प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील राष्ट्रीय हिंदु आंदोलनात ‘राष्ट्रीय गोरक्षा आयोग’ स्थापन करण्याची साधू आणि संत यांची मागणी !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

  • ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करण्याची, तसेच मंदिर कह्यात घेणारा कायदा हटवण्याची मागणी

  • आंदोलनात भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याविषयी संतांच्या घोषणा !

आंदोलनात सहभागी झालेले संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ

प्रयागराज (कुंभनगरी), ११ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यामध्ये साधू आणि संत, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना एकत्रित करून गो, गंगा आणि मंदिर यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने येथील काली मार्ग-संगम लोअर मार्गावरील चौकात ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलन’ करण्यात आले. यामध्ये मुख्यतः ‘संपूर्ण देशात गोवंशाच्या रक्षणासाठी राष्ट्रीय गोरक्षा आयोगाची स्थापना करावी’, ‘देवनदी गंगेच्या रक्षणासाठी उत्तरप्रदेश सरकारद्वारे प्रस्तावित ६०० किलोमीटर लांबीची ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करावी’, तसेच ‘हिंदूंची मंदिरे अधिग्रहित करण्यासाठी बनवलेला ‘दि हिंदु रिलिजीयस चॅरिटेबल एन्डोमेन्ट अ‍ॅक्ट १९५१’ रहित करावा’ या प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या. या वेळी संतांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, अशा घोषणा देऊन भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली.

या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात साधू, संत, भाविक, धार्मिक संस्था आणि हिंदु संघटना यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे संत पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट, प्रयागराज येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. शिवविशाल गुप्ता आणि शिवसैनिक आदी सहभागी झाले होते.

उपस्थित संत

जुना आखाड्याचे स्वामी अवधेशगिरि महाराज, नाथ संप्रदायाचे स्वामी रामस्वरूपनाथ महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे स्वामी दिव्येश्‍वर चैतन्य महाराज आणि जम्मू-काश्मीर येथील महंत श्री राजेंद्रगिरी महाराज

संत आणि मान्यवर यांचे मनोगत

घटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

आम्ही हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हे आंदोलन केले आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय कामधेनु आयोग’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे; मात्र हा आयोग गोपालन करणार्‍या व्यक्तीला लाभदायक आहे. यामध्ये संपूर्ण गोवंशाच्या हत्येला बंदी घातलेली नाही. गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून सरकारने घोषित करावे. देशात हिंदू बहुसंख्य असल्याने घटनेत पालट करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यास काहीच अडचण नाही. धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश यांची निर्मिती झाली, त्याप्रमाणे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले पाहिजे. चारही पीठांचे शंकराचार्य आणि १३ आखाडे यांतील संत आणि महंत यांचीही हीच मागणी आहे. देशात शाळांमध्ये बायबल आणि कुराण शिकवले जाते, तर गीताही शिकवली पाहिजे. गीता का शिकवली जात नाही ? केरळ सरकार तेथे शाळेत श्री सरस्वतीदेवीचे पूजन करू देत नाही. हिंदूंविषयी असा भेदभाव का केला जातो ?

मंदिरे निःस्वार्थी भक्त तथा संत यांंच्या समित्यांकडे द्यावीत ! – सुनील घनवट

‘दि हिंदु रिलिजीयस चॅरिटेबल एन्डोमेन्ट अ‍ॅक्ट १९५१’मुळे मंदिरांचे अधिग्रहण करण्याचा अधिकार सर्व राज्य सरकारांना प्राप्त झाला आहे. याचा परिणाम असा झाला की, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक यांसह अनेक राज्यांनी सरकारद्वारे अधिग्रहित झालेल्या सर्व मंदिरांच्या उत्पन्नात भ्रष्टाचार झाला आहे. मंदिरांच्या धार्मिक परंपरांना संपवले जात आहे. प्रत्यक्षात जगात कोणत्याही लोकशाही अथवा धर्मनिरपेक्ष देशातील धार्मिक संस्थांचे सरकारद्वारे नियंत्रण केले जात नाही; मात्र भारतात धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आचरण होत आहे. गंभीर गोष्ट ही आहे की, मंदिरांचे अधिग्रहण करणारे सरकार मशीद अथवा चर्च यांचे अधिग्रहण करत नाही. यासाठी मंदिरे निःस्वार्थी भक्त तथा संत यांच्या समितीकडे दिली पाहिजेत.

पर्यावरणाची हानी करणारी ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजना रहित करा ! – चेतन राजहंस

उत्तरप्रदेश सरकारद्वारे ६०० किलोमीटर लांबीचा ‘गंगा एक्सप्रेस-वे’ बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे; मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या कारणावरून वर्ष २००७ मध्ये तत्कालिन मायावती सरकारच्या १ सहस्र १०० किलोमीटर लांबीच्या ‘गंगा एक्सप्रेस-वे’ योजनेला स्थगिती दिली होती. आता सरकारने या योजनेमुळे गंगानदी, पर्यावरण तथा नागरी जीवनाला कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचण्याची निश्‍चिती देणे आवश्यक आहे, अन्यथा ही संपूर्ण योजना रहित करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

क्षणचित्रे

१. आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता. आंदोलनाला पोलिसांनीही सहकार्य केले.

२. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या सर्व भक्तांचे लक्ष आंदोलनातील संतांचे मार्गदर्शन, वक्त्यांची भाषणे यांनी वेधून घेतले. अनेकांनी आंदोलनातील विषय समजावून घेतले.

३. अनेक भक्त, साधू यांनी ‘आंदोलनात मांडलेले विषय चांगले आहेत’, असे सांगून त्यावर चर्चा करू लागले आणि काही जण त्यात सहभागी झाले.

४. या वेळी गो, गंगा आणि मंदिर यांच्या रक्षणाविषयीची पत्रके वाटण्यात आली.

५. आंदोलनात एक अपंग व्यक्तीही सहभागी झाली होती.

१. अतिरिक्त जिल्हाधिकारी दयानंद प्रसाद यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

आंदोलनातील वरील मागण्यांचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कुंभमेळा जिल्हा प्रशासनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दयानंद प्रसाद यांना देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री शिवविशाल गुप्ता आणि शिवसैनिक, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि प्रयागचे समन्वयक श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते.

फेसबूकवरून ३१ सहस्र ३८९ लोकांनी आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहिले !

राष्ट्रीय हिंदु आंदोलनाचे थेट प्रक्षेपण फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून करण्यात आले होते. ३१ सहस्र ३८९ लोकांनी फेसबूकवरून या आंदोलनाचे थेट प्रक्षेपण पाहिले, तर २३७ जणांनी इतरांना पहाण्यास सुचवले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now