साधकांवर प्रीतीचा वर्षाव करतांना त्यांना सहजसुंदर भाषेत अध्यात्माचे ज्ञान देऊन क्षणोक्षणी घडवणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

‘गेल्या ४ वर्षांत सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी खूप काही दिले आणि पुष्कळ शिकवले. त्यांनी जे जे शिकवले आणि दृष्टीकोन दिले, ते सर्व चिरंतन आहेत अन् आम्हाला मोक्षपथावर नेणारे आहेत. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

१. साधकांवर आत्यंतिक प्रीती असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांच्या रक्षणासाठी सतत प्रयत्न करणे

श्री. विनायक शानभाग

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ ‘साधकांच्या रक्षणासाठी काय करायला हवे ?’, असा विचार सतत करत असतात. विश्रांती घेत असतांनाही त्या जगभरातील साधकांसाठी प्रार्थना करणे किंवा त्यांच्याभोवती मंडल घालणे आदी कृती करतात. भारतातील किंवा विदेशातील एखाद्या साधकावर संकट येणार असेल, तेव्हा त्यांना ईश्‍वरी प्रेरणेने त्यापूर्वीच संकेत मिळतो. नंतर एक क्षणही वाया न घालवता त्या साधकासाठी प्रार्थना करतात आणि त्याच्याभोवती सूक्ष्मातून नामजपाचे मंडल घालतात. काही वेळाने त्या साधकाला संपर्क करून त्याची चौकशी करतात. तेव्हा त्यांना साधकाकडून कळते की, खरोखर त्याच्यावर एक संकट आले होते; पण थोडक्यात निभावले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रिय असलेला विषय म्हणजे ‘सनातनचे साधक’ ! त्यांच्याप्रमाणेच सद्गुरु गाडगीळ काकूंनाही साधकच सर्वांत अधिक प्रिय आहेत. त्यांच्या या प्रेमामुळेच देश-विदेशांतील साधक त्यांच्याशी आधीची ओळख नसतांनाही एका भेटीतच त्यांचे होऊन जातात. सद्गुरु काकू नेहमी म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना प्रेम दिले; म्हणून आम्ही साधनेत टिकून आहोत. मग आपणही साधकांना प्रेम द्यायला नको का ?’’

२. दौर्‍यावर असणार्‍या साधकांची आईपेक्षाही अधिक मायेने काळजी घेणे

सद्गुरु काकूंसमवेत दैवी प्रवास करतांना दौर्‍यावर सर्वश्री दिवाकर आगावणे,  सत्यकाम कणगलेकर, स्नेहल राऊत आणि मी (विनायक शानभाग) असतो. अधूनमधून विनीत देसाई किंवा अनिमिष नाफडे हेही असतात. सद्गुरु काकू जन्म देणार्‍या आई-वडिलांपेक्षाही आम्हा सर्वांची अधिक काळजी घेतात.

२ अ. चालक-साधकांना पुरेशी विश्रांती मिळावी, याची काळजी घेणे : दौर्‍यावर चालक-साधक सतत गाडी चालवत असतात. त्यामुळे मोठ्या प्रवासानंतरच्या दुसर्‍या दिवशी सद्गुरु काकू आवर्जून सांगतात, ‘‘त्यांना लवकर उठवू नका. त्यांची व्यवस्थित विश्रांती होऊ दे.’’

२ आ. साधकांंच्या जेवणाला प्राधान्य देऊन त्यांना आईच्या मायेने जेवण वाढणे : प्रवासात असतांना जेवणाच्या वेळी गाडी थांबवून समवेत असलेल्या साधकांंच्या जेवणाला त्या प्राधान्य देतात आणि आईच्या मायेने त्यांना जेवण वाढतात. सद्गुरु काकू स्वतः मात्र भूक लागल्यावरच खातात. त्यांचे खाणेही खूप अल्प आहे.

२ इ. ‘साधकांकडे पुरेसे कपडे आहेत ना ?’, हे स्वतः पाहून चेन्नईतील परिचित शिंप्याकडून साधकाला नवीन कपडे शिवायला लावणे : ‘साधकांकडे पुरेसे कपडे आहेत ना ?’, हे याची त्या स्वतः निश्‍चिती करतात. एकदा काकूंनी श्री. विनीत देसाईला विचारले, ‘‘विनीत, तुझ्याकडे पुरेसे कपडे आहेत का ?’ यावर तो म्हणाला, ‘‘हो काकू.’’ काकूंनी त्याला त्याच्याकडे असलेले शर्ट आणि विजारी दाखवायला सांगितल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘त्याच्याकडे असलेल्या दोन्ही विजारींचे कंबरेचे माप पुष्कळ अधिक आहे. त्यामुळे तो वरून सुतळी किंवा धागा बांधतो. काकूंनी लगेच चेन्नईतील परिचित शिंप्याकडे जायला सांगून त्याच्यासाठी दोन नवीन विजारी शिवायला लावल्या.

३. विमान तिकीट देणार्‍या कर्मचारी स्त्रीने सद्गुरु काकूंना विचारलेला प्रश्‍न आणि काकूंनी दिलेल्या उत्तरामुळे तिच्या तोंडवळ्यावरील आश्‍चर्य पाहून काकूंनी व्यक्त केलेले गमतीशीर विचार !

एकदा आम्ही विमानतळावर गेलो होतो. विमान तिकीट देणार्‍या तेथील कर्मचारी स्त्रीने सद्गुरु काकूंना विचारले, ‘‘तुमच्या समवेत असलेली ही ४ मुले कोण आहेत ?’’ यावर काकू म्हणाल्या, ‘‘ही माझी मुले आहेत.’’ हे ऐकून ती आश्‍चर्यचकित होऊन पाहू लागली. ती एकदा सद्गुरु काकूंकडे पहायची, तर एकदा आम्हा चौघांकडे पहायची. तेथून बाहेर पडल्यावर आम्ही सर्व जण खूप हसलो. सद्गुरु काकू म्हणाल्या, ‘‘तिला वाटले असेल की, ही मुले सावळी, तर यांची आई गोरी कशी आहे ? तिला वाटले असेल, ‘बहुतेक या मुलांचे वडील सावळे असावेत.’’ काकूंनी असे म्हटल्यावर आम्ही पुन्हा खूप हसलो आणि मनोमनी आमच्या ‘आध्यात्मिक आईच्या, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

४. साधकांना त्यांना उमजेल अशा संगणकीय भाषेतून अध्यात्माचे अत्युच्च शिक्षण देणे

४ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे, तसेच भगवंताच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व !

४ अ १. भगवंताने जिवाला दिलेले ‘मेमरी कार्ड’ अत्युच्च क्षमतेचे असून मृत्यूनंतर पुढच्या लोकांत जाण्यासाठी त्या ‘मेमरी कार्ड’मध्ये व्यक्तीने भरलेला अनावश्यक ‘डाटा’ (नोंद) पुसून त्यात भक्तीचा डाटा भरावा लागणे : सद्गुरु काकूंनी सांगितले, ‘‘मृत्यू म्हणजे हे शरीर सोडून दुसरे शरीर धारण करणेे. आपण कपडे बदलतो, तसेच हे आहे. केलेल्या कर्माप्रमाणे आपण मनुष्य योनीतून ‘कुत्रा’, ‘मांजर’ आदी कोणत्याही योनींत जातो, म्हणजे मनुष्यरूपी कपडे सोडून आपण कुत्रा, मांजर रूपी कपडे धारण करतो; पण ही प्रक्रिया अतिशय भयंकर असते आणि म्हणून येथे गुरूंची आवश्यकता असते. आपल्याकडे चांगल्या क्षमतेचे ‘मेमरी कार्ड’ असावे लागते. येथे ‘मेमरी’ म्हणजे भगवंताची ‘मेमरी.’ पृथ्वीवरील काही ‘जी.बी.’ (गिगा बाईट) किंवा ‘टि.बी.’ (टेट्रा बाईट) यांच्या ‘मेमरी कार्ड’च्या तुलनेत भगवंताने जिवाला दिलेले ‘मेमरी कार्ड’ अत्युच्च क्षमतेचे आहे. मृत्यूनंतर खालच्या योनीत न जाता पुढच्या लोकांत जाण्यासाठी भगवंताने दिलेल्या ‘मेमरी कार्ड’मध्ये आपण भरलेला सर्व अनावश्यक ‘डाटा’ (नोंद) पुसून त्यात भक्तीचा ‘डाटा’ भरावा लागतो. तेव्हा आपले ‘मेमरी कार्ड’ भगवंताचे बनते आणि जीव भगवंताच्या जवळ जातो. जर जिवाची ‘हार्ड डिस्क’ किंवा ‘मेमरी कार्ड’ पूर्ण भरलेले असेल, तर भगवंताचे विचार आत कसे येतील ? त्यासाठी आपली ‘हार्ड डिस्क’ रिकामी करावी लागते. तेव्हाच आपण भगवंताचे विचार ग्रहण करू शकतो. ‘हार्ड डिस्क’ पूर्ण भरली असेल, तर त्यावर आपण नवीन ‘डाटा’ कसा ‘कॉपी’ करणार ?’’

४ अ २. ईश्‍वराची स्पंदने सतत आपल्या दिशेने येत असूनही केवळ आपली ‘मेमरी’ भरलेली असल्याने आपण ईश्‍वरी स्पंदने ग्रहण करू न शकणे : त्या म्हणाल्या, ‘‘वर आकाशात ईश्‍वराचा ‘सर्व्हर’ आहे. तो शोधत असतो, ‘कोणाची ‘हार्ड डिस्क’ रिकामी आहे ?’ आपली हार्डडिस्क पूर्ण भरलेली असेल, तर ईश्‍वराचा ‘सर्व्हर’ म्हणतो, ‘मी दुसर्‍या ठिकाणी जातो, जेथे ‘हार्ड डिस्क’ रिकामी आहे.’ ब्रह्मांडाची गती सतत चालू असून ईश्‍वराची स्पंदने सतत आपल्या दिशेने येत असतात. केवळ आपली ‘मेमरी’ भरलेली असल्याने आपण ईश्‍वरी स्पंदने ग्रहण करू शकत नाही. ईश्‍वर दाराशी आलेला असतो; पण ते आपल्याला कळत नाही.

४ अ ३. साधकाच्या ‘हार्ड डिस्क’ला ‘फंगस्’ लागले की, त्याला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी पाठवावे लागणे : जेव्हा ‘हार्ड डिस्क’ला ‘फंगस्’ (एक प्रकारची बुरशी) लागते, तेव्हा ‘हार्ड डिस्क’ची दुरुस्ती करावी लागते. याचप्रमाणे जेव्हा साधकाच्या ‘हार्ड डिस्क’ला ‘फंगस्’ लागते, तेव्हा त्या साधकाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी पाठवावे लागते. ही प्रक्रिया केल्यानंतर काही काळ ‘हार्ड डिस्क’ चांगली चालते; पण काळजी घेतली नाही, तर साधकाला पुनःपुन्हा प्रक्रियेला पाठवावे लागते. यासाठीच भगवंताचे अनुसंधान सतत असणे महत्त्वाचे आहे; पण आपण अजूनही मन आणि बुद्धी यांमध्येच अडकलो आहोत.

४ आ. सद्गुरु काकूंनी वर्णिलेली जिवाच्या प्रवासाची सुंदर प्रक्रिया ! : अजून आपल्याला किती आतमध्ये जायचे आहे. ‘जीव, जीवात्मा, शिव आणि शिवात्मा’, असे जात जात पुढे आत्मकोश येतो अन् त्यानंतर ‘आत्मा.’ येथपर्यंत आपला प्रवास आहे.

१. जेव्हा आपण जीवात्म्यापर्यंत जातो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की, ‘माझ्याकडून चूक झाली. मी सुधारायला पाहिजे.’

२. जीवात्म्यापासून पुढे गेल्यावर प्रसंग किंवा चूक होण्यापूर्वीच स्वतःला जाणीव होते, ‘अशा स्थितीत माझ्याकडून चूक होऊ शकते’ आणि आपण सतर्क होतो.

३. शिवात्मा नेहमी आनंदात असतो. या स्थितीत जिवाकडून आपोआप योग्य कृती घडते आणि त्याला त्याची जाणीवही होत नाही.

४. जेव्हा जीव आत्म्याच्या जवळ पोहोचतो, तेव्हा तो सतत आनंदात राहू लागतो. या स्थितीत भगवंतच सर्वकाही करत असतो. खरेतर अशा स्थितीत असणार्‍यांसाठी भगवंताला सर्व करावेच लागते. देव आपल्यासाठी मनुष्य बनतो आणि आपण देव बनतो, म्हणजे उलटे होते. संत एकनाथांसाठी श्रीखंड्या आला. संत जनाबाईसाठी पांडुरंग दळू लागला. अशाच प्रकारे आपल्याही जीवनात घडते.

अशी ही सुंदर प्रक्रिया आहे. ‘अध्यात्मातील अद्वैत हेच आहे’, हे एकदा कळले की, कोणत्याही गोष्टीचे आपल्यावर दडपण येणार नाही. आपली साधना एका लयीत होऊ लागते आणि आपण ईश्‍वराच्या जवळ जाऊ लागतो.

‘गुरुदेव, आपण आणि सद्गुरु गाडगीळकाकू एकच आहात. आपणच त्यांच्या मुखातून बोलता आणि आम्हा साधकांना घडवता. दौर्‍यावर असतांना पावलोपावली याची अनुभूती येऊनही तशी जाणीव सतत रहात नाही. गुरुदेव, ही जाणीव सतत माझ्या मनात राहू दे आणि सद्गुरूंचा सहवास, त्यांची शिकवण, आणि कृपावर्षाव यांचा लाभ अधिकाधिक करून घेता येऊ दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, गँगटोक, सिक्कीम. (१९.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF