भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात झालेल्या ‘सौरयागा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण !

उद्या १२ फेब्रुवारी २०१९ (माघ शुक्ल पक्ष सप्तमी) या दिवशी असलेल्या रथसप्तमीच्या निमित्ताने…

‘भृगु नाडीपट्टीवाचक श्री. सेल्वम गुरुजी यांच्या माध्यमातून महर्षी भृगु यांनी सांगितल्याप्रमाणे २१.१०.२०१८ या दिवशी, म्हणजे रविवारी, आश्‍विन शुक्ल पक्ष द्वादशी या तिथीला सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सौरयाग’ करण्यात आला. या यागाचे माझ्याकडून देवाने करून घेतलेले सूक्ष्म-परीक्षण येथे दिले आहे.

डावीकडून पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. दामोदर वझे (मंत्रपठण करतांना), सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, पुरोहित श्री. अमर जोशी (पूर्णाहुती देतांना), श्री. ईशान जोशी आणि श्री. चैतन्य दीक्षित

१. सौरयागापूर्वी केलेल्या विविध धार्मिक विधींचे सूक्ष्म परीक्षण

१ अ. सूर्यदेवाला लाल रंगाची फुले आणि कुंकुममिश्रित लाल रंगाच्या अक्षता वाहणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सूर्यदेवाला लाल रंगाची फुले आणि कुंकुममिश्रित लाल रंगाच्या अक्षता वाहिल्या. सूर्यदेवाचे तत्त्व लाल रंगाचे असल्याने ते लाल रंगाची फुले आणि कुंकुममिश्रित लाल रंगाच्या अक्षता यांकडे आकृष्ट झाले आणि पूजेतील मूर्ती सूर्यतत्त्वाने भारित झाली.

१ आ. साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी भावपूर्णरित्या देवतांचे श्‍लोक म्हणणे : साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी भावपूर्णरित्या देवतांचे श्‍लोक म्हटले. त्यामुळे देवतांच्या कृपालहरी पूजनाच्या ठिकाणी आकृष्ट होऊन साधकांना देवतांचे कृपाशीर्वाद मिळाले.

१ इ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाचा संकल्प करणे : पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाचा संकल्प केल्यावर श्री सूर्यनारायण आणि अन्य देवता यांच्या कृपेचा ओघ यज्ञस्थळी कार्यरत झाला.

१ ई. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी महागणपतीचे पूजन करणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी महागणपतीचे पूजन केल्यावर श्री गणेशाने अष्टदिक्पालांना अष्टदिशा मोकळ्या करण्यास सांगितल्या. त्यामुळे नवग्रहदेवतांना यज्ञस्थळी येण्याचा मार्ग मोकळा झाला.

१ उ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आचार्यवरण करणे (पुरोहितांना निवडणे) : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधक पुरोहित श्री. दामोदर वझे आणि पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांना सौरयाग करण्यासाठी मुख्य पुरोहित म्हणून नेमले. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून चैतन्याचे दोन पिवळे गोळे दोन्ही पुरोहितांकडे गेले आणि त्यांना यज्ञीय कर्म करण्यासाठी आवश्यक असणारी दैवी ऊर्जा प्राप्त झाली.

१ ऊ. श्रीसवितृ सूर्यनारायणाचे आवाहन आणि पूजन करणे : पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी सूर्यदेवाच्या मूर्तीमध्ये श्रीसवितृ सूर्यनारायणाचे आवाहन केले. तेव्हा मूर्तीकडे आकाशातून लाल रंगाचा प्रकाशझोत येतांना दिसला आणि मूर्ती सूर्यदेवाच्या तत्त्वलहरींनी भारित झाली. श्रीसवितृ सूर्यनारायणाचे षोडशोपचार पूजन केल्यावर मूर्तीमध्ये आलेले देवतेचे तत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. तेव्हा मूर्तीच्या हृदयाच्या ठिकाणी लाल रंगाचे उभे चक्र गोलाकार फिरतांना दिसले. या चक्रातून सर्वत्र लाल रंगाच्या प्रकाशलहरी प्रक्षेपित झाल्या आणि साधकांना दैवी ऊर्जा प्राप्त झाली. तेव्हा पूजन केलेल्या सूर्यनारायणाच्या मूर्तीकडे पहातांना चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

१ ए. नवग्रहदेवतांचे आवाहन आणि पूजन करणे : पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी सूर्याच्या मूर्तीच्या भोवती मांडलेल्या नऊ सुपार्‍यांवर नवग्रह देवतांचे आवाहन केले. तेव्हा सुपार्‍यांकडे आकाशातून विविध रंगांचे प्रकाशझोत येतांना दिसले आणि सुपार्‍या नवग्रहदेवतांच्या तत्त्वलहरींनी भारित झाल्या. सुपार्‍यांवर गंध, अक्षता आणि फुले वाहून नवग्रहदेवतांचे पूजन केल्यावर सुपार्‍यांमध्ये नवग्रहदेवतांची तत्त्वे वेगाने कार्यरत झाली.

१ ऐ. साधकांनी सूर्याच्या १२ नावांचे उच्चारण करून मानसरित्या १२ सूर्यनमस्कार घालणे : पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञाला उपस्थित असणार्‍या साधकांनी सूर्याच्या १२ रूपांची नावे उच्चारून त्यांचा जप केल्यामुळे साधकांकडून १२ सूर्यनमस्कार मानसरित्या घातले गेले. अशाप्रकारे साधकांकडून सूर्यनमस्कार घातल्याने त्यांच्याकडून एक प्रकारे सूर्योपासनाच झाली. त्यामुळे सूर्याच्या १२ रूपांनी साधकांना ‘तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल’, असा आशीर्वाद दिला. साधकांनी सूर्यनमस्कार घालतांना सूर्याच्या पुढील १२ नावांचे स्मरण केले.

१ ओ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रज्वलित केलेल्या अग्नीला हळदी-कुंकू वाहणे : सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका ताटलीत शेण्या ठेवून अग्नी प्रज्वलित केला आणि त्याला हळदी-कुंकू वाहिले. तेव्हा प्रज्वलित केलेल्या अग्नीज्वाळेत अग्निनारायणाचे सूक्ष्म रूप कार्यरत झाले. अग्नीला भावपूर्ण अर्पण केलेले हळदी-कुंकू त्याने स्वीकारल्यामुळे यज्ञस्थळी अग्नीचे शुद्ध आणि सात्त्विक रूप प्रकट झाले.

१ औ. पुरोहिताने अग्नीचे ध्यान करणे : जेव्हा साधक पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी अग्नीचे ध्यान केले, तेव्हा अग्निदेवाचे दर्शन झाले.

२. ‘सौरयागा’चे सूक्ष्म-परीक्षण

२ अ. श्री. दामोदर वझे यांनी अग्निदेवाला प्रार्थना करणे : पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी अग्निदेवाला ‘यज्ञामध्ये दिली जाणारी आहुती सूर्यदेवापर्यंत पोचू दे’, अशी  प्रार्थना केली. तेव्हा यज्ञज्वालेत कार्यरत असणार्‍या अग्निनारायणाचे रूपांतर सूर्यनारायणामध्ये झाले आणि त्याने आहुती ग्रहण करण्यास आरंभ केला.

२ आ. यज्ञज्वालेतून एक तेजस्वी सूर्ययंत्र बाहेर पडणे : यज्ञज्वालेतून एक तेजस्वी सूर्ययंत्र बाहेर पडले. त्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ३ प्रदक्षिणा घातल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांना सूक्ष्मातून स्पर्श करून ते रामनाथी आश्रमाच्या वरती आकाशात गोलगोल फिरू लागले. रामनाथी आश्रमाच्या रक्षणासाठी हे सूर्ययंत्र आश्रमाच्या परिसरात कार्यरत असल्याचे जाणवले. त्यातून चैतन्याचे पिवळे, भावाचे निळे, प्रीतीचे गुलाबी आणि निर्गुण चैतन्याचे पांढरे या रंगांची सूर्ययंत्रे आश्रमाभोवती फिरू लागली. काही क्षणातच सूर्ययंत्राची असंख्य लघुरूपे विविध ठिकाणी गेली आणि विविध ठिकाणचे आश्रम, भाव असणार्‍या साधकांची घरे आणि हिंदुत्वनिष्ठांचे निवासस्थान यांच्या भोवती सूर्ययंत्रे कार्यरत झाली.

२ इ. विविध संत यांच्या भोवती लालसर रंगाचे तेजस्वी सूर्यकवच निर्माण होणे : सद्गुरु, संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या भोवती लालसर रंगाचे तेजस्वी सूर्यकवच निर्माण झाले. त्यामुळे ‘त्यांच्यावर तेजतत्त्वाच्या स्तरावर आक्रमणे करणार्‍या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण होणार आहे’, असे जाणवले.

३. पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी प्रायश्‍चित्त होम करून श्रीविष्णूची कृपा प्राप्त करणे आणि त्यामुळे यज्ञात झालेल्या चुकांचे पापक्षालन होणे : पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी प्रायश्‍चित्त होम केला. तेव्हा चुकीचे मंत्रोच्चारण करणे, आहुती न्यून-अधिक पडणे आणि यज्ञज्वालेत कीटक पडणे यांमुळे लागलेल्या दोषांचे आणि पापांचे प्रायश्‍चित्त घेतले गेले. तेव्हा यज्ञज्वालेमध्ये असणार्‍या सूर्यनारायणाचे रूप लोप पावून त्यातून श्रीमन्नारायणाचे रूप प्रकट झाले. पुरोहिताने ३ वेळा उच्चारलेल्या श्रीविष्णूच्या नावांमुळे श्रीमत् नारायणाचे कृपाशीर्वाद लाभले आणि पुरोहितांकडून झालेल्या समस्त चुका, त्रुटी आणि अपराध यांमुळे लागलेले समस्त पाप नष्ट होऊन पुरोहित दोषमुक्त झाले. प्रायश्‍चित्त होम करण्यापूर्वी पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांच्या भोवती दिसणारे करड्या रंगाचे आवरण प्रायश्‍चित्त होम केल्यावर विरळ होऊन नष्ट झाले.

४. पूर्णाहुतीच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे ४ अ. एका संतांनी स्पर्श केलेल्या भद्रफलांची यज्ञामध्ये पूर्णाहुती सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी दिल्यावर ती सवितृदेवता, सूर्यदेव आणि गायत्रीदेवी यांनी स्वीकारणे : पूर्णाहुतीच्या वेळी एका संतांनी रेशमीवस्त्रात बांधलेली भद्रद्रव्ये (श्रीफळ, अक्षता, फुले इत्यादी) आणि पुष्पहार यांना स्पर्श केला अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या भद्रद्रव्यांची आहुती दली. तेव्हा सवितृदेवता, सूर्यदेव आणि गायत्रीदेवी यांनी यज्ञामध्ये दिलेली पूर्णाहुती स्वीकारली.

४ आ. अग्निनारायणाचे अग्नेयास्त्र आणि सूर्याचे सूर्यास्त्र पाताळाच्या दिशेने जाऊन तेथील अनेक सूक्ष्मातील वाईट शक्तींचा विनाश होणे : पूर्णाहुतीच्या वेळी अग्निनारायण आणि सूर्यनारायण यांची शक्ती काही काळ एकत्रितपणे कार्यरत झाली. त्यानंतर अग्निनारायणाचे अग्नेयास्त्र आणि सूर्यनारायणाचे सूर्यास्त्र पाताळाच्या दिशेने जाऊन तेथील अनेक सूक्ष्मातील वाईट शक्तींवर मारक शक्तीचा मारा होऊन त्यांचा विनाश झाला.

४ इ. सूर्यनारायणाने साधकांना आशीर्वाद देणे : सूर्यदेवाच्या कृपेने हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी साधकांना बळ प्राप्त झाले. हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी आवश्यक असणारे बळ आणि समष्टी साधना करण्यासाठी चांगले आरोग्य यांच्या प्राप्तीचा आशीर्वाद सूर्यनारायणाने साधकांना दिला.

५. अष्टदिक्पालांसाठी उडिद मिश्रित भाताचा बली देण्याच्या कृतीचे सूक्ष्म परीक्षण

सौरयागानंतर अष्टदिक्पालांसाठी उडिद मिश्रित भाताचा बली देण्यात आला. हा विधी चालू असतांना पुरोहित श्री. दामोदर वझे मंत्र म्हणत होते. तेव्हा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी कणकेचा दिवा प्रज्वलित करून भाताच्या मुदीवर हळदी, कुंकू, अक्षता आणि फुले वाहिली.

५ अ. उडीद मिश्रित भाताकडे वाईट शक्तींच्या त्रासाची स्पंदने आकृष्ट होणे आणि अष्टदिक्पालांनी भाताचा बली ग्रहण करून साधकांना होणारे समस्त त्रास भक्षण करून नष्ट : परात्पर गुरु डॉ. आठवले, संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाची स्पंदने भातातील उडदामध्ये आकृष्ट झाली. हा भाताचा बली दिक्पालांनी ग्रहण करण्यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अष्टदिक्पालांना प्रार्थना केल्यावर अष्टदिक्पालांनी साधकांना होणारे समस्त त्रास भक्षण करून नष्ट केले.

५ आ. अष्टदिक्पालांनी भाताचा बली भक्षण करून संतुष्ट होणे आणि त्यांनी प्रसन्न होऊन साधकांना भरभरून आशीर्वाद देणे : अष्टदिक्पालांनी भाताचा बली भक्षण केल्यामुळे ते संतुष्ट झाले आणि त्यांनी प्रसन्न होऊन सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले, संत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना चांगले आरोग्य, दीर्घायुष्य, क्षेम (कुशल) अन् शांती प्रदान करून संपूर्ण सनातन कुटुंबाचे पालन-पोषण आणि संरक्षण करण्याचा आशीर्वाद दिला.

५ इ. कृतज्ञता !

‘हे सूर्यनारायणा, तुझ्या कृपेमुळे मला सौरयागाचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मिळाली. तूच ही सेवा माझ्याकडून करवून घेतली आणि तूच हा लेख लिहून घेतलास, यासाठी मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते. तुझी कृपादृष्टी आम्हा साधकांवर आणि हिंदुत्वनिष्ठांवर अखंड राहू दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१०.२०१८)

या यज्ञाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले संपूर्ण सूक्ष्म परीक्षण जागेअभावी येथे देता येत नाही; पण पुढे त्या विषयीचा ग्रंथ प्रकाशित करणार आहोत. येथे यज्ञाच्या संदर्भात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि एक संत यांचे सूक्ष्म-परीक्षण दिले आहे.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF