ट्विटरला धडा शिकवाच !

सामाजिक माध्यमांवरील नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणाच्या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राविषयीच्या संसदीय समितीपुढे उपस्थित व्हा’, असा लेखी आदेश देऊनही ट्विटरचे मुख्याधिकारी जॅक डोर्से अन् आस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी यांनी ते धुडकावून लावले. संसदीय समितीने १ फेब्रुवारीला पत्र पाठवून ७ फेब्रुवारीला उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर वेळ वाढवून दिल्यावरही ट्विटरचे अधिकारी समितीपुढे उपस्थित राहिलेले नाहीत. याविषयी ट्विटरने ‘आम्हाला आयत्या वेळी निरोप मिळाला. त्यामुळे सिद्धता करणे अशक्य आहे’, अशी सारवासारव केली आहे. भाजपने मात्र या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेत ‘ट्विटरचे हे वर्तन म्हणजे भारतातील सरकारी यंत्रणेचा अपमान आहे. याच्या संभाव्य परिणामांना सामोरे जाण्यास सिद्ध रहा’, अशी चेतावणी दिली आहे.

ट्विटर या सामाजिक माध्यमाचा जगभरात बोलबाला आहे. कुठल्याही सामाजिक विषयांवर, घडामोडींवर मुक्तपणे स्वतःचे विचार मांडण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जातो. भारतातही कोट्यवधी लोकांचे ट्विटरचे खाते (अकाऊंट) आहे. यामध्ये राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, प्रसिद्ध व्यक्ती, विचारवंत, हिंदुत्वनिष्ठ यांचाही समावेश आहे. संबंधित व्यक्तीच्या ट्विटर खात्याचे किती चाहते (फॉलोअर) आहेत, त्यांनी केलेल्या ‘ट्वीट’ला किती जण ‘रिट्वीट’ करतात यावरून संबंधित व्यक्तीचा जनमानसातील प्रभाव लक्षात येतो. समाजातील प्रभावशाली व्यक्ती तर या माध्यमातूनच त्यांच्या खासगी आणि कामाच्या महत्त्वाच्या गोष्टीही लोकांना सांगतात. लोकप्रतिनिधी या माध्यमातून अगदी महत्त्वाचे निर्णयही जनतेला पहिल्यांदा सांगतात. हिंदुत्वनिष्ठ या माध्यमाचा राष्ट्र आणि धर्म विषयक सूत्रे सांगण्यासाठी, तर हिंदुविरोधी, पुरो(अधो)गामी त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात.

ट्विटरकडून हिंदुत्वनिष्ठांची उपेक्षा !

ट्विटरचे हे मुक्त व्यासपीठ असले, तरी त्यावरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिक होतो, हे लक्षात येते. भारतीय इतिहासाची अचूक आणि विश्‍लेषणात्मक माहिती असलेल्या एका हिंदुत्वनिष्ठाचे ट्विटरचे खाते अनेक वेळा काही दिवस अथवा काही घंटे बंद (सस्पेंड) केले गेले होते. ‘एखाद्या व्यक्तीने हिंसा अथवा भावना भडकावणारे लिखाण सातत्याने केले असेल, तर त्या व्यक्तीचे खाते बंद करावे कि कसे’, याचा अधिकार निश्‍चितच ट्विटरकडे आहे; मात्र एखादी व्यक्ती ट्वीट करून भारताचा सत्य इतिहास आणि तोही तपशीलवार सांगत असेल, तर ‘ट्विटरला का राग येतो ?’, हे समजत नाही. त्या व्यक्तीचे खाते काही काळ बंद केल्याने तेवढ्या कालावधीसाठी तिने प्रसारित केलेली माहिती मिळण्यापासून तिचे ‘फॉलोअर्स’ही वंचित रहातात. त्यांचाही माहिती मिळण्याचा अधिकार ट्विटरकडून हिरावून घेतला जातो, हे अयोग्य आहे.

हिंदु धर्म, भारतीय संस्कृती, हिंदुत्वनिष्ठ पक्ष यांची अपकीर्ती करणार्‍यांच्या ट्वीटचे खंडण एका राष्ट्रप्रेमी हिंदु लेखिकेकडून नियमितपणे केले जाते. तिचेही खाते काही काळ न चालणे, त्यावर नवीन ट्वीट करता न येणे, असे प्रकार अनुभवण्यास येतात. ही धक्कादायक माहिती या लेखिकेकडूनच सांगण्यात आली. अन्य हिंदु विचारवंत, हिंदुप्रेमी यांनाही हाच अनुभव आला आहे. ट्विटरकडून राममंदिरासारख्या तसेच महत्त्वाची माहिती देणारी ट्वीट ‘हिंसात्मक लिखाण’ या नावाखाली सहज दिसू नयेत अशा स्थितीत प्रसारित केली जातात. हिंदूंशी संबंधित काही ‘टॅग’ गायब होतात, पुष्कळ ट्वीट करूनही हिंदूंशी निगडित एखादा ‘हॅशटॅग’ अग्रस्थानी येत नाही. हिंदुविरोधी ट्वीट असल्यास अथवा संबंधित व्यक्ती वारंवार अशा ट्वीट करत असेल, तर तिच्यावर लवकर कारवाई होत नाही. पुरो(अधो)गाम्यांचा समाचार घेणार्‍यांवर मात्र त्वरित कारवाई होते ! अशा या ट्विटरच्या हिंदुविरोधी कारभाराची कितीतरी उदाहरणे देता येतील. एखाद्याला वाटेल की, ट्विटरच्या धुरिणांना हिंदु संस्कृती, भारत यांच्याविषयी अज्ञान असेल; पण वास्तवात असेही नाही. काही मासांपूर्वी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से भारतात आले होते. ‘भारतात आल्यामुळे त्यांचे स्वागत करूया’, असे भारतियांनी ठरवले; मात्र डोर्से यांचे भारतात आगमन झाल्यावर त्यांनी ‘एक व्यक्ती फलक धरून उभी आहे’, असे छायाचित्र प्रसारित केले. या फलकावरील लिखाण होते ‘ब्राह्मणवादी पितृव्यवस्था मोडून काढा.’ या छायाचित्रात हा फलक घेऊन हिंदुद्वेषी पत्रकार बरखा दत्त आणि अन्य हिंदुविरोधी मंडळीही होती. जणू या सर्वांनी मिळून आणि ठरवून भारतियांना अपमानित करायचे षड्यंत्र रचले होते ! जॅक डोर्से यांच्या मित्रमंडळात हिंदुविरोधी व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची मानसिकताही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी असणार, हे वेगळे सांगायला नको.

या प्रकरणात नंतर ट्विटरने बरीच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; मात्र राष्ट्रप्रेमींनी जॅक यांचा आधीच कठोर शब्दांमध्ये निषेध करून त्यांंचे खरे स्वरूप जगासमोर आणले होते. ट्विटरच्या मुख्याधिकार्‍याची ही कृती बरेच काही सांगून जाते. त्यामुळे हिंदूंना त्यांचे दमन झाल्याचा अनुभव का येतो, तेही यातून लक्षात येते. ‘प्रसारमाध्यमे, सामाजिक प्रसारमाध्यमे हिंदुविरोधी गटांच्या हातात आहेत’, असे सांगितले जाते; मात्र त्यांच्यावर कारवाई मात्र केली जात नाही. परिणामी त्यांचे बळ वाढते आणि ते भारत सरकारलाही जुमानत नाहीत. ट्विटरने भारत सरकारच्या आदेशाला ज्या प्रकारे केराची टोपली दाखवली, त्यातून हे स्पष्टपणे दिसून आले. वास्तविक अशा सामाजिक प्रसारमाध्यमाला या आधीच त्याची जागा दाखवून देणे आवश्यक होते; मात्र तसे झाले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. हिंदुविरोधी कारवायांना खतपाणी घालणार्‍या आणि सरकारी आदेशाचे पालन न करणार्‍या ट्विटरला भाजप सरकारने धडा शिकवावाच, हे येथे सांगणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF