बिबट्या आणि आपत्कालीन स्थिती

गेल्या काही वर्षांमध्ये बिबट्या या वन्यजीव प्राण्याने मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून पाळीव प्राणी अथवा माणसे यांवर आक्रमण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, तसेच नगर, पालघर यांसह अन्य ठिकाणी बिबट्याचा वावर आढळतो. ऊसाच्या शेतीमध्ये बिबट्याला खाद्य, पाणी आणि लपण्यासाठी ठिकाण सहज उपलब्ध असल्याने अन् त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे मनुष्यप्राण्याने विकासाच्या नावाखाली वनांमध्ये अतिक्रमण केल्याने बिबट्यांचा मोर्चा आता शहरांकडे वळू लागला आहे. मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यानंतर वनविभागाकडून सर्वसाधारणपणे त्याला पकडून पुन्हा वनामध्ये सोडून देण्याचे प्रयत्न होतात; पण बिबट्या दिसल्यानंतर त्याला पकडेपर्यंतच्या कालावधीत जे चित्र असते, ते खरेच अस्ताव्यस्त आणि भोंगळ असते.

असे असते (वि)चित्र !

बिबट्या दिसल्यानंतर ती बातमी वार्‍यासारखी आजूबाजूच्या परिसरात पसरवणे, बिबट्याला पहाण्यासाठी गर्दी करणे, भ्रमणभाषमध्ये बिबट्याची छबी टिपण्यासाठी प्रयत्न करणे, दंडुके घेऊन त्याला पिटाळण्याचा प्रयत्न करणे अथवा दगडे मारणे, ही सगळी बेशिस्त वर्तनाची उदाहरणे झाली; पण आपल्याकडे बेशिस्त वागणे हीच शिस्त झाली आहे. बिबट्या दिसल्यानंतर होणार्‍या अशा सावळ्या गोंधळामुळे हे जनावर अधिकच बिथरल्याचीही अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत; पण चुकांमधून शिकून सुधारणा करेल, ती व्यवस्था कुठली ? बिबट्याला बेशुद्ध करायचे असेल, तर त्यासाठीच्या औषधांचे नियोजन करतांना बिबट्याची स्थिती ओळखणे आवश्यक असते; पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या गोंधळामुळे पशूवैद्यकास औषधाची मात्रा ठरवतांना अडचण येते. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाविषयीही प्रश्‍नचिन्ह असते. अशा नानाविध अडचणींचा सामना करत निभावणारा प्रसंग खरेच ‘रामभरोसे’च निभावतो, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

वास्तविक आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, हे केवळ बचाव पथकाचे अथवा या प्रकरणात वनविभागाचे अथवा सरकारचे काम नसून नागरिकांचा सहभागही त्यामध्ये महत्त्वाचा असतो. बिबट्यांकडून सातत्याने होणारी आक्रमणे पहाता लोकांमधील भीतीचे वातावरण अल्प व्हावे, तसेच बिबट्या दिसल्यावर काय दक्षता घ्यावी, याची माहिती अथवा मार्गदर्शन नागरिकांना मिळणे आवश्यक आहे; पण ते मिळत नाही. व्यवस्थेमधील या त्रुटींमुळे आपत्काळ अधिकच भीषण होत आहे, हे वास्तव आहे. ‘आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे वागावे’, याचे धडे लोकांना मिळण्याची आवश्यकता अनेक घटनांमधून अधोरेखित होऊनही त्या दिशेने कुठलीही कृतीशील पावले पडतांना दिसत नाहीत, हे दुर्दैव आहे.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे


Multi Language |Offline reading | PDF