मानवनिर्मित जंगलांची हानी करणार्‍यांना शिक्षा करण्याविषयीचे विधेयक लोकसभेत सादर

ठाणे, ९ फेब्रुवारी – मानवनिर्मित जंगलांनाही सध्याच्या कायद्यांच्या कक्षेत आणणारे खासगी विधेयक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ८ फेब्रुवारीला लोकसभेत मांडले. देशभरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वणवे लावून जंगले नष्ट केली जातात. त्यामुळे मानवनिर्मित जंगलांनाही कायद्याचा आधार असला पाहिजे. या जंगलांना हानी पोहोचवणार्‍या समाजकंटकांना ५ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंतची कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच मानवनिर्मित जंगलांची जागा केंद्र सरकारच्या अनुमतीविना कुठल्याही राज्य सरकारला देता येणार नाही, अशा तरतुदी या विधेयकात आहेत.

कोट्यवधी रुपये खर्च होणार्‍या वृक्षारोपण उपक्रमांच्या माध्यमातून लावल्या जाणार्‍या झाडांचे संगोपन आणि त्यांचे संरक्षण यासाठी विद्यमान कायद्यांमध्ये तरतूदच नव्हती. ती यामुळे मिळणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ या गावी वनविभागाच्या जागेवर एक लाख झाडे लावण्यात आली होती; मात्र समाजकंटकांनी सलग दोन वर्षे या झाडांना आगी लावल्या. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी वरील विधेयक मांडले आहे.


Multi Language |Offline reading | PDF