सर्व हिंदूंना एकत्रित आणण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी केले आहे ! – स्वामी अखंडानंददास महाराज, अखंड महायोग, ऋषिकेश

कुंभमेळा प्रयागराज २०१९

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे प्रयागराज (कुंभनगरी) येथील हिंदू अधिवेशन

सनातनच्या माध्यमातून शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय यांचे संघटन होणे ही हिंदु राष्ट्राची नांदी !

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महंत  रामज्ञानीदासजी महाराज, महामंडलेश्‍वर जनार्दनहरिगिरीजी महाराज आणि दीपप्रज्वलन करतांना महंत भगीरथीजी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), १० फेब्रुवारी (वार्ता.) – आज सर्वांत मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे हिंदूंना वाचवणे, त्यांचे रक्षण करणे. केरळ येथील शबरीमला मंदिर आणि काश्मिरी हिंदू यांचा विषय आपला आहे, असे काहीजणांना वाटत नाही. हिंदू विभागले गेले आहेत. आपण असेच राहिलो, तर लवकरच अल्पसंख्यांक होऊ. कोणताही राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था हिंदूंचे ऐकत नाही. आपली लोकसंख्या घटत चालली आहे, यासाठी ती वाढवली पाहिजे. धर्मांतर केलेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात घेतले पाहिजे. सर्व हिंदूंना एकत्र आणण्याचे काम सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी केले आहे. त्यामुळे आपण नक्की यशस्वी होऊ, असा विश्‍वास स्वामी अखंडानंददास महाराज यांनी येथे व्यक्त केला.

प्रयागराज (कुंभनगरी) येथे ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे आयोजित हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ मोठ्या उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. त्या वेळी स्वामी अखंडानंददास महाराज बोलत होते. या अधिवेशनाला संत, महंत, साधू, हिंदुत्वनिष्ठ, असे एकूण ९० जण उपस्थित होते. अधिवेशनाच्या प्रारंभी वाराणसी येथील दुर्गाकुंडमधील श्री धर्मसंघ शिक्षा मंडळाच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थी बटू आदर्श तिवारी, अभिषेक कुमार पांडे यांनी वेदमंत्रपठण केले.

या अधिवेशनात संत, महंत, साधू, अधिवक्ता, आधुनिक वैद्य यांनी ‘राष्ट्र आणि धर्म’ यांविषयी मांडलेले विचार येथे देत आहोत.

अधिवेशनामध्ये पू. नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ

१. हिंदुत्वाचे समर्थन करणार्‍यांच्या बाजूने  हिंदूंनी उभे रहावे ! – महामंडलेश्‍वर रामेश्‍वरदासजी महाराज, जम्मू-कश्मीर खालसा

जो पक्ष हिंदुत्वाचे समर्थन करील, त्याच्याच बाजूने हिंदूंनी उभे रहावे. हिंदूंनी म्लेंच्छांचे समर्थन करू नये. काश्मीरमधून हिंदूंना परागंदा व्हावे लागले, तेव्हा सरकार आणि राजकीय पक्ष कोठे गेले होते ? मुसलमान कोणत्याही राजकीय पक्षांचे असले, तरी मुसलमान त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि अडचणींच्या वेळी संघटित होतात; मात्र हिंदूंचे तसे होत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. यासाठी हिंदूंना संघटित करणे आवश्यक आहे.

२. राजकीय पक्षांतील नेते समाजाला दिशा देऊ शकत नाही, तर संतच दिशा देऊ शकतात ! – अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता, उच्च न्यायालय, प्रयागराज

सध्या सनातन धर्माच्या विरोधात न्यायालयात पुष्कळ निर्णय होत आहेत. हिंदूंमध्ये संघटितपणा नाही. गंगाजलाच्या प्रकरणी मी केंद्र सरकारला कायदा बनवून दिला आहे; मात्र ६ मास झाले, तरी तो अजून संमत झाला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. उत्तरप्रदेश सरकार राष्ट्रीय महामार्ग सिद्ध करण्यासाठी गंगा नदीभोवतीच्या भूमीचे संपादन करणार आहे; मात्र याला माझा विरोध आहे. यामुळे गंगा नदी धोक्यात येणार आहे. सरकारने विकास करावा; मात्र गंगा नदीला उद्ध्वस्त  करू नये. काही संतांनी स्वतःला राजकीय पक्षाचा शिक्का (लेबल) मारून घेतला आहे. संतांनी कोणत्या पक्षात असू नये, त्यांनी समाजाला दिशा दिली पाहिजे. राजकीय नेते समाजाला दिशा देऊ शकत नाही.

३. फाळणीच्या वेळी सनातन संस्था असती, तर भारताचे विभाजन झाले नसते ! – ह.भ.प. शाम महाराज राठोड, आळंदी, महाराष्ट्र

काश्मिरी हिंदूंची सध्याची स्थिती पहाता देशात लोकशाही कुठे आहे का, असा प्रश्‍न पडतो. लोकशाहीत देशभक्त आणि स्वातंत्र्यसैनिक यांचा अवमान केला जात आहे. सध्याच्या सरकारकडून राममंदिराची उभारणी करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे, ही खेदाची गोष्ट आहे. जगात हिंदूंसाठी एकही राष्ट्र नसणे, हे दुर्दैव आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. हिंदूंना संघटित करण्याचे महत्त्वाचे कार्य हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत आहे. हे कार्य पाहून असे वाटते की, सनातन संस्था फाळणीच्या वेळी असती, तर भारताचे तुकडे (विभाजन) झाले नसते. हिंदू अधिवेशनात मांडलेल्या सर्व प्रस्तावांना मी समर्थन देत आहे.

४. हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात संत आणि हिंदू यांचे नेतृत्व उभारावे लागेल ! – डॉ. ओमेद्र रत्न, निमित्तकम संघटना, जयपूर, राजस्थान

लव्ह जिहाद, धर्मांतर अशा अनेक समस्या हिंदूंसमोर आहेत. हिंदू नेतृत्वहीन झाले आहेत, यासाठी आम्ही सर्व हिंदू येथे संतांना शरण येऊन तुम्ही आमचे नेतृत्व करावे, अशी मागणी करत आहे. पाकिस्तानमध्ये ८० लक्ष हिंदू आपला धर्म टिकवून आहेत. चोहोबाजूंनी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांचे चारित्र्य, अर्थार्जन, धर्म यांच्यावर, तसेच प्रसंगी जिवावरही आक्रमण केले जात आहे. प्रतिदिन ३ अल्पवयीन हिंदु मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर पूर्ण गाव अत्याचार आणि शोषण करते, त्यानंतर त्यांचे धर्मांतर केले जाते. बांगलादेश आणि अन्य देशांतही हीच परिस्थिती आहे. यासाठी संत आणि हिंदू यांचे एक नेतृत्व उभारावे लागेल.

५. हिंदूंच्या भयावह स्थितीची जाणीव सनातन संस्था करून देत आहे ! – योगी ओमनाथ महाराज, योगी महासभा, बिकानेर, राजस्थान

भारतातील मुसलमानबहुल भागात हिंदु परिवार आहे, तिथे त्यांना रहाणे पुष्कळ अवघड झाले आहे. त्यांना जपून रहावे लागत आहे; मात्र हिंदूबहुल भागात मुसलमान सुरक्षित रहात आहेत. हिंदूंच्या या भयावह स्थितीची जाणीव सनातन संस्था जनजागृती करून देत आहे. सर्वांनी आपापल्या भागांत सनातन संस्थेची शिबिरे आयोजित करून हिंदूंना जागृत केले पाहिजे. राजस्थानमध्ये कोठेही सनातनचे शिबिर घ्यायचे असल्यास आम्ही तन, मन आणि धन यांनी नेहमीच सहकार्य करू.

६. लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याचा विषय येतो, तेव्हा सरकारकडून मौन पाळले जाते ! – महंत श्री वैराग्यनंदगिरीजी महाराज, श्री निरंजनी पंचायती आखाडा, गुजरात

हिंदु राष्ट्र झाले पाहिजे, असे भारतातील संतांना वाटत आहे. मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. सरकार आमचे असतांनाही लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याचा विषय येतो, तेव्हा सरकारकडून मौन पाळले जाते. अशा स्थितीत हिंदुत्वासाठी माझी लढण्याची प्रसंगी प्राणार्पण करण्याचीही सिद्धता आहे. ‘गोहत्या होऊ नये’, असे सर्वांना वाटते; मात्र गोहत्या होण्यास दोषी कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. ज्या दिवशी हिंदू गाय पूजनीय मानेल, तेव्हा तो विकणार नाही आणि ती गाय पशूवधगृहात कत्तलीसाठी जाणारही नाही.

७. आज धर्मनियंत्रित शासनाची आवश्यकता आहे ! – सतीश त्रिपाठी,  राष्ट्रीय महामंत्री, स्वाभिमान संघटना, छत्तीसगड

ज्या दिवसापासून राजकीय पक्षांनी शंकराचार्य बनवायला प्रारंभ केला, तेव्हापासून या देशाचे दुर्दैव चालू झाले आहे. राजकीय पक्षांचे संत झाले आहेत; मात्र हिंदूंचे संत कोण आहेत ? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. संतांमध्ये फूट पाडण्यात सरकार यशस्वी झाले आहे. आज धर्मनियंत्रित शासनाची आवश्यकता आहे. सर्व आयोगांवर प्रमुख म्हणून संत असतील, तर परिवर्तन होईल. काँग्रेस इंग्रजांच्या मार्गाने चालले होते आणि आजचे सरकार हे काँग्रेसच्या मार्गाने चालले आहे. देशात मंदिरांविषयी कायदा बनवला आहेे. सर्व प्रमुख मंदिरे आणि मठ सरकारच्या अधीन आहेत. यामुळे ३६ सहस्र मंदिरांचे अधिग्रहण केवळ आंध्रप्रदेश राज्यात झाले. पुरी, ओडिशा, उत्तरप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांत शासनाने सर्व मंदिरांचे अधिग्रहण केले आहे.

८. येणारी पिढी कशी संस्कारित होईल, याचा विचार केला पाहिजे ! – योगी सर्वज्ञनाथजी महाराज,  योगी गोरक्षनाथ संप्रदाय, बिकानेर, राजस्थान

भारताच्या संविधानात अध्यात्म नसल्याने संविधानातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. भौतिकवादामुळे धर्मरक्षणासाठी कोणी पुढे येत नाही. येणारी पिढी कशी संस्कारित होईल, याचा विचार केला पाहिजे.

९. हिंदु संघटित झाल्यावर १० राममंदिरे बनतील ! – श्री सुरजदास महाराज, दिगंबर आखाडा

राममंदिर उभारल्यानंतरच हिंदू सुरक्षित रहातील. हिंदु संघटित झाले, तर एकच काय, १० राममंदिरे बनतील.

१०. गंगा महामार्ग प्रकल्प उभारणे म्हणजे गंगा नदीची हत्या ! – अधिवक्ता पुनीत उपाध्याय, प्रयागराज

गंगा महामार्ग प्रकल्प (एक्सप्रेसवे) म्हणजे एक प्रकारे गंगा नदीची हत्या होय. नदीच्या तटावर हा प्रकल्प सिद्ध करण्यात येणार होता. या विरोधात न्यायालयात लढा देऊन सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

११. संस्कार सोडले, तर आपण हिंदू म्हणून रहाणार नाही ! – श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी विज्ञानानंद सरस्वतीजी महाराज, श्री गीता विज्ञान आश्रम, हरिद्वार, उत्तराखंड

सर्वांचे कल्याण करणारी आपली संस्कृती आहे. गर्भदान संस्कार व्हावे, सर्वांनी गोपालन करावे. गंगेत घाण सोडू नये. संस्कार सोडले, तर आपण हिंदू म्हणून रहाणार नाही. हिंदु संघटित झाले, तर ते वाचतील. सर्वांनी जागृत झाले पाहिजे.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. हिंदु राष्ट्राविषयी अधिवेशन घेतल्याविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे संतांकडून कौतुक 

हिंदू अधिवेशनात बहुतांश सर्वच संतांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी १ दिवसाचे अधिवेशन घेतल्याविषयी या दोन्ही संघटनांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अधिवक्ता अरुणकुमार गुप्ता यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी येथे १ दिवसाच्या कुंभमध्ये अधिवेशनाद्वारे अमृताच्या १ थेंबापासून प्रारंभ केला आहे, असे सांगून कौतुक केले.

२. शैव, वैष्णव असे सर्व संप्रदाय आणि प्रांत येथील संतांचा अधिवेशनाद्वारे त्रिवेणी संगम

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी घेतलेल्या १ दिवसीय अधिवेशनात शैव, वैष्णव आणि इतर संप्रदाय यांसह विविध प्रांतांतील संत-महंत, साधू मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित होते. जणू या अधिवेशनात विविध संतांचा गंगा, यमुना, सरस्वती नद्यांप्रमाणे त्रिवेणी संगम झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. कोणताही भेदभाव न करता आणि केवळ एकच संप्रदाय न मानता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांनी सर्व संप्रदाय आणि प्रांत येथील संतांना एकाच व्यासपिठावर आणल्याविषयी सर्व संतांनी आनंद व्यक्त करून या दोन्ही संस्थांना पुढील कार्याला यश मिळण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी शुभाशीर्वाद दिले.

३. कुंभमेळ्यात पहिले आणि सर्व राजकीय पक्षांच्या विचारधारांचे सर्वसमावेशक अधिवेशन ! 

कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरीत प्रथम हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी १ दिवसीय अधिवेशन यशस्वीपणे घेण्यात आले. हे अधिवेशन म्हणजे सर्व राजकीय पक्षांच्या विचारधारांचे सर्वसमावेशक असे अधिवेशन होते.

४. पाकव्याप्त काश्मीरमधील हिंदूंचे शारदापीठ हिंदूंसाठी खुले करावे, यासाठी संघर्ष करणारे ‘सेवा शारदा पीठा’चे संस्थापक श्री. रवींद्र पंडिता यांनी चालवलेेल्या प्रयत्नांची माहिती दिली. बिकानेर येथील योगी हंसनाथ यांसह इतर संत-महंत यांनी मार्गदर्शन केले.

उपस्थित संत आणि मान्यवर

मध्यप्रदेशातील सतना येथील रामानुज संप्रदायाचे पू. राजारामजी महाराज, स्वामी संतोषाचार्य सागर महाराज, पू. बैजू (केरळ), गुजरात येथील श्री दिगंबर आखाड्याचे पी. रामबलीदासजी महाराज, मध्यप्रदेशातील रामानुजस्वामी, मध्यप्रदेश सतना येथील वैष्णव संप्रदायाचे राजललनत्रिपाठी श्री हंसनाथजी महाराज, राजस्थानातील योगी गोरक्षनाथ संप्रदायाचे श्री ओमनाथजी महाराज, मध्यप्रदेशातील वैष्णव संप्रदाय, दिगंबर आखाड्याचे पू. महंत श्री श्री १०८ सुंदरदासजी महाराज, अखंड महायोग संप्रदायाचे पू. स्वामी सदानंदगिरीजी महाराज, हरियाणा मेवांत येथील शिवमंदिर आणि गोसेवा संप्रदायाचे पू. महंत नरेशगिरी महाराज, जम्मू-काश्मीर येथील सनातन धर्म जुना आखाड्याच्या साध्वी जोत्स्ना कुसुमगिरी, झारखंड येथील सनातन धर्म जुना आखाड्याच्या साध्वी डॉली कुसुमगिरी, श्री श्री १००८ महंत गोपालदासजी महाराज, मध्यप्रदेश श्रीराम मंत्र साधनापीठ उज्जैन खालसाचे श्री महंत स्वामी शिवमूर्तीदास शास्त्री महाराज.

या अधिवेशनासाठी श्रीराम मंत्र साधनापीठाचे मध्यप्रदेशातील उज्जैन खालसाचे श्री श्री १०८ श्री श्री महंत स्वामी शिवमूर्तीदास महाराज यांनी हिंदू अधिवेशनासाठी शुभेच्छा संदेश पाठवून दिला.


Multi Language |Offline reading | PDF