कुंभमेळ्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने सहस्रो रुग्णांवर विनामूल्य उपचार !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

समाजासाठी नि:स्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या संतांचा आदर्श राजकीय नेते घेतील का ?

रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेले रुग्णालय

प्रयागराज (कुंभनगरी) – कुंभमेळ्यात श्रीक्षेत्र नाणीज (जिल्हा रत्नागिरी) येथील जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने चालू करण्यात आलेल्या विनामूल्य रुग्णसेवा उपक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कुंभमधील साधूग्राममध्ये १ रुग्णालय आणि २ फिरती रुग्णालये येथे कार्यरत आहेत. त्याद्वारे सहस्रो रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. हा उपक्रम अपेक्षेपेक्षा अधिक समाजोपयोगी ठरला आहे. डॉ. अरुण भगत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी आणि सेविका यांची तुकडी साधूग्राममध्ये कार्यरत आहे, अशी माहिती संस्थानचे स्वीय साहाय्यक श्री. सुनील ठाकूर यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

कुंभमेळ्यातील रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिका
डावीकडून डॉ. बालाजी राठोड आणि डॉ. दत्तात्रय कावळे

श्री. सुनील ठाकूर पुढे म्हणाले की,

१. कुंभमेळ्यात साधूग्राममधील सेक्टर १४ मधील मुक्तीमार्ग नागवासुकी चौक येथे ६ एकर भूमीत भव्य अयोध्यानगरी उभारलेली आहे. त्यातील अयोध्याद्वार येथे ‘भगवान रामानंदाचार्य अस्पताल’ या नावाने दवाखाना चालू केला आहे.

२. याशिवाय साधूग्राममध्येच २ फिरते दवाखाने कार्यरत आहेत. ते गर्दीच्या ठिकाणी फिरून उपचार करत आहेत. एकूण २७ आधुनिक वैद्य, १० परिचारिका रुग्णांची तपासणी आणि उपचार करत आहेत. ही सेवा ११ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत कार्यरत असणार आहे.

३. कुंभमेळ्यातील साधूग्राममधील साधूसंत आणि कुंभमध्ये सहभागी झालेले भाविक यांच्यावर या दवाखान्यांत उपचार केले जात आहेत.

४. अयोध्याद्वार येथील दवाखान्यात रुग्णांवर उलटी, जुलाब, थंडी, ताप, अशक्तपणा या आजारांवर उपचार करण्यात आले. संस्थानला अतिशय अल्प मुदतीत मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्यातून स्वामिजींनी किती कल्पकतेने ही सुविधा चालू केली याचा प्रत्यय येतो.

५. महाराष्ट्रातील विविध भागांतील अस्थीरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, नेत्ररोग, नाक-कान-घसा अशा आधुनिक वैद्यांचा समावेश आहे. आधुनिक वैद्य बालाजी राठोड आणि डॉ. दत्तात्रय कावळे हे आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. संस्थानची रुग्णवाहिका सेवादेखील घायाळ, आजारी, अपघातग्रस्त, दुर्घटनाग्रस्त यांच्यासाठी उपयुक्त आहे. त्याद्वारे रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सेवेविषयी कुंभमेळ्यात या साधूग्रामचे कौतुक होत आहे.

६. अयोध्यानगरीत भाविकांना प्रतिदिन महाप्रसाद दिला जातो. याचा लाभ भाविकांना होत आहे. तसेच महाप्रसाद झाल्यानंतर साधूंना अर्पण म्हणून २० रुपये दिले जातात.


Multi Language |Offline reading | PDF