‘नायडू’शाही !

आंध्रप्रदेशला ‘विशेष राज्या’चा दर्जा मिळण्यासाठी तेलगु देसम्चे सर्वेसर्वा आणि राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देहलीत एक दिवसाचे उपोषण केले. या उपोषणाला भरघोस प्रतिसाद मिळवून देण्यासाठी पक्षाचे २६ मंत्री, १२७ आमदार, विधान परिषदेचे ४१ सदस्य आणि २ सहस्रांहून अधिक कार्यकर्ते सहभागी करून घेण्याचे नियोजन होते. आता एवढा सगळा लवाजमा आंध्रप्रदेशहून देहली येथे न्यायचा, तर त्यांच्या निवासाची आणि खाण्या-पिण्याची सोय करणे, हे ओघाने आलेच. या सर्वांची देहलीतील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आल्याचे पुढे येत आहे. त्यांना देहलीत आणण्यासाठी २ विशेष रेल्वेगाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजे देहलीतील एका दिवसाच्या उपोषणासाठी ‘पंचतारांकित’ व्यवस्था ! एका वृत्तसंकेतस्थळाच्या अंदाजानुसार हा खर्च काही कोटी रुपयांच्या घरात आहे. उपोषणाच्या कालावधीत आंध्रप्रदेशला वाली कोण ? या कालावधीत राज्यात काही अनुचित घडले असते, तर ती परिस्थिती कोण निभावून नेणार होते ? महत्त्वाचे म्हणजे मागील ३ मास राज्यातील अंगणवाडी सेविकांना पगार देण्यात आलेला नाही. कारण काय, तर निधीचा अभाव. अंगणवाडी सेविकांना पगार देण्यासाठी निधी नाही; मात्र ‘पंचतारांकित’ उपोषणासाठी नायडू यांच्याकडे निधी आहे. हे गणित तेथील लोकांच्या गळी न उतरल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या एक दिवसाच्या उपोषणाची केंद्रातील भाजप सरकार नोंद घेणार, असेही नाही; पण लोकसभा निवडणूक आल्यामुळे नायडू यांनी उपोषणाचा घाट घातला असून स्वतःचे राज्यातील स्थान बळकट करणे, हाच त्यामागील उद्देश आहे.

खुर्चीसाठी काहीही !

भारतीय राजकारणात गतीशील आणि विकासाभिमुख नेता म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्याकडे पाहिले जाते. ते मूळ काँग्रेसवासी; मात्र नंतर सासरे एन्.टी. रामाराव यांनी स्थापन केलेल्या तेलगु देसम् पक्षात ते सहभागी झाले. अनेक पदे भूषवून ते पक्षातील दोन क्रमांकाचे नेते बनले. राव यांनी दुसरा विवाह केल्यानंतर नायडू यांनी त्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारले आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले. ही घटना वर्ष १९९५ ची. हा काळ नायडू यांच्या कार्यकाळातील ‘सोनेरी काळ’ संबोधला जातो. ‘राज्याच्या विकासासाठी माहिती आणि तंत्रज्ञान यांचा वापर करणारे’, ‘आधुनिक मुख्यमंत्री’ म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांनी त्या काळी अखंड आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या भाग्यनगरचा (हैद्राबादचा) कायापालट केला. या शहराला ‘आयटी हब’ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. या आधी त्यांनी जनहितकारी योजना राबवल्या असतीलही; परंतु सध्याच्या घडीला राज्यात सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भाजपला आंध्रप्रदेशमध्ये हातपाय पसरायचे असल्याने राज्यात त्याची लुडबूड वाढली आहे. तसेच एके काळी नायडू यांचे काँग्रेसी मित्र असलेले वाय. सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्या ‘वायएस्आर् काँग्रेस’ पक्षालाही राज्यात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे नायडू अस्वस्थ आहेत. एकाच वेळी भाजप आणि वायएस्आर् काँग्रेस यांच्याशी निपटण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी ते रस्त्यावर उतरले आहेत. ‘आंध्रप्रदेशला केंद्राकडून सापत्न वागणूक दिली जाते’, ‘विकासकामांना निधी पुरवला जात नाही’, अशा विविध तक्रारी करत नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले. ‘भाजप सरकार आंध्रप्रदेशवासियांवर अन्याय करते’, असे चित्र त्यांना उभे करायचे आहे. देहलीतील उपोषणही हेच सूत्र डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आले. थोडक्यात हा सर्व खेळ खुर्चीसाठी आहे. हे न समजायला जनता दूधखुळी नाही !

वाया गेलेले राजकारणी !

भारतीय राजकारणात सत्तेपायी ज्या राजकारण्यांनी तत्त्वनिष्ठता आणि नैतिकता गहाण ठेवली, त्या सूचीत नायडू यांचे नाव वरच्या क्रमांकाला आहे. वर्ष २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या काळात ते सत्तेपासून दूर राहिले. याचे शल्य त्यांना आजही बोचते. काही मासांनंतर राज्यात होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी नायडू निकराचे प्रयत्न करतांना दिसत आहेत. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी नायडू महाआघाडीत सहभागी झाले. लोकशाहीला कलंक ठरलेले तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता पक्ष यांच्या मांडीला मांडी लावून त्यांनी एक प्रकारे राष्ट्राशी प्रतारणा केली. सत्तेचा मोह राजकारण्याला काय काय करायला लावतो, हे नायडू यांच्या कृतींवरून दिसून येते.

राजकारणात धुतल्या तांदुळासारखा कोणीही नसतो. तेथे शह, काटशह खेळणे हे ओघाने येतेच. असे असले, तरी राजकारण करून जी सत्ता मिळते, त्याचा वापर जनहितासाठीच करायचा असतो. हे मर्मच आजचे राजकारणी विसरले आहेत. त्यामुळे स्वतःची हुशारी, बुद्धीमत्ता आणि अंगभूत क्षमता ते अयोग्य कृती करण्यात वाया घालवतात. कर्तबगारीला नैतिकतेची आणि विवेकाची झालर नसेल, तर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्याकडे पहाता येईल. नायडू यापुढेही असेच अविवेकाने वागत राहिले, तर आंध्रप्रदेशमधील ‘नायडू’शाही अस्ताला जायला वेळ लागणार नाही. नायडू यांना ते उमजत नाही; कारण त्यांना साधनेचे पाठबळ नाही. भारताला केवळ कर्तबगारच नव्हे, तर साधक राजकारण्याची का आवश्यकता आहे, हे नायडू यांच्या उपोषण नाट्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले !


Multi Language |Offline reading | PDF