कर्नाटकातील मंगळूरू येथे धर्मांध एसडीपीआय संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा नोंद

‘बाबरी पुन्हा मिळवूया’, अशी मोहीम राबवल्याचे प्रकरण

मंगळूरू – ‘बाबरी मशीद परत मिळवूया’ अशा आशयाची राष्ट्रीय मोहीम राबवून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी एसडीपीआय (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतावुल्ल जोकट्टे आणि इतर यांवर येथील उळ्ळाल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा नोंदवला आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेवरून एसडीपीआयकडून देशभरात १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ‘बाबरी मशीद परत मिळवूया’, ‘भारत पुन्हा मिळवूया’ या राष्ट्रीय मोहिमेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उळ्ळाल येथे घेण्यात आला होता. यात जोकट्टे यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. तसेच बाबरी मशीद पाडण्याचा व्हिडिओ दाखवला होता. ‘हा कार्यक्रम घटनात्मक आणि पुष्कळ शिस्तबद्धरित्या घेण्यात आला; परंतु पोलिसांनी या विरोधात संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि इतरांवर द्वेष गुन्हा नोंदवला. याचा आम्ही निषेध करतो’, असे एसडीपीआयकडून सांगण्यात आले. ‘हिंदु राष्ट्र आणण्याची मागणी करणारा घटनाविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी मंगळूरू येथे सर्वत्र प्रसार केल्यावर पोलीस स्वयंप्रेरणेने गुन्हा नोंद करत नाहीत; मात्र आम्ही सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आमच्यावर कारवाई केली जाते. (भारताची फाळणी ही धर्माच्या नावाखाली झाली होती. त्यामुळे हिंदु राष्ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनादत्त अधिकार आहे ! या उलट राममंदिर पाडून बाबरी मशीद बांधण्यात आली. त्यामुळे पुन्हा बाबरी मशिदीची मागणी करणे, हीच घटनाविरोधी मागणी आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या मागणीची तुलना बाबरी मशिदीच्या मागणीशी करणे, हे हास्यास्पद आहे ! – संपादक) हे पोलिसांचे वागणे संशयास्पद आहे. गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र लढा देण्यात येईल’, असे जिल्हा सचिव शाहुल हमीद यांनी कळवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now