सनातनची कितीही मुस्कटदाबी केली, तरी २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

कोपरगाव (जिल्हा नगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ९०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती !

व्यासपिठावर डावीकडून कु. रागेश्री देशपांडे, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. प्रशांत जुवेकर

कोपरगाव (जिल्हा नगर) – हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मंदिरांचा निधी अन्य धर्मियांना वाटण्यात येतो. त्यातून सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. हज यात्रेनिमित्त शासन ‘अ‍ॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंच्या दसरा, दिवाळी यांसारख्या सणांच्या वेळी भाडेवाढ करते, हीच का धर्मनिरपेक्षता ? हिंदूंचे सण, उत्सव आल्यावर ध्वनीक्षेपकावर बंदी आणली जाते, तसेच रेल्वे, बस भाड्यांमध्ये वाढ करण्यात येते; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला न जुमानता ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्‍या मशिदींवर कारवाई केली जात नाही. मागील २८ वर्षांपासून विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंचा प्रश्‍न अनुत्तीर्ण आहे. काही जण पुरोगाम्यांच्या हत्यांच्या प्रकरणी सनातनला दोषी ठरवण्यासाठी आकाश-पाताळ एक करत आहेत. सनातनला संपवण्यासाठी तपासयंत्रणा कशा तपास करतात, हे आम्ही मागील १० वर्षांत फार जवळून अनुभवले आहे. ‘आम्ही हिंदु धर्माचा प्रचार आणि हिंदु राष्ट्र-जागृती यांसाठी तेजस्वीपणे कार्य करतो’, हाच आमचा गुन्हा आहे. अर्थात कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही. पुरोगामी, राज्यकर्ते, पोलीस यांनी सनातनची कितीही मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, तरी २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. कोपरगाव येथे १० फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ९०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांनी सभेला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर व्यासपिठावरील आणि सभेला उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमती वैशाली कातकाडे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली.

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

या सभेला कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजय वाढणे, माजी नगराध्यक्ष श्री. दिलीप दारूणकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. सनी वाघ, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. टेकचंदजी खुबानी, भाजपचे श्री. विनायक गायकवाड, श्री. चेतन खुबानी, कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष श्री. जयंत जोशी, योगप्रसारक श्री. दत्ता पुंड, हिंदुत्वनिष्ठ श्री. अक्षय आंगरे, श्री. अमोल गायकवाड, नेत्ररोगतज्ञ श्री. हेमंत राठी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, बजरंग दल, योग सेवा वेदांत समितीचे, तसेच हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

सभेमध्ये राष्ट्रपुरुष, काश्मिरी पंडितांवरील अत्याचार, धर्मशिक्षण, अध्यात्म यांविषयीची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन लावण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार, स्वसंरक्षण प्रशिक्षण यांविषयीची माहिती देणारे कक्ष उभारण्यात आले होते. आयुर्वेद, राष्ट्ररक्षण, अध्यात्म, धर्मशिक्षण, प्रथमोपचार आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन सभास्थळी लावण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो जिज्ञासूंनी घेतला.

हिंदूंनो, तुकड्यांमध्ये विभागलेल्या हिंदुस्थानला अखंड हिंदु राष्ट्र करण्यासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदुस्थानचे आजवर अनेक तुकडे झाले आहेत. शाळेत हा इतिहास शिकवला न गेल्यामुळे भारतियांना आज याचे विस्मरण झाले आहे. आज स्वतंत्र असलेले श्रीलंका, अफगाणिस्तान, थायलंड, इंडोनिशिया यांसारखे अनेक देश एकेकाळी हिंदुस्थानचाच एक भाग होते. त्यामुळे हिंदूंनो तुकड्या तुकड्यांत विभागलेल्या हिंदुस्थानला अखंड हिंदु राष्ट्र करण्यासाठी कटिबद्ध होऊया. एकीकडे हिंदुस्थानचे तुकडे झाले आहेत, तर दुसरीकडे भारतातील अनेक राज्यांत हिंदू अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहेत. इस्लामिक राष्ट्र होण्याआधीच या देशाला आपल्या हक्काचे ‘हिंदु राष्ट्र’ करायचे आहे. या देशात आमिर खान, नासिरुद्दीन शहा, संजय भन्साळी यांनाच काय, तर टिपू सुलतानलाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; पण छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढल्याचे चित्र महाराष्ट्रात लावण्याला मात्र अघोषित बंदी आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये भगवद्गीता वाटण्याला विरोध होतो. न्यायालयाचा निकाल दाखवत मंदिरांवर बुलडोझर फिरवणारे अफझलखानाचे थडगे का पाडत नाहीत ? हीच धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तीस्वातंत्र्य आहे का ?

हिंदु महिलांनो, देव, देश आणि धर्म यांसाठी लढणार्‍या वीरांगनांचा आदर्श घ्या ! – रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

देशातील लाखो हिंदु माता-भगिनी लव्ह जिहादला बळी पडल्या असून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना पाकिस्तानात अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. ही समस्या आता आतंकवादी कारवायांपेक्षाही गंभीर झाली आहे. हिंदु युवतींनी धर्माचरण केले, तर त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाहीत. आपला तेजस्वी इतिहास मुलींना शिकवायला हवा. राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मिनी या देव, देश आणि धर्म यांच्यासाठी लढणार्‍या वीरांगनांचा आदर्श युवतींनी स्वत:पुढे ठेवायला हवा.

क्षणचित्रे

१. कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वाढणे हे सभेच्या आधी येऊन  पूर्णवेळ उपस्थित होते.

२. सभेत धर्माभिमान्यांनी ‘दूध मांगोगे तो खीर देंगे, काश्मीर मांगोगे तो चीर देंगे, हिंदू शक्ती तेरा नाम, जय श्रीराम जय श्रीराम ।’, ‘गर्व से कहो हम हिंदू है ।’ अशा घोषणा दिल्या.

३. सभेची सांगता होत असतांनाही धर्माभिमानी स्वतःहून घोषणा देत होते.

विशेष

सभेच्या ठिकाणी राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांची वेशभूषा करून महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा बालकक्ष सर्वांचे आकर्षण ठरला. सभेला येणार्‍या धर्माभिमान्यांनी बालकक्षातील बालसाधकांचे चित्रीकरण केले, बालसाधकांसमवेत घोषणा दिल्या, तसेच हातात हात घेऊन बालसाधकांचे कौतुक केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now