून प्रक्षेपित झालेल्या सूर्याच्या तेजामुळे ५ व्या पाताळातील वाईट शक्ती होरपळून जाणे आणि त्यांच्या साहाय्यासाठी आलेल्या ६ व्या पाताळातील वाईट शक्तींनी यज्ञकुंडाभोवती दाट त्रासदायक आवरण निर्माण करणे अन्  सूर्यनारायणाकडून सुदर्शनचक्र सुटल्यामुळे यज्ञकुंडाभोवतीचे त्रासदायक आवरण नष्ट होणे : पुरोहितांनी सूर्यगायत्री मंत्र म्हणून यज्ञात तुपाची आहुती दिली. तेव्हा सूर्याचे तेज वाढले आणि या तेजाच्या प्रक्षेपणामुळे ५ व्या पाताळातील वाईट शक्ती होरपळून गेल्या. त्यामुळे ५ व्या पाताळातील वाईट शक्तींना साहाय्य करण्यासाठी ६ व्या पाताळातील वाईट शक्ती आल्या. त्यांनी निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करून ‘यज्ञकुंडाभोवती काळे कापड झाकावे’, त्याप्रमाणे दाट त्रासदायक आवरण निर्माण केले. सूर्यनारायणाने सुदर्शनचक्र सोडून यज्ञकुंडाभोवतीचे त्रासदायक आवरण नष्ट केले. त्यामुळे यज्ञातून पूर्वीप्रमाणेच चैतन्य प्रक्षेपित होऊ लागले.

२ ई. ६ व्या पाताळातील वाईट शक्तींनी पाठवलेल्या आणि पांढर्‍या रंगाची आकृती असलेल्या एका वाईट शक्तीने यज्ञज्वालेशी एकरूप होऊन सूर्यदेवासाठी दिलेल्या पूर्णाहुती ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे अन् सूर्यनारायणाने तिच्या दिशेने सुदर्शनचक्र सोडून तिच्यावर आघात करून तिची शक्ती न्यून केल्यावर तिचा तोंडावळा रडल्यासारखा दिसू लागणे : यज्ञकुंडाच्या आतील बाजूला एक पांढर्‍या रंगाची आकृती दिसत होती. तिच्याकडे पाहिल्यावर तिचा तोंडावळा प्राण्याप्रमाणे दिसत होता. ‘या वाईट शक्तीला ६ व्या पाताळातील वाईट शक्तींनी सौरयागामध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवले आहे’, असे देवाने सांगितले. ही वाईट शक्ती तेजस्वरूप असल्यामुळे ती यज्ञज्वालेशी एकरूप झाली आणि यज्ञात सूर्यदेवासाठी दिलेली पूर्णाहुती ग्रहण करू लागली. सूर्यनारायणाने तिच्या दिशेने सुदर्शनचक्र सोडून तिच्यावर आघात केला आणि तिची शक्ती न्यून केली. त्यानंतर ती यज्ञज्वालेतून बाहेर आली आणि यज्ञकुंडाच्या आतील बाजूला चिकटली. सूर्यदेवाशी झालेल्या सूक्ष्म युद्धामध्ये वाईट शक्तीचा पराभव झाल्यामुळे तिचा तोंडवळा रडल्यासारखा दिसत होता.

३. सध्याचा काळ केवळ पृथ्वीवरील मनुष्यासाठीच नव्हे, तर स्वर्गलोकातील देवतांसाठीही कठीण असणे

सौरयागाच्या वेळी ‘स्वर्गलोकातील देवतांवरही पाताळातील मोठ्या वाईट शक्ती सूक्ष्मातून आक्रमणे करत आहेत’, हे सूत्र लक्षात आले. यावरून ‘सध्याचा काळ केवळ पृथ्वीवरील मनुष्यासाठीच नव्हे, तर स्वर्गलोकातील देवतांसाठीही किती कठीण आहे’, याची जाणीव झाली. यावरून सूक्ष्मातील युद्धाची व्याप्ती आणि तिचे परिणाम यांची कल्पना येते. केवळ देवाच्या कृपेमुळेच पृथ्वीवरील मनुष्यरूपातील साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर वाईट शक्तींची सूक्ष्मातील असंख्य आक्रमणे होऊनही ते जिवंत आहेत. यासाठी भगवंताच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०१८, रात्री १०.५०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF