हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात वाण म्हणून जिल्ह्यातील ३ लक्ष ९६ सहस्र महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ देण्याचा हिंदुविरोधी निर्णय !

धर्मज्ञानाच्या अभावी आरोग्यरक्षणाच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे षड्यंत्र !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त घरोघरी हळदी-कुंकू समारंभ चालू आहेत. याचे औचित्य साधून मासिक पाळी व्यवस्थापनाअंतर्गत जनजागृती व्हावी, यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरांवर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २४ जानेवारी २०१९ या दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संपूर्ण जिल्ह्यात वाण म्हणून ३ लक्ष ९६ सहस्र महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वाटप करण्याचा हिंदुविरोधी निर्णय घेतला. याविषयी पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मपरंपरा, सण, उत्सव आणि प्रथा-परंपरा यांमध्ये हस्तक्षेप करणे किती चुकीचे आहे अन् समाजमनावर त्याचे काय दूरगामी परिणाम होत आहेत, याविषयीचे विवेचन पुढे थोडक्यात देत आहे.

१. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहाणार्‍या सुवासिनी !

सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की, डोळ्यांसमोर येतात, ती गावागावांत वसलेली नवसाला पावणारी देवतांची मंदिरे आणि येथील जनतेने प्राणपणाने जोपासलेल्या धार्मिक परंपरा ! श्री गणेशोत्सवासह हिंदूंचे सर्वच सण येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मकरसंक्रांतीच्या सणाची तर मोठीच लगबग असते. त्या निमित्ताने गावातील सुवासिनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पहात असतात. त्याची सिद्धताही गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत पुष्कळ उत्साहाने केली जाते. सर्व महिला हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी एकमेकांच्या घरी जातात. माझे माहेरही येथीलच असल्याने या सर्व गोष्टींची मी प्रत्यक्षदर्शी आहे.

२. सिंधुदुर्गातील धार्मिक परंपरांशी खेळू पहाणार्‍या के. मंजुलक्ष्मी !

सिंधुदुर्गात आतापर्यंत ‘अंधश्रद्धा निर्मूलन समितीची श्री गणेश मूर्तीदान मोहीम गणेशोत्सवात राबवली जात नाही’ कि ‘पुरोगामी महिलांचा मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश’, यांसारख्या बातम्या कधीही ऐकू येत नाहीत. या सर्व गोष्टी अभिमानास्पद असतांना अशा ठिकाणी परराज्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के. मंजुलक्ष्मी यांच्यासारख्या सुशिक्षित अधिकारी येऊन येथील धार्मिक परंपरांशी खेळू पहात आहेत. के. मंजुलक्ष्मी यांच्या नावातच श्री लक्ष्मीदेवीचे नाव असतांना त्या नावाला तरी त्यांच्याकडून किमान जागणे अपेक्षित आहे.

३. वाण म्हणून ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वाटप करणे म्हणजे हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांचा केलेला अवमानच होय !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले जाते. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. या दिवशी सुवासिनी वाण स्वरूपात दान देतात. हिंदु धर्मात सुवासिनीला लक्ष्मीदेवीचे स्थान दिले आहे. ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे ! संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छतेचे वाण म्हणून ३ लक्ष ९६ सहस्र महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वाटप करण्याचा धर्मद्रोही निर्णय घेतला. हिंदु धर्मशास्त्रात मकरसंक्रांतीनिमित्त ‘हळदी-कुंकू’ या धार्मिक उपक्रमाचे इतके मोठे महत्त्व असतांना अशा प्रकारे ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वाण म्हणून देणे अत्यंत अयोग्य आहे. हा हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांचा हेतूतः केलेला अवमानच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चे वाटप करायचे असल्यास त्यांनी करावे, पण ते वाण म्हणून देण्याची गोष्ट आहे का ? ‘रमजान’ किंवा ‘ख्रिसमस’ या सणांच्या वेळी तुम्ही ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटण्याचे धाडस दाखवणार आहात का ?

४. पुरुष सरपंचांनी ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा विषय मांडणे आणि महिलांनी तो ऐकणे म्हणजे किती अवघडल्यासारखे होईल, याची कल्पनाच न केलेली बरी !

ग्रामीण भागात अजूनही केवळ कुटुंबातील महिलावर्गामध्ये चर्चिला जाणारा हा विषय या निमित्ताने अनावश्यक चर्चेत येत आहे. सिंधुदुर्गातील कित्येक ग्रामपंचायतींमध्ये एक ते दोन महिला सदस्य असून उर्वरित पुरुष सदस्य आहेत. काही ग्रामपंचायतींचे सरपंच पुरुष असल्यामुळे त्यांनाही गावातील महिलांसमोर हा विषय मांडणे अवघड होत आहे. यामुळे महिलांना किती अवघडल्यासारखे होईल, याची कल्पनाच न केलेली बरी ! त्यामुळे काही गावांतून ग्रामपंचायतीच्या वतीने कुंकवाच्या डब्या वाण म्हणून दिल्या जात आहेत आणि ‘ज्यांना ऐच्छिक ‘सॅनिटरी नॅपकिन’ हवे असल्यास ते घ्यावे’, असे सांगण्यात येत आहे. काही गावांतील महिलांकडून याला कडाडून विरोधही होत आहे.

५. प्रत्येक गोष्टीचा समाजमनावरील परिणामांचा विचार होणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांचा हा निर्णय किती चुकीचा आहे, यातून सर्वच स्तरांवरच्या अधिकार्‍यांना सामाजिक शिक्षण देण्यासह धर्मशिक्षण देणेही किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. कुठल्याही गोष्टींचा समाजमनावर काय परिणाम होईल, याचा सारासार विचार करणे आवश्यक आहे.

६. हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वाटून आरोग्याची समस्या सुटणार नसल्याने आरोग्यकेंद्रे किंवा अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातूनच ती देणे योग्य !

मासिक धर्म आणि त्या अनुषंगाने महिलांच्या आरोग्याविषयी जागृती करणे आवश्यकच आहे. आज गावागावांत शासकीय आरोग्यकेंद्रे आहेत. अंगणवाड्यांतून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांचाही निरनिराळ्या कारणांनी गावातील सर्वांच्या घरी संपर्क येतो. अशांच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याविषयीची जागृती अधिक प्रभावीपणे योग्य त्या समूहापर्यंत पोहोचवता आली असती. योग्य ती स्वच्छता न राखण्यामागील कारणे, त्यातील अडचणी, उपाययोजना अशी सांगोपांग चर्चा झाली असती. महिलांनाही योग्य मार्गदर्शन मिळून आरोग्याचा प्रश्‍न सोडवण्यात साहाय्य झाले असते. हिंदूंच्या सणांच्या वेळी ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ वाटून आरोग्याची समस्या सुटणार आहे का ? जर खर्‍या अर्थाने महिलांप्रतीच्या कळवळ्याने के. मंजुलक्ष्मी यांना हा विषय हाताळायचा असता, तर त्यांनी तसे मार्गही निवडले असते.

७. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नका !

हिंदु धर्मातील सण, व्रते आदींमागे महान धर्मशास्त्र असतांना त्याविषयी निधर्मी व्यवस्थेतील कुठलाही घटक विचार करत नाही आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांनी स्वतःच्या मनानुसार त्यात हस्तक्षेप करणे, हे कितपत योग्य आहे, याचा सुजाण नागरिकांनी विचार करायला हवा. हिंदु अतिसहिष्णु असल्यानेच कोणीही उठतो आणि हिंदूंच्या धर्मभावना दुखावतो. लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले, तरी धार्मिक स्वातंत्र्यही दिलेले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. यासाठी हिंदूंनी अशी पत निर्माण करावी की, कोणीही हिंदूंच्या सणांकडे वक्रदृष्टीने पहाणार नाही !’

– सौ. तृप्ती स्वप्नील भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF