धर्मसंसद आणि परमधर्मसंसद !

श्री. आनंद जाखोटिया

श्री. आनंद जाखोटिया, कुंभमेळा विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

यंदा कुंभमेळ्यात ज्योतिष एवं द्वारका पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ‘परमधर्मसंसद’ आणि ‘विश्‍व हिंदु परिषदे’च्या वतीने आयोजित ‘धर्मसंसद’ प्रत्यक्ष अनुभवता आली. सध्याच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या संसदेत ‘सनातन धर्म’, ‘सनातन धर्मीय’ आणि ‘सनातन धर्माचे मानबिंदू’ यांना दुर्लक्षिले जात आहे. त्यामुळे या धर्मसंसदांविषयी आस्था असणार्‍या हिंदु समाजाच्या मनात उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. त्यासाठीच दोन्ही धर्मसंसदांच्या आयोजनाचा ऊहापोह या लेखामध्ये केला आहे.

विश्‍व हिंदु परिषदेकडून आयोजित धर्मसंसद !

‘विश्‍व हिंदु परिषदेकडून आयोजित धर्मसंसदेचे नाव वगळता बाह्यरचना किंवा कामकाज काहीही संसदेसारखे नव्हते. अनेक मान्यवर या सभेला येणार म्हणून किंवा संघाचे सरकार असल्याने स्वतः जिल्हाधिकार्‍यांनी उभे राहून आवश्यक व्यवस्था करवून घेतल्या. अनेक प्रतिष्ठाप्राप्त संत या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर होते. संतांची उपस्थिती तेवढाच ‘धर्म’ या शब्दाशी हा कार्यक्रम जोडता येईल. कामकाजाचे स्वरूप एखाद्या जाहीर सभेसारखे होते. सभेतही निर्धारित प्रस्तावांवर निवडक संतांनी आपापली; पण प्रस्तावानुकूल भूमिका ठेवण्यापलीकडे वेगळे काही झाले नाही. १००-२०० संतांचा मंच आणि समोर ऐकण्यासाठी १-२ सहस्र संत अन् संघ, विहिंप, भाजपचे कार्यकर्ते आणि आगंतुक, अशी ४ सहस्रांची उपस्थिती ! तसा कार्यक्रम कोणासाठीही खुला आणि भव्य होता. अगदी वेळेत कार्यक्रम चालू झाला; पण पहिल्या दिवशी निर्धारित वेळेपेक्षा अर्धातास आधीच आटोपला गेला. जणू चर्चा करण्यायोग्य हिंदूंच्या समस्याच नाहीत. ‘मॅरेथॉन’ (शीघ्र गतीने) भाषणे चालू होती. दुसरीकडे कार्यक्रम वेळेत आटोपण्यासाठी प्रत्येक संतांचे भाषण वेळेत संपण्यासाठी सूत्रसंचालकांची धावपळ चालू होती.

खरेतर हिंदु आपल्या देशातच आपल्या धार्मिक अधिकारांसाठी पोरका झाल्याने या धर्मसंसदेकडे आशेने पहात होता; पण देशातील धार्मिक आणि आध्यात्मिक जनतेवर प्रभुत्व ठेवणार्‍या अन् लक्षावधी अनुयायी असणारे संत एका मंचावर येत असतांना तेथे केवळ १-२ ज्वलंत विषयांवरच भाषणे झाली. त्यातही ज्या केरळमध्ये भाजपचे सरकार नाही, त्या राज्यात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी ‘शबरीमाला परंपरा रक्षणा’वर प्रस्ताव ठेवण्यात आला आणि दुसर्‍या दिवशी राममंदिरावर चर्चा करण्यात आली. दुर्दैवाने ही चर्चा सरकारवर अंकुश ठेवणारी नव्हती. राममंदिर उभारणीच्या आंदोलनाला आणखी निराशेत आणि नकारात्मकतेत लोटणारी ही चर्चा होती. खरेतर सध्या संघाचे सरकार असतांनाही ही चर्चा एकप्रकारची हतबलता दाखवणारी ठरली. धर्मसंसदेच्या व्यासपिठावर कोणत्या प्रतिज्ञेमुळे किंवा कोणत्या आशेमुळे ही हतबलता होती, हा शोधाचा विषय आहे.

परमधर्मसंसद !

कुंभमेळ्यामध्येच धर्मसंसदेच्या आधी परमधर्मसंसद झाली. आदि शंकराचार्य स्थापित चार पीठांपैकी दोन पीठांचे शंकराचार्य असलेले स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही दुसरी धर्मसंसद झाली. या परमधर्मसंसदेची रचना आणि संकल्पना सर्वच आखीव-रेखीव करण्याचा प्रयत्न होता. धर्मध्वज, बोधचिन्ह, त्याला उपस्थित असणार्‍यांची निवडप्रक्रिया, कामकाज यांसारख्या अनेक सूत्रांच्या माध्यमातून ‘सेक्युलर’ लोकशाहीच्या संसदेतील हरवलेला ‘धर्म’ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सिद्ध केलेला मंडप आणि बैठक व्यवस्थाही संसदेसारखीच होती; पण राजकारण्यांसारखा सुखासीनतेवर खर्च नव्हता. भारताच्या विविध राज्यांतील आणि काही देशांतील प्रतिनिधींना ‘धर्मसांसद’ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आयोजकांचे एकूण १००८ ‘धर्मसांसदां’ची निवड करण्याचे ध्येय असून ज्यांची निवड करण्यात आली आहे, त्यांना या परमधर्मसंसदेसाठी निमंत्रित करण्यात आले. प्रत्येकाच्या नावानिशी नोंदी ठेवून परिचय पत्र पाहूनच सर्वांना आत सोडले जात होते. विशेष म्हणजे यातील १५ ते २० जण हिंदु समस्यांवर काम आणि जागरण करणारे होते. हिंदूंच्या प्रमुख समस्यांविषयी गंभीरतेने यथासांग चर्चा करून त्यावर प्रस्ताव पारित करण्यात आले. वेळेचे यथायोग्य पालन करण्यात आले. अवांतर किंवा वेळेपेक्षा अधिक बोलणार्‍यांना वेळेत थांबवण्यात आले. दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांच्या साक्षीने प्रत्येक संसदेचा प्रारंभ करण्यात आला. सभापतीप्रमाणे या धर्मसंसदेत ‘प्रवरधर्माधीश’ या पदावर स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी होते. ‘प्रवरधर्माधीश’ यांच्या समन्वयकापासून भोजनादी व्यवस्था वेदपाठशाळेतील बटूंनी ‘श्री गुरुसेवा’ म्हणून अत्यंत समर्थपणे पार पाडली. नियोजनानुसार प्रत्येकाच्या गळ्यातील बॅच पाहिल्याशिवाय त्यांना भोजनकक्षात सोडण्यात आले नाही. प्रत्येक दिवशी स्वतः शंकराचार्य शेवटी मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. एकंदर सनातनकर्मियांना वर्तमानकाळात दिशादर्शन करण्याचा हा चांगला प्रयत्न होता. या आदर्श संसदेत मीडियावाल्यांना सहन करणे सर्वांनाच थोडे अडचणीचे गेले. ‘हम से बढकर कौन ?’, या आविर्भावात वागणार्‍या मीडियावाल्यांचे चालू परमधर्मसंसदेतील वार्तांकन सर्वांनाच खटकले. एका ‘धर्मसांसदा’ने तर सर्वांसमोर त्यांना खडसावून त्यांचे वक्तव्य होईपर्यंत न बोलण्याची कडक सूचना दिली. येत्या काळात कदाचित् त्याविषयी धर्मसंसद योग्य नियमही ठरवेल.

असो ! एक काळ होता की, राजा संसद म्हणजेच त्या काळच्या अष्टप्रधान मंडळाला घेऊन लोकहित आणि धर्महिताचे निर्णय घ्यायचा अन् त्यावर धर्मगुरूंचे मार्गदर्शन घ्यायचा ! आज आधुनिक विकासमंत्र लाभलेल्या राजाला धर्मगुरूंची आवश्यकता नाही. धर्मगुरु मात्र ‘धर्महिताचे राज्य चालवेल’, अशा राजाच्या शोधात आहेत. दोन्ही धर्मसंसदांचा विचार केला, तर स्वतःचे सरकार असतांना त्यांना धर्मादेश न काढता विश्‍व हिंदु परिषदेने प्रस्ताव पारित केले. दुसरीकडे परमधर्मसंसदेने धर्मादेश अवश्य काढले; पण त्यावर सरकार कार्यवाही करेल, असे चित्र नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापण्याला पर्याय नाही.’

(श्री. आनंद जाखोटिया हे हिंदु जनजागृती समितीचे राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचे समन्वयकही आहेत.)


Multi Language |Offline reading | PDF