(म्हणे) ‘भाजप सरकारने राममंदिरासाठी निवडणुकीपूर्वी अध्यादेश न काढल्याने निराशा नको !’ – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

  • राममंदिर उभारले जात नाही; म्हणून हिंदूंना वाईट वाटत आहेच; मात्र त्याहून अधिक ‘राममंदिराच्या सूत्रावरून भाजपने त्यांना वारंवार मूर्ख बनवल्याने ते संतापले आहेत’, हे डॉ. स्वामी यांनी लक्षात घ्यायला हवे !
  • राममंदिराविषयी नेहमी सडेतोड भूमिका घेऊन भाजप सरकारला सुनावणारे डॉ. स्वामी यांनी अशी पडती भूमिका न घेता हिंदूंच्या भावना भाजप सरकारपर्यंत पोहोचवणे हिंदूंना अपेक्षित आहे !

नवी देहली – लोकसभा निवडणुकीपूर्वी राममंदिराची उभारणी न झाल्याने निराश होऊ नये. राममंदिराच्या उभारणीसाठी भाजप सरकारने अध्यादेश आणला नाही किंवा विधेयक आणले नाही, तरीही निराश होण्याची आवश्यकता नाही. मोहनदास गांधी यांनी वर्ष १९२९ मध्ये ‘मी एका वर्षात स्वातंत्र्य मिळवून दाखवीन’, असे म्हटले होते; मात्र प्रत्यक्षात त्यानंतर स्वातंत्र्य मिळण्यासाठी १७ वर्षे जावी लागली होती. हे कोणी लक्षात ठेवले नाही. (‘भाजप म्हणजे काँग्रेस नाही’, असेच हिंदू समजत होते; मात्र डॉ. स्वामी यांनी गांधी आणि भाजप यांची तुलना केल्यामुळे ‘ते एकाच माळेचे मणी आहेत’, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक) राममंदिरासाठी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन भूमी मागितली होती. निवडणुकीच्या काळात राममंदिरामुळे उपद्रव होऊ नये; म्हणून राममंदिराविषयी आता त्यांनी काही केले नसेल; मात्र निवडणुकीनंतर ते करतील, असे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी देहली विश्‍वविद्यालयात रामजन्मभूमीविषयी आयोजित संमेलनात केले. (बहुमत असतांना राममंदिराच्या उभारणीसाठी काहीही न करणारे पंतप्रधान मोदी ‘निवडणुकीनंतर राममंदिरासाठी काही करतील’, यावर कोण विश्‍वास ठेवणार ?- संपादक)

डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, आम्ही निवडणुकीनंतर रामजन्मभूमीवरच राममंदिराची उभारणी करू. राममंदिराला विलंब झाला, तरी राममंदिर उभारले जाणारच आहे. यात शंका नको. निवडणुकीनंतर रामललाची भूमी लगेच विश्‍व हिंदु परिषदेच्या कह्यात देणे योग्य ठरील. (ही भूमी विहिंपला कशासाठी द्यायला हवी ? ती जागा रामलला आणि आखाडे यांची आहे. त्यांनाच ती मिळायला हवी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF