हिंदु समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

बेळगाव, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी मुसलमानांना त्यांचे स्वतंत्र राष्ट्र मिळाले; पण उर्वरित भारत हिंदूंचा राहिला नाही. भारत धर्मनिरपेक्ष बनला. या धर्मनिरपेक्ष भारतात हिंदूंची गळचेपी होत आहे. हिंदु समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, हिंदु धर्माला राज्यघटनेत स्थान मिळवून देण्यासाठी, हिंदूंच्या प्रथा-परंपरा-संस्कार यांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या मैदानात १० फेब्रुवारीला आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी उपस्थित ७०० धर्माभिमानी बेळगाववासियांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार केला.

सभेच्या प्रारंभी श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती वासुदेव छत्रे, चैतन्य छत्रे, बाळू देशपांडे यांनी वेदमंत्रपठण केले. अधिवक्ता चेतन मणेरीकर यांचा सत्कार श्री. विजय नंदगडकर यांनी, श्री. रमेश शिंदे यांचा सत्कार योग वेदांत सेवा समितीचे साधक आणि उद्योजक अमरसा चौधरी यांनी, अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांचा सत्कार श्री. विजय नंदगडकर यांनी, तर सौ. उज्ज्वला गावडे यांचा सत्कार पिरनवाडी येथील आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. भारता पाटील यांनी केला. सभेच्या शेवटी उपस्थितांनी हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होण्याची शपथ घेतली.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले…

१. लोकशाही पद्धतीत मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मात्र चर्च आणि मशीद यांचा विचारही केला जात नाही. सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील धनाचा अत्यल्प वापर हिंदु धर्मासाठी केला जातो, तर मंदिरांचे धन हे मदरशांचे आधुनिकीकरण, चर्च, हज यांवर उधळले जाते. ही कुठली धर्मनिरपेक्षता ? ७० वर्षांतील या अयशस्वी धर्मनिरपेक्ष लोकशाहीने हिंदूंची केवळ दडपशाहीच केली आहे.

२. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या दुष्प्रवृत्ती बेळगावात शिरल्या आहेत. म्यानमारमधून आलेले रोहिंग्या प्रथम बेळगावात आले. त्यांच्याकडे आधारकार्ड, शिधापत्रिकाही आहेत. हिंदु राष्ट्रात अशा देशद्रोही प्रवृत्तींना स्थान नसेल.

३. अयशस्वी लोकशाहीच्या विरोधात हिंदु राष्ट्राची वज्रमूठ बांधण्यास सिद्ध व्हा.

हिंमत असेल, तर राहुल गांधींनी कोलूने तेल काढून दाखवावे ! – रमेश शिंदे

जनसामान्यांमध्ये ज्यांची प्रतिमा ‘पप्पू’ म्हणून आहे, असे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुटकेसाठी इंग्रजांना माफीनामा लिहिल्याचे सांगत वीर सावरकरांवर टीका करतात; पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणतेही ‘माफीपत्र’ लिहिले नव्हते, तर ‘राजकीय कैद्यांची सुटका करण्यात यावी’, असे पत्र लिहिले होते. ते पत्र लंडनला उपलब्ध आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, कारावास भोगला अशा क्रांतीकारकांवर पंचतारांकित हॉटेलमध्ये रहाण्याची सवय झालेले राजकारणी टीका आणि अपकीर्ती करतात. कारागृहात सावरकर प्रतिदिन कोलू ओढून १५ किलो तेल काढत असत. वीर सावरकरांवर टीका करणार्‍या राहुल गांधींमध्ये एवढीच हिंमत असेल, तर त्यांनी त्याच्या अर्धे म्हणजे साडेसात किलो तरी तेल काढून दाखवावे.

मरगळ झटकून शौर्यजागरण करा ! – सौ. उज्ज्वला गावडे, रणरागिणी शाखा

हिंदूंची परंपरा शौर्याची आहे. ‘शौर्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही’, असे महाभारतात सांगितले आहे. समर्थ रामदासस्वामी यांनीही बलोपासना सांगितली; पण इंग्रजांनी ‘इंडियन आर्म्स अ‍ॅक्ट’ लागू करून हिंदूंच्या हातातील शस्त्रे काढून घेतली. अहिंसेचा मारा करून गांधींनी हिंदूंच्या मनातून शस्त्रे काढून घेतली. स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासह हिंदूंनी मरगळ झटकून शौयजागरण करण्यास सिद्ध व्हायला हवे.

हिंदु राष्ट्राची धडकी भरलेल्यांकडूनच सनातन संस्थेच्या विरोधात षड्यंत्र ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, सनातन संस्था

सनातन संस्था हिंदु राष्ट्राचा उद्घोष करते; मात्र भारतातील एक गट हिंदु राष्ट्राचा विरोधक आहे. तो  दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सनातनला गोवू पहात आहे. या चारही जणांची विचारसरणी निरीश्‍वरवादी आणि राष्ट्रविरोधी होती. सनातनने त्यांचे विचार संविधानिक मार्गाने खोडून काढण्याचे काम केले. त्यांचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणला; म्हणूनच सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. धर्मनिरपेक्षतावाल्यांच्या फुत्कारांनी सनातन संपणे अशक्य आहे आणि हिंदु राष्ट्राची स्थापनाही अटळ आहे.

भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करा ! – अधिवक्ता चेतन मणेरीकर, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु विधीज्ञ परिषद

सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. प्रत्येक चार घंट्याला बँकेच्या कर्मचार्‍याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होत आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि निवडणूककाळात अनावश्यक खैरात करण्यासाठी शासनकर्ते विविध वस्तूंवर अधिभार लावतात. सुराज्य आणण्यासाठी भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करण्याची आणि व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे.

उपस्थित संत आणि मान्यवर

प.पू. वासुदेव पुरुषोत्तम गिंडे महाराज, सनातनचे पू. शंकर गुंजेकर, माजी खासदार श्री. अमरसिंह पाटील, बजरंग दलाचे शहराध्यक्ष श्री. आदिनाथ गावडे, हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर

सहकार्य : सभेसाठी महाविद्यालयाचे मैदान विनामूल्य देणारे आदर्श महाविद्यालय विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि माजी खासदार श्री. अमरसिंह पाटील, व्यासपिठाची उभारणी करून प्रोजेक्टर आणि बैठकव्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून देणारे प्रज्वल डेकोरेटर्स, सभेसाठी आसंद्या आणि पटल विनामूल्य उपलब्ध करून देणारे रतन इलेक्ट्रिकल्स यांचे आभार !

‘फेसबूक लाईव्ह’द्वारे सभेचे थेट प्रक्षेपण ७ सहस्र ७४० लोकांपर्यंत पोहोचले, ५ सहस्र ६०० जणांनी ते पाहिले आणि १९१ जणांनी ते इतरांना ‘शेअर’ केले.

क्षणचित्रे

१. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भगवा ध्वज फडकवत आणि जोरदार घोषणाबाजी करत सभास्थळी प्रवेश केला.

२. शहापूर पोलीस ठाण्याचे मंडल पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरे हे मुसलमान असूनही त्यांनी टिळा लावून घेतला. त्यांच्या वरिष्ठांना सभेचा आढावा देतांना त्यांनी समितीविषयी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.

३. सभेनंतर वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी ६३ जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी उगरखोड (ता. बैलहोंगल) येथील धर्मप्रेमींनी गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्याची, तसेच धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

१४ फेब्रुवारीला आढावा बैठक !

स्थळ : विश्‍वकर्मा मंगल कार्यालय, एस्.पी.एम्. रोड, शहापूर, बेळगाव

वेळ : सायंकाळी ६

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now