महत्त्वाच्या घोटाळ्यांसाठी नेमलेल्या संसदीय समित्या यशस्वी झाल्या नाहीत ! – माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले

  • माजी केंद्रीय गृहसचिवांच्या विधानांवरून विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समित्या या केवळ ‘वेळ मारून नेण्यासाठी केलेला देखावा असतो. प्रकरणांची चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी शासनकर्त्यांची इच्छाच नसते, हेच यातून सिद्ध होते !
  • चौकशी समित्यांचा फार्स करणार्‍या राजकारण्यांची लोकशाही आता पुरे !

पुणे – आजवर ज्या प्रकरणांकरिता संसदीय समित्या नेमण्यात आल्या, त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. संसदीय समिती नेमायची, त्यानंतर चौकशी अहवाल सादर करायचा, अशी प्रक्रिया असते; मात्र त्यातून फार काही साध्य होत नाही. देशभरातील बोफोर्स, हर्षद मेहता बँक घोटाळा आणि ‘२ जी स्पेक्ट्रम’ अशा मोठमोठ्या घोटाळ्यांकरिता ज्या मोठ्या समित्या नेमण्यात आल्या त्यांचे पुढे काय झाले ?, असा प्रश्‍न कुणी विचारत नाही. अशा प्रकारे संसदीय समित्यांचे ‘भजे’ झाले आहे, अशी टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी येथे केली. येथे टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘राष्ट्रीय प्रतिष्ठान’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गोडबोले पुढे म्हणाले की,

१. राफेल प्रकरणी चर्चा केली जाते, याचा अर्थ आपण निवडून दिलेल्या सरकारवर आपला विश्‍वास नाही का ?

२. चौकशीकरिता संसदीय समिती नेमण्यात आली; मात्र कालांतराने अन्वेषण रेंगाळत गेल्याने त्या समितीकडून म्हणावा तितका सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. देशातील नागरिकांना या प्रकारच्या समित्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतांना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल.


Multi Language |Offline reading | PDF