मयन महर्षींनी नाडीवाचनाच्या माध्यमातून रामेश्‍वरम् येथे करण्यास सांगितलेले परिहार (उपाय) आणि हे परिहार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् साधक यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

२९.६.२०१८ या दिवशी सकाळी १० वाजता पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणभाषवरून नाडीवाचनातील सूत्रे आणि परिहार सांगितले. मयन महर्षींनी नाडीवाचनाच्या माध्यमातून रामेश्‍वरम् येथे काही परिहार (अडचणींचे निरसन आणि त्यावरील उपाय) करायला सांगितले होते. रामेश्‍वरम् येथे हे परिहार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सहसाधक यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधकांचे त्रास दूर होण्यासाठी केलेल्या तीळ होमाची मांडणी १. विनायक शानभाग २. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. रामेश्‍वरम् मंदिराच्या समोर असलेल्या समुद्रात (अग्नितीर्थामध्ये) स्नान करणे आणि मंदिरातील २२ तीर्थकुंडांच्या पाण्यानेही स्नान करणे

‘मयन महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले होते, ‘तुम्ही २९.६.२०१८ या दिवशी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत रामेश्‍वरम् मंदिराच्या समोर असलेल्या समुद्रात (अग्नितीर्थामध्ये) स्नान करावे आणि रामेश्‍वरम् मंदिरातील २२ तीर्थकुंडाच्या पाण्यानेही स्नान करावे.’

१ अ. रामेश्‍वरम् मंदिराच्या समोर असलेल्या समुद्रात (अग्नितीर्थामध्ये) स्नान करण्याचे महत्त्व : रावणाच्या संहारानंतर सीतामातेने लंकेतून आल्यावर रामेश्‍वरम् मंदिराच्या समोर असलेल्या समुद्राच्या ठिकाणी परत एकदा अग्नीपरीक्षा दिली. सीतामातेनेे अग्नीपरीक्षा दिलेल्या ठिकाणी समुद्रात अग्निदेव स्वयं प्रकट झाले. सीतामाता त्या अग्नीत जाताच अग्नीही शुद्ध झाला; म्हणून ‘अग्नितीर्थामध्ये शुद्ध मनाने अंघोळ केल्याने पापांचे परिमार्जन होते’, असे म्हटले जाते.

१ आ. रामेश्‍वरम् येथील ६४ वेगवेगळ्या तीर्थकुंडांचा इतिहास : वानर, देवता आणि वेगवेगळ्या नद्या यांनी रामेश्‍वरम् येथे येऊन ६४ वेगवेगळे तीर्थे निर्माण केली आणि त्या पाण्याने रामेश्‍वरम् येथील शिवलिंगाला अभिषेक केला. मंदिराच्या बाहेर ५ – ६ कि.मी. परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ४२ तीर्थकुंडे आहेत. उर्वरित २२ तीर्थकुंडे रामेश्‍वरम् मंदिराच्या आत आहेत. मयन महर्षींनी ‘रामेश्‍वरम् मंदिराच्या आत असलेल्या या २२ तीर्थकुंडांच्या पाण्याने स्नान करावे’, असे सांगितले होते. ती २२ तीर्थकुंडे पुढीलप्रमाणे आहेत – १. महालक्ष्मी तीर्थ, २. सावित्री तीर्थ, ३. गायत्री तीर्थ, ४. सरस्वती तीर्थ, ५. शंख तीर्थ, ६. चक्र तीर्थ, ७. सेतुमाधव तीर्थ, ८. नल तीर्थ, ९. नील तीर्थ, १०. गवाय तीर्थ, ११. गवाक्ष तीर्थ, १२. गंधमादन तीर्थ, १३. ब्रह्महत्या दोषनिवारण तीर्थ, १४. सूर्य तीर्थ, १५. चंद्र तीर्थ, १६. सत्यामृत तीर्थ, १७. शिव तीर्थ, १८. सर्व तीर्थ, १९. गया तीर्थ, २०. यमुना तीर्थ, २१. गंगा तीर्थ आणि २२. कोटी तीर्थ.

१ इ. महर्षींनी सांगितलेल्या वेळेत गर्दी नसल्याने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि साधक यांना तीर्थातील पाण्याने व्यवस्थित स्नान करता येणे : या २२ तीर्थकुंडांच्या ठिकाणी मंदिराचे १ किंवा २ कार्यकर्ते हातात बालदी घेऊन उभे असतात. ते तीर्थातील पाणी काढून भक्तांवर ओततात. महर्षींनी सांगितलेल्या वेळेत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या तीर्थांच्या पाण्याने स्नान केले. या वेळी तेथील गाईड श्री. मुरुगन् यांनी मंदिरातून एका विशेष व्यक्तीची व्यवस्था केली होती. एरव्ही या तीर्थांच्या ठिकाणी पुष्कळ गर्दी असते; पण महर्षींनी सांगितलेल्या वेळेत मुळीच गर्दी नव्हती. यामुळे आम्हाला तीर्थातील पाण्याने व्यवस्थित स्नान करता आले.

२. रामेश्‍वरम् मंदिरात एकादश रुद्राभिषेक करणे

२ अ. रामेश्‍वरम् मंदिरातील शिवलिंगे

२ अ १. वाळूचे शिवलिंग : रामेश्‍वरम् हे १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक आहे. श्रीराम आणि सीता यांनी मिळून स्थापन केलेले रामेश्‍वरम् येथील शिवलिंग वाळूचे आहे. येथे शिवाला ‘रामनाथ’ या नावाने संबोधले जाते आणि देवीचे नाव ‘पर्वतवर्धिनी’ आहे. रामेश्‍वरम्चे पूर्वीचे नाव ‘सेतूपुरी’ किंवा ‘सेतूबंध रामेश्‍वरम्’ असे आहे. त्रेतायुगात लंकेतून परत आल्यावर श्रीराम रामेश्‍वरम्ला आला. श्रीरामाने शिवपूजेसाठी शिवलिंग आणायला हनुमंताला काशीला पाठवलेे. हनुमंताला यायला विलंब झाल्याने आणि पूजेचा मुहूर्त जवळ आल्याने श्रीराम आणि सीता यांनी वाळूचे लिंग बनवून त्याची पूजा केली. हे ‘वाळूचे लिंग’ म्हणजे रामेश्‍वरम् मंदिराच्या गाभार्‍यातील शिवलिंग होय.

२ अ २. ‘काशी विश्‍वनाथ’ या नावाने प्रतिष्ठापित झालेले शिवलिंग आणि मंदिराच्या पूर्व गोपुराकडील हनुमंताच्या मंदिरात असलेले ‘आत्मलिंग’ : मुख्य गाभार्‍याच्या बाजूला एक छोटे मंदिर आहे. हनुमंताने काशीहून श्रीरामासाठी आणि स्वतःसाठी, अशी दोन शिवलिंगे आणली होती. श्रीरामासाठी आणलेल्या एका लिंगाची श्रीरामाने ‘काशी विश्‍वनाथ’ या नावाने प्रतिष्ठापना केली. हनुमंताने स्वतःसाठी आणलेले दुसरे लिंग रामेश्‍वरम् मंदिराच्या पूर्व गोपुराकडे असलेल्या हनुमंताच्या मंदिरात ‘आत्मलिंग’ या नावाने श्रीरामाने प्रतिष्ठापित केले आहे.

२ अ ३. ‘चंद्रमौळीश्‍वर’ स्फटिक लिंग : २ सहस्र ६०० वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी पूजा केलेले ‘चंद्रमौळीश्‍वर’ नावाचे स्फटिक लिंग या मंदिरात आहे. प्रतिदिन पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत मंदिराच्या गाभार्‍यात या स्फटिक लिंगाला अभिषेक करण्यात येतो आणि भक्तांना त्याचे दर्शन घेता येते.

२ आ. रामेश्‍वरम् येथील स्फटिक लिंगाचे जवळून दर्शन घेण्यास मंदिर व्यवस्थापकांनी अनुमती न देणे, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना संस्थेचे कार्य सांगितल्यावर त्यांनी दर्शन घेण्यासाठी गाभार्‍यात बोलावणे आणि देवाचे दर्शन जवळून होणे : ३०.६.२०१८ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत स्फटिक लिंगाचे दर्शन घेऊन त्यानंतर आपण एकादश रुद्राभिषेक पूजेला बसूया.’’ त्यानुसार आम्ही पहाटे ५.१५ वाजता गाभार्‍याजवळ पोचलो. सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘आपण तेथील व्यवस्थापकांना गाईड श्री. मुरुगन्जी यांच्या माध्यमातून स्फटिक लिंगाचे जवळून दर्शन घेण्याविषयी विचारूया.’’ त्याप्रमाणे मुरुगन्जी यांनी विनंती केल्यावर व्यवस्थापक म्हणाले, ‘‘हे शक्य नाही. तुम्ही नेहमीच्या रांगेत या.’’ सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘आपण थोडा वेळ इथेच बसून नामजप करूया.’’ ते व्यवस्थापक सद्गुरु काकूंकडे पहात होते. १५ मिनिटांनी सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘त्यांना आपले कार्य सांगूया.’’ त्यांना कार्य सांगितल्यावर त्यांनी सद्गुरु काकू आणि त्यांच्या समवेत असलेले ४ साधक यांना स्फटिक लिंगाचे जवळून दर्शन घ्यायला बोलावले. आम्हाला ५ मिनिटे देवाचे सुंदर दर्शन झाले.

२ इ. मुख्य पुजार्‍याने परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या नावे स्फटिक लिंगावर अभिषेक करून प्रसाद देणे : त्यानंतर मुख्य पुजार्‍याने परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या नावे स्फटिक लिंगावर अभिषेक केला अन् प्रसाद दिला. सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘आज हे दर्शन केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादानेच झाले’’ आणि त्यांची भावजागृती झाली.

२ ई. काहीही न बोलता चैतन्याच्या बळावर माणसे जोडणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ! : नंतर ते व्यवस्थापक म्हणाले, ‘‘माताजी, येथील आज माझा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मी निवृत्त होणार आहे. त्यानंतर मी माझ्या गावी जाणार आहे. पुढे कधी शक्य झाल्यास मी तुमच्या गोवा येथील आश्रमात येईन.’’ काही न बोलताही सद्गुरु काकूंनी त्या व्यवस्थापकाला गुरुकार्याशी जोडले. हे त्यांच्या चैतन्याचे फलित होते.

२ उ. रामेश्‍वरम् मंदिरात एकादश रुद्राभिषेक करतांना आलेल्या अनुभूती

२ उ १. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुजार्‍यांनी शिवाचे ध्यान करण्यास सांगणे, त्या वेळी सूक्ष्मातून एक ज्योत स्वतःच्या आत गेल्याचे सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांना दिसणे, त्यांनी हे पुजार्‍याला सांगितल्यावर पुजार्‍याने त्यालाही तसेच दिसल्याचे सांगणे आणि त्या वेळी सर्व साधकांची भावजागृती होणे : महर्षींनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगितले होते, ‘३०.६.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र नक्षत्र चालू असतांना रामेश्‍वरम् मंदिरात एकादश रुद्राभिषेक करावा.’

सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत रामेश्‍वरम् मंदिरात एकादश रुद्राभिषेक करायचा होता. पुजार्‍यांनी पूजेची सर्व सिद्धता करून ठेवली होती. ‘काशी विश्‍वनाथ’ लिंगाच्या समोर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना बसवून मुख्य पुजार्‍याने एकादश रुद्राभिषेक संकल्प पूजा आणि पठण केले. पुजार्‍याने सद्गुरु काकूंना सांगितले, ‘‘माताजी, तुम्ही शिवाचे ध्यान करा.’’ सद्गुरु काकूंनी शिवाचे स्मरण केले. त्या वेळी एक शिवस्वरूप ज्योत स्वतःच्या आत गेल्याचे सद्गुरु काकूंना दिसले. हे त्यांनी पुजार्‍याला सांगितले. त्यावर ते मुख्य पुजारी म्हणाले, ‘‘माताजी, मी केरळचा नंबुदिरी आहे. मी तंत्रविद्या शिकलो आहे. तुम्ही प्रार्थना करण्यासाठी हात जोडल्यावर सूक्ष्मातून एक ज्योत तुमच्या आत गेल्याचे मलाही दिसले. खरेच शिवानेच तुमच्यामध्ये प्रवेश केला.’’ ते ऐकून आम्हा सर्वांची भावजागृती झाली.

२ उ २. पुजार्‍याने सर्वांना मुख्य गाभार्‍यात नेणे, रामेश्‍वर देवाला रुद्रपठणाने भारित झालेल्या कलशाच्या पाण्याने अभिषेक करणे आणि ‘प्रत्यक्ष रामेश्‍वर देव (शिव) तिथे आहे अन् श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले त्याच्यावर जलाभिषेक करत आहेत’, असे जाणवणे : त्यानंतर ते पुजारी सद्गुरु काकू आणि आम्हा सर्वांना मुख्य गाभार्‍यात घेऊन गेले अन् रामेश्‍वर देवाला रुद्रपठणाने भारित झालेल्या कलशाच्या पाण्याने अभिषेक केला. त्या वेळी आम्हा सर्वांना जाणवले, ‘प्रत्यक्ष रामेश्‍वर देव (शिव) तिथे आहे आणि श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले त्याच्यावर जलाभिषेक करत आहेत.’ ‘हे सर्व आम्हाला पहायला मिळणे’, ही प.पू. गुरुदेवांची कृपाच होती. जणूकाही त्यांना आम्हाला सांगायचे होते, ‘त्रेतायुगात रामेश्‍वर लिंगाची स्थापना करणारा आणि त्याची पूजा करणारा तो श्रीराम ‘मीच’ आहे.’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि त्यांचे गुरु स्वामी चंद्रशेखरानंद यांचे नाव घेऊन ‘तीळ होम’ करणे

३ अ. ‘गुरुपरंपरेतील तीन परम गुरूंच्या नावे ‘तीळ होम’ केल्याने सर्व साधकांच्या पूर्वजांना गती मिळून त्यांना होणारे पूर्वजांचे त्रास दूर होतील’, असे महर्षींनी सांगणे : महर्षींनी सांगितले होते, ‘३०.६.२०१८ या दिवशी उत्तराषाढा नक्षत्र असतांना सकाळी ८.३० ते दुपारी १२ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु श्री अनंतानंद साईश आणि त्यांचे गुरु स्वामी चंद्रशेखरानंद यांचे नाव घेऊन ‘तीळ होम’ करावा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ होमाला बसतील. ५, ७ किंवा ९ वेदब्राह्मणांकडून हा होम करवून घ्यावा. हा होम महान गुरुपरंपरेतील तीन परम गुरूंच्या नावे केल्याने सर्व साधकांच्या पूर्वजांना गती मिळेल आणि साधकांना होणारे पूर्वजांचे त्रास दूर होतील. साधकांना त्यांच्या प्रारब्धानुसार अनेक शारीरिक व्याधी आहेत. साधकांसाठी हा संकटकाळ असल्याने त्यांना अनेक शस्त्रकर्मांना सामोरे जावे लागणार आहे, तसेच अपमृत्यूचे संकट येण्याचीही भीती आहे. ‘आपत्काळात साधकांना अल्प प्रमाणात त्रास व्हावा’, यासाठीही हा ‘तीळ होम’ करावा.’

९ ब्राह्मणांच्या साहाय्याने केलेला तीळ होम

३ आ. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होमाचा संकल्प करणे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी यज्ञकर्म करणे : रामेश्‍वरम् येथे आमच्या समवेत असणारे गाईड श्री. मुरुगन्जी यांच्या साहाय्याने आमची ज्योतिष शास्त्री रविचंद्रन् शर्मा यांची ओळख झाली. त्यांनी रामेश्‍वरम् मंदिराच्या जवळ असलेल्या कोटीलिंग स्वामींच्या मठात ९ ब्राह्मणांच्या साहाय्याने ‘तीळ होम’ आयोजित केला. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे हा ‘तीळ होम’ करण्यात आला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी होमाचा संकल्प केला. यज्ञकर्म करण्यासाठी सनातनचे साधक श्री. विनायक शानभाग यांनी सद्गुुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांची आज्ञा अन् आशीर्वाद घेतले आणि ‘तीळ होम’ करण्यात आला.

गोमातेला केळी अर्पण करतांना श्री. विनायक शानभाग

३ इ. ‘तीळ होमा’च्या फलप्रसादातील केळी गोमातेला दिल्यावर तिने गोमूत्र देणे, तेथील पुरोहिताने ‘तो शुभशकुन असल्याचे सांगणे’, ‘आता दुसरी गोमाता शेण देईल’, असा विचार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मनात येणे आणि लगेच दुसर्‍या गोमातेने शेण देणे : ‘तीळ होम’ झाल्यावर रामेश्‍वरम् येथील समुद्रात पिंडदान करण्यात आले. यानंतर तीळ होमाच्या कलशातील पाण्याने प्रोक्षण करण्यात आले. त्यानंतर पुरोहित श्री. कृष्णकुमार यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना फलप्रसाद दिला आणि त्यांतील काही केळी गोमातेला अर्पण करायला सांगितले. कोटीलिंग स्वामींच्या मठात २ गोमाता होत्या आणि सद्गुरु गाडगीळकाकूंनी त्यांना केळी खायला दिली. केळी खाल्यावर एका गोमातेने लगेच गोमूत्र दिले. तेव्हा पुरोहित श्री. कृष्णकुमार म्हणाले, ‘‘माताजी, हा तुमच्यासाठी शुभशकुन आहे.’’ तेव्हा सद्गुरु काकूंच्या मनात विचार आला, ‘आता दुसरी गोमाता शेण देईल.’ तितक्यात दुसर्‍या गोमातेने शेण दिले.

तीळ होमानंतर पिंडदान करतांना श्री. विनायक शानभाग

३ ई. साधकांचाच नव्हे, तर त्यांच्या पूर्वजांचाही योगक्षेम वहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे भगवंतच आहेत ! : श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, ‘मी माझ्या भक्तांचा योगक्षेम वहातो.’ सनातनच्या सर्व साधकांचा योगक्षेम वहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना या माध्यमातून दाखवून दिले, ‘ते साधकांचाच नव्हे, तर त्यांच्या पूर्वजांचा म्हणजे गेल्या अनेक पिढ्यांचाही योगक्षेम वहात आहेत.’ ‘असे परात्पर गुरु डॉ. आठवले भगवंतच आहेत’, यात कुणालाही शंका नसावी.

४. वेदब्राह्मणांनी विष्णुसहस्रनामाचे पठण करणे

४ अ. १२ वेदब्राह्मणांनी विष्णुसहस्रनामाचे शास्त्रोक्त पठण करणे : मागच्या नाडीवाचनात (नाडीवाचन क्रमांक ७ मध्ये) महर्षींनी सांगितले होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी संपूर्ण विष्णुसहस्रनाम म्हटले नाही. ते कर्म पूर्ण करण्यासाठी वेदब्राह्मणांकडून रामेश्‍वरम् येथे विष्णुसहस्रनामाचे पठण करावे.’ ‘तीळ होम’ केलेल्या वेदब्राह्मणांना विष्णुसहस्रनाम पठणाविषयी विचारल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. एकूण १२ वेदब्राह्मणांनी विष्णुसहस्रनामाचे शास्त्रोक्त पठण केले.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले विष्णुसहस्रनामाचे पठण ऐकत असल्याचे जाणवणे : विष्णुसहस्रनाम ऐकतांना सर्व साधकांची भावजागृती होत होती आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले क्षीरसागरावर झोपलेले असून ते हे ऐकत आहेत’, असे आम्हाला जाणवले.

भक्तांना आनंद देण्यासाठी वेगवेगळी रूपे आणि नावे घेऊन अवतार धारण करणार्‍या श्रीमन्नारायणाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता ! ‘हे श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवा, विष्णुसहस्रनामातील एकेक नाव आमच्या मनात कोरले जाऊ दे आणि सदा सर्वदा तुझ्या नामाचे स्मरण आम्हा साधकांना होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, रामेश्‍वरम् (११.७.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF