(अव)शेष ठेवू नका !

संपादकीय

भारतात जिहादी आतंकवाद्यांसमवेत त्यांचे पाठीराखे या देशात असेपर्यंत या देशातील जिहादी आतंकवाद कधीही नष्ट होणार नाही, हे निर्विवादित सत्य परत परत समोर येत असते आणि आताही ते समोर आले आहे. ‘भारताला जिहादी आतंकवाद्यांपेक्षा अधिक धोका या जिहादी पाठीराख्यांमुळे आहे’, हे भाजपला आणि अन्य राजकीय पक्षांनाही ठाऊक आहे; मात्र केवळ मतांच्या राजकारणामुळे आणि तथाकथित निधर्मीपणामुळे प्रत्येक जण त्याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रघात करत आहेत. काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे (पीडीपीचे) राज्यसभेतील खासदार महंमद फैयाज मीर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, ‘(संसदेवरील आक्रमणाच्या प्रकरणात फाशी देण्यात आलेला) महंमद अफजल आणि (‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचा संस्थापक सदस्य) महंमद मकबूल भट (याला काश्मीरमधील पोलीस अधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणात ११ फेब्रुवारी १९८४ या दिवशी फाशी देण्यात आली आणि त्याचे शव तिहार कारागृहात पुरण्यात आले होते) यांचे अवशेष त्यांच्या परिवारांना देण्यात यावेत. यापूर्वी माजी पंतप्रधानांच्या हत्येच्या दोषींची फाशी रहित करून ती जन्मठेप करण्यात आली होती. त्यामुळे या २ जणांचे अवशेष त्यांच्या कुटुंबाला परत देण्याची मागणी चुकीची नाही. जर अवशेष परत केले, तर काश्मीरमधील नागरिकांची फुटीरतेची भावना अल्प होईल’, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी या आतंकवाद्यांचे अवशेष परत देणार नाहीत, इतका विश्‍वास त्यांच्यावर नक्कीच ठेवण्यात येईल; मात्र त्यापुढे जाऊन ‘मोदी यांनी अशी मागणी करणार्‍यांना कारागृहात डांबण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, अशीच राष्ट्रभक्तांची मागणी राहील. काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांपासून सैनिकांच्या आतंकवाद्यांच्या विरोधातील प्रत्येक कारवाईच्या वेळी त्यांच्यावर देशद्रोही धर्मांधांकडून दगडफेक होत असते. इतर वेळेलाही गस्त घालतांना सैनिकांवर, त्यांच्या वाहनांवर दगडफेक केली जाते. त्यांना आतापर्यंत भाजप सरकारने आतंकवादी घोषित करून त्यांच्यावर आतंकवाद्यांच्या विरोधात करतात, तशीच कारवाई करण्याचा आदेश सैनिकांना दिला पाहिजे होता; मात्र भाजपने तो अद्याप दिलेला नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये राज्याची सत्ता मिळवण्यासाठी पीडीपीशी युती करून राष्ट्रभक्तांच्या विश्‍वासाला तडा देण्याचे काम यापूर्वी केले आहे. त्याच पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आतंकवाद्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत असतात. सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्याच पीडीपीकडून आता या आतंकवाद्यांचे अवशेष देण्याची मागणी आली आहे. अशा राष्ट्रघातकी पक्षांवर बंदी घातली पाहिजे. त्यासाठी मोदी यांनी प्रयत्न करायला हवेत, असेच राष्ट्रभक्तांना वाटते. असे राजकीय पक्ष भारतीय लोकशाहीच्या नावाखाली देशद्रोही कारवाया करत आहेत, हे आता देशाला समजले आहे. भाजपने त्यांच्याशी युती करण्याचा राष्ट्रघातकी निर्णय घेतला होता. आता मात्र मोदी यांनी पुढचे पाऊल टाकून ही कीड संपवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आता भाजप, शिवसेना अन्य पक्षांतील राष्ट्रभक्त खासदारांनी मोदी यांना पत्र लिहून केली पाहिजे.

मीर यांनी ‘आतंकवाद्यांचे अवशेष परत केल्यामुळे काश्मीरमधील लोकांनी आतंकवादाची भावना अल्प होईल’, असे म्हटले आहे. त्यांच्या या म्हणण्यावर कोणी विश्‍वास ठेवू शकतो का ? मुळात ही भावनाच त्यांनी अल्प नाही, तर नष्ट करून शांतपणे भारतात रहायला हवे. भारताने काश्मीरसाठी जितका पैसा खर्च केला तितका पैसा अन्य राज्यांसाठी खर्च केलेला नाही. ३ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये पूर आल्यावर सैनिकांनी तत्परतेने काश्मिरींचे प्राण वाचवले होते. असे कृतघ्न लोक फुटीरतावाद जोपासत आहेत. यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करणे पालथ्या घड्यावर पाणी घालण्यासारखे आहे. केवळ काश्मीरमध्येच नव्हे, तर भारतात शांती नांदण्यासाठी अशांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

अमेरिकेकडून शिका !

आताच्या भाजप सरकारच्या काळातच मुंबईतील वर्ष १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला वर्ष २०१५ मध्ये फाशी देण्यात आली आणि त्याचे शव त्याच्या नातेवाइकांकडे देण्यात आले होते. त्याच्या अंत्ययात्रेला सहस्रावधी धर्मांध गोळा झाले होते. यावरून याकूब मेमन याने जी कृती केली होती, ती चुकीची होती, असे या धर्मांधांना वाटत नव्हते, हेच सिद्ध होते. ही घटना मोदी यांना रोखता आली असती. महंमद अफजल आणि मकबूल भट यांना काँग्रेसच्या काळात फाशी देऊन त्यांचे शव कारागृहातच दफन करण्यात आले होते, तसा निर्णय याकूबच्या संदर्भात काँग्रेसमुक्तीच्या घोषणा करणारे मोदी यांनी घ्यायला हवा होता. असे केल्याने याकूब मेमन याचे उदात्तीकरण झाले नसते. अमेरिकेने पाकमध्ये घुसून लादेन याला ठार केले आणि त्याचे शव महासागराच्या गर्भात नेऊन दफन करून टाकले. असा प्रयत्न भारताने या आतंकवाद्यांच्या संदर्भात करायला हवा, असेच प्रत्येक राष्ट्रभक्ताला आता वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखान याचा कोथळा काढून त्याला ठार केेले आणि तेथेच गाडले. आज तेथे अफझलखान याच्या नावाने उरूस साजरा केला जातो. तेथे अवैध बांधकामही करण्यात आले आहे. ते हटवण्याचा न्यायालयाने आदेश देऊनही पूर्वी काँग्रेस आणि आता भाजप सरकारनेही त्यावर कारवाई केलेली नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे भाजपकडून पुष्कळ अपेक्षा ठेवताही येत नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती हिंदूंना आता लक्षात आली आहे. तूर्तास भाजप सरकारचे काही दिवस शिल्लक आहेत, त्यात त्यांनी याविरोधात ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा, अशी छोटीशी अपेक्षा !


Multi Language |Offline reading | PDF